१९ वर्षाखालील क्रिकेटपटूंनी अलिकडेच वारेमाप आर्थिक मानधनाचे हे विष भारताच्या युवा क्रिकेटपटूंच्या पिढीला हजम होणारे नाही. इंग्लंडला हरवून विश्वचषक जिंकला. या १९ वर्षाखालील युवा संघांतील खेळाडूंवरही फ्रॅन्चायझींनी प्रचंड पैशाच्या अमिषाचे जाळे फेकले. दुसरीकडे आयपीएल पदार्पणही न केलेल्या खेळाडूंसाठी (अनकॅप) लिलावामध्ये मर्यादा रक्कम निश्चित करणे आवश्यक होते. पण यंदा त्याऐवजी नियमच बदलून नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या तब्बल ३५५ खेळाडूंनाच लिलाव प्रक्रिएत स्थान देण्यात आले.
त्याचा परिणाम आपण लिलावानंतर पाहिला. नावगावही ठाऊक नसलेल्या खेळाडूंना ८ कोटी, ७ कोटी, ५ कोटी अशी गलेलठ्ठ रकमेची एका हंगामासाठी बिदागी देण्यात येणार आहे. हे क्रिकेट नाही, तर क्रिकेटचे धंदेवाईक स्वरूप आहे. क्रिकेटच्या हिताचे नाही. क्रिकेट प्रशासन व्यवस्थेने, फ्रॅन्चायझींनी लावलेल्या आर्थिक स्पर्धेच्या या वेगाला वेळीच आवर घातला नाही तर या विषाची फळेही चाखावी लागणार आहेत.
पैशाच्या अमिषापाई अनेक उद्योन्मुख खेळाडूंची कारकिर्द उमलण्याआधीच संपुष्टात येण्याचा धोका स्पष्ट दिसत आहे. वाजवीपेक्षा जास्त योग्यतेपेक्षा खूपच अधिक आणि गुणवत्तेच्या मूल्यमापनावर न आधारीत मिळालेला पैसा खेळाडूंना स्वत:च्या पात्रतेपेक्षाही अधिक उंचीवर, एका आभासी विश्वात नेणार आहे. ज्या वयात स्वत:च्या क्रिकेटला अधिक परिपूर्ण करण्याची गरज आहे, त्या कालावधीत काही खेळाडू पैशांच्या राशीवर लोळताना दिसतील. त्याच वेळी दिलेले अयोग्य आणि अधिक मानधन फ्रॅन्चायझी कसे वसूल करतील याची कल्पनाच करवत नाही.
खरं तर प्रत्येक देशाच्या क्रिकेट संघटना आणि आयसीसी यांनी ही बाब गंभीरपणे पाहिली पाहिजे. व्यावसायिक खेळाडूंसाठी त्यांच्या गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन करून मोठी ऑफर देणे वेगळी गोष्ट आहे. पण ज्या खेळाडूंनी आत्तापर्यंत काहीच कर्तृत्व गाजविले नाही, अशा खेळाडूंवर कोटी कोटी रुपयांची खैरात करणे, आयपीएल लिलाव प्रक्रीएची एका प्रकारे खिल्लीच उडविल्यासारखे आहे. या ‘अनकॅप’ खेळाडूंची गुणवत्ता कोण, कशी मोजतं हा संशोधनाचा विषय आहे. १९ वर्षाखालील क्रिकेटपटूंनाही जर असेच करोडोंमध्ये खरेदी करण्यास सुरुवात झाली तर देशासाठी खेळण्याचे ‘लक्ष्य’ त्यांच्यापुढे राहणार आहे का?
या प्रश्नाचे उत्तर खरंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आधी शोधायला हवे. आयपीएल ऑक्शनची आतुरतेने वाट पाहणारी क्रिकेट मैदानावरची ही लहान मुले पाहिली की त्यांच्या नजरेतील पैशाची हाव चटकन लक्षात येते. एके काळी क्रिकेट प्रशिक्षण केंद्रावर पालक आपल्या पाल्याला राज्यासाठी, देशासाठी खेळायचे लक्ष्य नजरेसमोर ठेऊन घेऊन यायचे. आजचे पालक कोणत्या तरी फ्रॅन्चायझीला चिकटविण्याचे उद्दिष्ट्य ठेऊनच मुलाला मैदानावर घेऊन येत आहेत.
आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटपटूंवर होत असलेला हा पैशाचा वर्षाव क्रिकेटविश्वातही द्वेषाची बिजे पेरणारा ठरू शकेल. धोनीला जेव्हा साडेनऊ कोटी रुपये पहिल्या हंगामात मिळाले तेव्हा केवढे कौतुक झाले होते. त्यानंतर त्यापुढे जात फ्लिनटॉफला अशीच बिदागी मिळाली. त्यावेळीही काही वाटले नाही. मात्र अलिकडच्या काळात ख्रीसमॉरिस (१६ कोटी), सॅम करन (१८ कोटी) आणि यंदा मिशेल स्टार्क (२४ कोटी), कमिंस (२० कोटी) यांना एवढी प्रचंड रक्कम ऑफर करण्यात आली. त्यापाठचे ‘लॉजिक’च कळत नाही. या खेळाडूंची स्पर्धेतील कामगिरी त्यांची बोली लावलेल्या पैशांच्या तुलनेत किती होते, हा देखील संशोधनाचा विषय आहे.
ख्रिस मॉरिस आणि सॅम करन यांनी लावलेले दिवे आपण पाहिले आहेतच. मिशेल स्टार्क संपूर्ण आयपीएल स्पर्धा खेळण्याइतपत फिट असेल का? त्याची यंदाचा विश्वचषक स्पर्धेतील भारतीय खेळपट्ट्यांवरची कामगिरी आपण पाहिली आहेच. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात त्याला सूर गवसला होता. कमिन्सच्या बाबतीतही त्याच्या कामगिरीबाबत कुणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही. मग खेळाडूंच्या अंतिम बोलीची रक्कम नेमकं कोण निश्चित करतं?
फ्रॅन्चायझींकडे असणारी विचारवंत मंडळी? त्यांच्याकडे असणाऱ्या माजी क्रिकेटपटूंचे नेमके खेळाडूंची लिलाव किंमत निश्चित करताना काय मत असते? की कप्तान-प्रशिक्षक व मालकच एखाद्या खेळाडूंची किंमत आधीच निश्चित करून लिलावासाठी येतात? आणखी एका गोष्टीचेही आश्चर्य वाटते, प्रत्येक फ्रॅन्चायझीने देशातील स्थानिक क्रिकेट गुणवत्ता शोधण्यासाठी अनेक मान्यवर माजी क्रिकेटपटूंना नेमले आहे. ही सारी मंडळी यंदा स्थानिक स्पर्धांमध्ये सर्वत्र मैदानांवर फिरताना दिसत होती. या मंडळींनी नेमके काय पाहिले? तामीळनाडूच्या शाहरुख खान या खेळाडूची यंदाच्या हंगामातील धावांची सरासरी अवघी १३ होती. या शाहरुख खानला ७ कोटी ६० लाखात कसा घेतला गेला?
ही तज्ज्ञ मंडळी नेमकी प्रत्येक खेळाडूची किंमत कशी ठरवतात. यांनी निश्चित केलेल्या किंमतीला ते ते खेळाडू प्रत्यक्ष स्पर्धेत न्याय देतात का? रिंकू सिंगसारखा ‘ग्रेट फिनिशर’ खेळाडू आपण अलिकडेच पाहिला. त्यांची किंमत अवघी ५० लाख? गत हंगामात अंतिम फेरीपर्यंत तडाखेबंद फलंदाजी करणाऱ्या साई सुदर्शनची किंमत २० लाख केली गेली होती. अशा वेळी यंदा १३ धावांची सरासरी असणाऱ्या शाहरुख खानला ७ कोटी ६० लाखात विकत घेण्यात आले. ज्या पंजाबने काढले त्याच शाहरुख खानसाठी पंजाबने सर्वप्रथम बोली लावली. विदर्भाच्या शुभम दुबेला केवळ एका डावावर ५.८ कोटीत राजस्थान रॉयल्सने घेतला. उत्तर प्रदेशच्या २० वर्षीय समीर रिझवीला केवळ एका हंगामातील कामगिरीच्या आधारे सव्वाआठ कोटी देण्याचे धाडस चेन्नईने केले. कुमार खुशाग्राला रणजी स्पर्धेच्या २६६ धावांच्या खेळीवरून दिल्ली कॅपिटल्सने सात कोटीत घेतले. ‘टॅलन्ट स्काऊटींग’ करणारे एजंट अनेकांच्या कामगिरीचे गोडवे आपापल्या फ्रॅन्चायझींकडे गातात. मात्र त्यातील काहींनाच चांगली रक्कम मिळते. त्यांच्यापेक्षा दर्जेदार असणारे काही खेळाडू अत्यल्प दरात विकले जातात तर काहींना कुणीही विचारत देखील नाही.
