दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास (फोटो- ANI)
BJP Delhi News: दिल्ली विधानसभेत भाजपने आम आदमी पक्षाचा मोठा पराभव केला आहे. दरम्यान उद्या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार आहे. त्याआधी म्हणजेच आज भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक पार पडली. पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अखेर दिल्लीला चौथ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. भाजप आमदार रेखा गुप्ता यांची विधिमंडळ गटाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार आहेत. दरम्यान रेखा गुप्ता कोण आहेत, भाजपमध्ये त्यांचा राजकीय प्रवास कसा राहीला आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
दिल्ली विधानसभेत भाजपने आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. 70 पैकी 48 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रवेश वर्मा आणि अन्य नेत्यांची नावे आघाडीवर असल्याचे म्हटले जात होते. मात्र भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरत रेखा गुप्ता यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे. रेखा गुप्ता या कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे? याबद्दल जाणून घेऊयात.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास
रेखा गुप्ता यांना शालिमार विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे. त्यांनी शालिमार विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा 29 हजार मतांनी पराभव केला आहे. रेखा गुप्ता या लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक राहिल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून रेखा गुप्ता यांनी राजकारणात प्रवेश केला. 1994 ते 1995 च्या काळात त्यांची सचिव म्हणून दौलत राम कॉलेजमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. 1995-1996 मध्ये दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघाच्या त्या सचिव बनल्या होत्या. तर 1996 ते 1997 मध्ये रेखा गुप्ता अध्यक्ष बनल्या.
भाजपमध्ये अनेक पदांवर केले आहे काम
रेखा गुप्ता 2003 ते 2004 पर्यंत दिल्ली भाजपच्या युवा मोर्चाच्या सचिवपदी कार्यरत होत्या. 2004 ते 2006 मध्ये त्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव बनल्या. 2007 मध्ये रेखा गुप्ता या नगरसेवक झाल्या. नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्याकडे 2007 ते 2009 च्या दरम्यान महिला कल्याण, बाल विकास समितीचे अध्यक्ष केले गेले. 2010 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य बनल्या. सध्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. 2015 आणि 2020 मध्ये रेखा गुप्ता या विधानसभेला पराभूत झाल्या होत्या. मात्र पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा संधी दिली. 2025 च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा पराभव करत आमदार होण्याची संधी प्राप्त झाली. रेखा गुप्ता या मूल हरयाणा येथील आहेत.
दिल्ली भाजपची आज संध्याकाळी महत्वाची बैठक पार पडली. पर्यवेक्षक रवीशंकर प्रसाद आणि ओपी धानखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रेखा गुप्ता यांची विधिमंडळ गटाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. या बैठकीला 48 आमदार, भाजपचे 7 खासदार आणि अन्य महत्वाचे नेते उपस्थित होते. दरम्यान अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यामुळे परवेश वर्मा यांना मुख्यमंत्री केले जाईल अशी दाट शक्यता होती. मात्र भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्रच वापर करत दिल्लीची कमान महिलेच्या हातात देण्याचे ठरवले. त्यानंतर विधिमंडळ गटाच्या नेतेपदी रेखा गुप्ता यांची निवड झाली. तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव जाहीर झाले. रेखा गुप्ता या उद्या दिल्लीच्या चौथ्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.