पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गंभीर जखमी; फोटो आले समोर

ममता बॅनर्जी यांना कोलकात्यामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

    पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली आहे. याबाबत तृणमूल काँग्रेसने ऑफिशियल अकाऊंटवरुन पोस्ट करत माहिती दिली आहे. टीएमसीने त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमच्या अध्यक्षांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” टीएमसीने ममता बॅनर्जी यांचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्या कपाळाला गंभीर इजा झाल्याचं दिसत असून रक्तस्राव होताना दिसत आहे, ममता बॅनर्जी यांना कोलकात्यामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

    ममता बॅनर्जी यांना ही गंभीर दुखापत झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र त्यांनी ही जखम कशामुळे झाली आहे याची अदयाप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही वृत्तवाहिन्यांनी ममता बॅनर्जी घरातल्या ट्रेडमिलवर चालताना पडल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे यावर दुजोरा देण्यात आलेला नाही. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी ममता यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

    ममता बॅनर्जी यांचा दोन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. वर्धमान येथून कोलकात्याला जाताना ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाला होता. वर्धमानमधील पावसामुळे ममता बॅनर्जी नियोजित कार्यक्रम सोडून घरी परतत होत्या. शिवाय त्या हेलिकॉप्टरने प्रवास करू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या कारने माघारी परतत होत्या. परंतु, दाट धुकं पसरल्यामुळे कार चालवणं कठीण झालं होतं. तेव्हा त्यांच्या कारचा छोटा अपघात झाला होता. या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती.