पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट (Photo Credit- X)
ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली ६० आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रवीन्द्र नाथ बोस यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. “आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस आहोत,” असा दावा करत त्यांनी बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपदाची मान्यता देण्याची मागणी केली होती. ऋतब्रत बॅनर्जी यांनी आपल्याकडे ६० आमदारांचे बळ असल्याचा दावा केला असून, आमदार अखरुज्जमान यांची पक्षाचे मुख्य प्रतोद (Chief Whip) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, बंडखोर आमदार ऋतब्रत बॅनर्जी, संदीपन साहा आणि इतर अनेक असंतुष्ट आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना ५८ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले अधिकृत समर्थन पत्र सुपूर्द केले. या पत्रासोबतच त्यांनी बंडखोर गटाच्या नवीन कोअर टीमचा प्रस्तावही अध्यक्षांसमोर ठेवला. या नव्या रचनेनुसार, ऋतब्रत बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी, तर जावेद खान, संदीपन साहा आणि शिउली साहा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच रघुनाथगंजचे आमदार अखरुज्जमान यांच्याकडे मुख्य सचेतक पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
हा संपूर्ण हायव्होल्टेज ड्रामा विधानसभा आवारात झालेल्या बंडखोर आमदारांच्या गुप्त बैठकीनंतर समोर आला. विशेष म्हणजे, मंगळवारीमध्य कोलकात्यात माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या जाहीर धरणे आंदोलनाकडे या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच आमदारांनी पूर्णपणे पाठ फिरवली होती. दुसरीकडे, ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे ज्येष्ठ नेते शोभनदेव चटोपाध्याय, नयना बंदोपाध्याय, मदन मित्रा आणि कुणाल घोष यांनी बुधवारच्या या विधिमंडळ बैठकीपासून स्वतःला लांब ठेवले.
पक्षांतर बंदी कायद्याच्या कडक नियमांनुसार, विधिमंडळात कोणत्याही वेगळ्या गटाला किंवा फुटीर गटाला कायदेशीर अपात्रतेपासून वाचण्यासाठी मूळ पक्षाच्या एकूण आमदार संख्येच्या किमान दोन-तृतीयांश (२/३) सदस्यांचे समर्थन असणे अनिवार्य असते. तृणमूल काँग्रेसच्या एकूण ८० आमदारांचा विचार करता, ही कायदेशीर मर्यादा ५४ आमदारांवर येऊन थांबते. बंडखोर गटाने ५८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केल्यामुळे त्यांनी हा तांत्रिक टप्पा यशस्वी पार पाडल्याचे दिसत आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ममता बॅनर्जी यांनी ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन शाह यांना तृणमूल काँग्रेसमधून निलंबित केले होते. या कारवाईनंतरच पक्षांतर्गत धुसफूस वाढली आणि बंडखोरीचा अधिकृत भडका उडाला. नवे विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही सभागृहात आणि राज्यामध्ये एक सक्षम व जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावणार आहोत. आमचे राजकारण हे केवळ विरोधाला विरोध करणारे नसेल, तर पश्चिम बंगालच्या जनतेसाठी आम्ही पूर्णपणे सकारात्मक राजकारण करू.”






