अंजीर फळाला जागतिक बाजारपेठेत वाढती मागणी (फोटो- istockphoto)
सासवड / संभाजी महामुनी: कमी पाण्यावर येणारे, दमट हवामान, फळांचा विशिष्ट आकार, गोड चव आणि रंग यामुळे पुरंदरच्या अंजीराला जगाच्या कानाकोपऱ्यात मोठी मागणी असते. बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकरी अंजिराचे उत्पादन जास्त प्रमाणात घेताना दिसत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत धडपडणाऱ्या बळीराजा ची धडपड आता केवळ धडपड राहिली नसून संपूर्ण जगाची गरज निर्माण झाली आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यनी याची दखल घेतली आहे. काही वर्षापूर्वी स्थानिक बाजारपेठेत दिसणारा अंजीर आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. अशा शब्दात वर्णन करून शेतकऱ्यांना मोठे पाठबळ दिले आहे. दरम्यान पुरंदरच्या अंजीराला जगाच्या बाजार पेठेत महत्व मिळवून दिल्याबद्दल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत.
दिल्ली येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्रातील पुरंदरचे अंजीर देशाच्या वेगवेगळ्या बाजारपेठेत मिळत असल्याचा उल्लेख केला आहे. जो शेतकरी एकेकाळी स्थानिक बाजारपेठे पुरताच मर्यादित होता, त्यांची उत्पादने आज जगाच्या बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. पुलवामा मधील स्नो पिक्स, काश्मीर मधील क्रिकेट बॅट आणि पुरंदरचा अंजीर जगाच्या बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. अशा शब्दात पुरंदरच्या अंजीराचा एकप्रकारे गौरव केला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या अम्रुत्महोत्सवी वर्षानिमित्त २०२२ मध्येच “फिलेटेली” दिनाच्या मुहूर्तावर टपाल तिकिटावर पुरंदरच्या अंजिराचे चित्र प्रकाशित करून सर्व देशभर आणि जगभर पोहोचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या कौतुकाने पुरंदर मध्ये अंजिरावर प्रक्रिया उद्योग आणि व्यापार वाढण्याचे नक्कीच संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुरंदर मधील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांसाठी गौरवाची बाब आहे.
अंजीरपेक्षाही फायदेशीर ठरतील पाने, सेवन कराल तर मिळतील 6 अफलातून फायदे
पुरंदर तालुक्यात अंजीर, सीताफळ, पेरू या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघते. सर्व फळ पिकांना पुणे, मुंबई सह राज्याच्या विविध बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते. पूर्वी ठराविक भागात या फळपिकांचे उत्पादन घेतले जात होते. मात्र पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध स्त्रोत निर्माण झाल्याने याचे उत्पादन आणि लागवडीचे क्षेत्र जास्तीत जास्त वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात अंजीर उत्पादक म्हणून पुरंदरची ओळख आहे. गुरोळी, सिंगापूर, सोनोरी, काळेवाडी, वनपुरी, दिवे, पिंपळे पारगाव यासह अनेक गावांतील शेतकरी अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. पावसाळा, हिवाळा मध्ये खट्टा बहर सुरु असतो तर उन्हाळ्यात मिठा बहर सुरु असतो. अशा पद्धतीने तीनही हंगामांत अंजिराचे उत्पादन मिळत असते.
पुरंदर तालुका समुद्र सपाटीपासून सर्वात उंचीवर असून येथे पाण्याचे भौगोलिक स्त्रोत त्यामानाने कमी आहेत. साहजिकच आठमाही शेतीवर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. यामुळेच ” दुष्काळी ” शिक्का पुरंदरवर कायमस्वरूपी बसला आहे. परंतु येथील शेतकऱ्यांनी परिस्थितीवर मात करून हरितक्रांती केली आहे. खरीप हंगामातील वाटाणा जसा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. तर फळ उत्पादनात अंजीर बरोबरच सीताफळ सर्वत्र परिचित आहे. तालुक्यातील दिवे येथे काही वर्षापूर्वी सीताफळ आणि अंजीर संशोधन केंद्राची निर्मिती केल्यानंतर अनेक नवनवीन प्रजाती निर्माण केल्या आहेत.
पुरंदर तालुक्यात ४५२ हे क्षेत्रावर अंजीर लागवड असून यात प्रामुख्याने खट्टा बहार व मीठा बहार असे दोन प्रमुख बहार घेतले जातात. काळेवाडी आणि जाधववाडी आणि इतर भागात अंजीर प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यात आले आहेत. यातून आयस्क्रीम, बर्फी, रबडी आदी पदार्थांची निर्मिती करण्यात येते. केवळ भारतातच नव्हे तर युरोप मध्येही पदार्थ पाठविण्यात आले आहेत. उन्हाळ्यात नागरिक उकाड्याने हैराण झाले असताना पुरंदरचा अंजीर नागरिकांच्या तोंडाला वेगळी चव आणण्याचे काम करीत आहे. एकसारखा आकार, एकसारखाच रंग आणि आपल्या वैशिट्यपूर्ण गोड चवीमुळे वर्षभर मागणी असून शेतकऱ्यांना दरही चांगला मिळतो. एका झाडापासून एका बहराला किमान अडीच ते तीन हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यामुळेच कित्येक शेतकरी केवळ अंजिराच्या उत्पादनातून लखपती झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.