असं का? हा प्रश्न आता प्रत्येक आयपीएल स्पर्धेगणिक पडत चालला आहे. खेळाडू आणि फ्रॅन्चायझी यांच्यामध्ये असलेला ‘एजन्ट’ हा प्राणि अतिशय महत्त्वाचा ठरत चालला आहे. फ्रॅन्चायझींचा कप्तान, कोच यांच्या आदेशानंतर काही खेळाडूंवर हे एजन्ट अधिक लक्ष केंद्रित करतात. शाहरुख खानसारख्या खेळाडूसाठी ५-६ फ्रॅन्चायझी उत्सुक होत्या असं कळते. त्यावेळी शाहरुख खान हा प्रति विवियन रिचर्ड्स किंवा त्यापेक्षा मोठा खेळाडू असल्याचा भास होतो. पण… असं का?
म्हणजे खेळाडूंना संघात घेण्यात आणि त्यांची किंमत ठरविण्यात काही महत्त्वाचे लोक असतात. त्या सर्वांचे एकमत झाले की मोठ्या किमतीत खेळाडू विकत घेण्याची योजना तयार होते. खरं तर भारतीय खेळपट्ट्यांवर जसप्रित बुमरा हा वेगवान गोलंदाज परदेशी वेगवान गोलंदाजांपेक्षा निश्चितच उजवा आहे. बुमराच्या गोलंदाजीतील विविधता परदेशी गोलंदाजांकडे नाही. पण बुमराची आयपीएलची किंमत आहे ११ कोटी. कमिन्सची २० कोटी आणि मिशेल स्टार्कची २४.७५ कोटी.
इथे परदेशी खेळाडू आणि त्यांच्या एजंट्सची हुशारी दिसून येते. ३ वर्षांच्या लिलाव प्रक्रियेत पहिल्या दोन वर्षी मेगा ऑक्शन असते. तिसऱ्या वर्षी मिनी ऑक्शन असते. म्हणजे पहिल्या दोन वर्षाची शिलकी रक्कम सर्वच फ्रॅन्चायझींना तिसऱ्या वर्षी संपवायची असते. कारण नंतरच्या वर्षांसाठी नवे बजेट मिळणार हे निश्चित असते.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या देशांच्या खेळाडूंचे एजन्ट्स या संधीचा अचूक लाभ घेतात. म्हणजे ते मिनी ऑक्शनमध्ये हात मारतात. आपले खेळाडू ते पहिल्या दोन ऑक्शनसाठी उपलब्ध करून देत नाहीत. कमिन्स म्हणतो, माझ्यासाठी वर्ल्ड टेस्ट फायनल, विश्वचषक महत्त्वाचा. मी देशासाठी खेळणार, स्टार्कही म्हणतो, माझ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ महत्त्वाचा आणि पहिल्या दोन वर्षांच्या रकमेसह स्टार्क (२४ कोटी), कमिन्स (२० कोटी) पैसे केवळ तिसऱ्या वर्षी खेळून वसूल करतात. एजंटलाही ३ वर्षांपेक्षा एका वर्षाच्या करारासाठीही मोठे कमिशन मिळते. अन्य खेळाडू मात्र हतबल होऊन पहात राहतात.
खेळाडूंची नेमकी ‘व्हॅल्यू’ किती? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कुणीच देऊ शकत नाही. मात्र ज्या खेळाडूंची किंमत त्यांच्या योग्यतेपेक्षा अधिक देण्यात आली आहे; त्यासाठीचे प्रयत्न, लागणारे हात-भार महत्त्वाचे असतात. या हातांमध्ये मालकांच्या मर्जीतले, एजंटच्या मर्जीतले असतात. मात्र लायकीपेक्षा जास्त मिळालेला पैसा सर्वच खेळाडूंसाठी विषासारखा आहे.
– विनायक दळवी