आयपीएल लाइव्ह अपडेट: आयपीएल २०२२ साठी सर्व १० संघ ८ मार्चपर्यंत मुंबईत पोहोचतील आणि १४ किंवा १५ मार्चपासून सर्व प्रशिक्षण सुरू करतील. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, सर्व १० संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य ८ मार्चपर्यंत मुंबईत पोहोचू शकतात, जिथे त्यांना ३ ते ४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि त्यानंतर सर्वांच्या RT-PCR चाचण्या केल्या जातील.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीगच्या सरावासाठी मुंबईतील ५ ठिकाणे ओळखली आहेत. यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वांद्रे-कुर्ला येथील क्रीडा संकुल, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे ब्रेबॉर्न स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेटचे मैदान आणि ठाण्यातील एमसीए मैदान यांचा समावेश आहे. यावेळी लीगमध्ये १२ डबल हेडर होऊ शकतात. आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.