Cameron Green (Photo Credit- X)
AUS vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांनी शतके झळकावली आणि संघाचा धावसंख्या ४०० च्या पुढे नेली. कॅमरून ग्रीनने (Cameron Green) ४७ चेंडूत धमाकेदार शतक ठोकले. या शतकासह तो ऑस्ट्रेलियासाठी वनडे क्रिकेटमध्ये दुसरे सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियासाठी वनडेमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे. मॅक्सवेलने 2023 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूत शतक केले होते.
कॅमेरून ग्रीनने या सामन्यात ४७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि तो ५५ चेंडूत ११८ धावा करून नाबाद परतला. आपल्या या खेळीत त्याने ६ चौकार आणि ८ षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जलद शतक करणाऱ्यांच्या यादीत ग्रीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही ग्लेन मॅक्सवेल आहे, ज्याने २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ५१ चेंडूत शतक केले होते. याशिवाय, २०१३ मध्ये जेम्स फॉकनरने भारताविरुद्ध ५७ चेंडूत शतक ठोकले होते.
Cameron Green turned down an easy single and then went 6, 6, 6! 😱 #AUSvSA pic.twitter.com/voNCrHoZcV
— cricket.com.au (@cricketcomau) August 24, 2025
ऑस्ट्रेलियाच्या वनडे क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एकाच सामन्यात तीन फलंदाजांनी शतक ठोकले आहे. ग्रीनपूर्वी या सामन्यात ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनीही शतके झळकावली. ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त, वर्ल्ड क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनेही हा पराक्रम केला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २५० धावांची मोठी भागीदारी झाली. हेडने १०३ चेंडूत १४२ धावा केल्या, तर मार्शने १०० धावांचे योगदान दिले. त्यानंतर ऍलेक्स कॅरीने ३७ चेंडूत ५० धावा आणि ग्रीनने ११८ धावांची तुफानी खेळी खेळली. ५० षटकांच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने २ विकेट्स गमावून ४३१ धावांचा डोंगर उभा केला. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ हे लक्ष्य गाठू शकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.