नशेखोराची तरुणांना बेदम मारहाण
छत्रपती संभाजीनगर : रांजणगाव शेणपुंजी येथे नशेखोराने बेदम मारहाण केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, न्यायाच्या मागणीसाठी सुमारे 300 नागरिकांनी गुरुवारी (दि.29) दुपारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.
सुनील मोटे (वय ३३, रा. एकता नगर) असे मृत तरुणाचे नाव असून, आरोपीचे नाव अश्फाक राजू शेख (वय २३) आहे. काही महिन्यांपासून अश्फाकने परिसरात दहशत माजवली असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. असे असूनही पोलीस प्रशासनाकडून वेळेवर कारवाई न झाल्यामुळे शेवटी एका तरुणाचा जीव गेला, असा नागरिकांचा संतप्त आरोप आहे. २६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता घरासमोर बसलेल्या सुनील व त्यांच्या मित्र गोविंद भिसे यांच्यावर अश्फाकने अचानक हल्ला चढवला.
तसेच गोविंदला कटरने मारहाण केल्यानंतर सुनीलला त्याच्या छातीत, पोटात आणि डोक्याजवळ लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ‘जातिवाचक शिवीगाळ करुन, तुझे अभी खत्म कर दूंगा’ असे म्हणत हल्ला केला, असे सुनीलचे वडील एकनाथ मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
परिवार उघड्यावर; पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप
मारहाणीनंतर गंभीर जखमी सुनील काहीही न खाता-पिता झोपेतच पडून राहिला. तब्येत अधिक खालावल्याने २८ मे रोजी त्याला सहारा हॉस्पिटल व नंतर घाटीत नेण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. सुनील मोटे हे आपल्या कुटुंबातील एकमेव कमवते होते. काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह मोडला होता आणि अलीकडेच पुन्हा विवाहासाठी बोलणी सुरू होती. त्यांचा दुर्दैवी मृत्यू कुटुंबावर आर्थिक व मानसिक आघात करून गेला आहे.
संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, तक्रारीकडे सुरुवातीला दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी जमावाशी संवाद साधून त्यांना शांत केले. या प्रकरणात आरोपीविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पुढील तपास तातडीने सुरू करण्यात आल्याचे गाडे यांनी सांगितले आहे.