कर्जत : कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायमच प्रयत्न करत असतात. तसेच मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते कायम तत्पर असतात. अशातच कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी २० वर्षांपूर्वी कुकडी डाव्या कालव्यात संपादित झाल्या होत्या. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही.
अखेर आमदार रोहित पवार यांनी या विषयात स्वतः विशेष लक्ष घातलं आणि शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळावा यासाठी शासन स्तरावर वेळोवेळी प्रयत्न केले. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून २० वर्षांपूर्वी कुकडीच्या डाव्या कालव्यात जमीन संपादित झालेल्या कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक, कोरेगाव व करपडी येथील शेतकऱ्यांना ४ कोटी ३२ लाख रुपये एवढी रक्कम सरकारने मंजूर केली आहे. राज्य सरकारतर्फे थेट शेतकऱ्यांना तब्बल २० वर्षानंतर भूसंपादनाचा मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्या २० ते २५ वर्षात जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांना केवळ ५-६ कोटी रुपये रक्कम मंजूर झाली होती. पण रोहित दादा आमदार झाल्यानंतर त्यांनी शासनाकडून तब्बल १४० कोटीच्या आसपास रक्कम मंजूर करून आणली. यातून शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागतोच शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा तालुक्यात आल्यानंतर तालुक्यातील आर्थिक उन्नती होण्यासाठी पण त्याचा फायदा होतो.
[read_also content=”आ. रोहित पवारांच्या माध्यमातून होणार नांदणी नदीचे पुनरुज्जीवन; १७ गावांना होणार फायदा! https://www.navarashtra.com/maharashtra/come-on-nandani-river-to-be-revived-through-rohit-pawar-17-villages-will-benefit-nrdm-276453.html”]
यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना शब्द दिला होता की त्यांना त्यांचा हक्काचा मोबदला शासनाकडून मिळवून देण्यात येईल, रोहित पवारांनी दिलेला शब्द पाळत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लावला आहे आणि आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भूसंपादनाची रक्कम मिळणार आहे. येत्या काळातही मतदारसंघातील सर्वच स्तरातील नागरिकांच्या सोयीसाठी सतत झटत राहील व दोन्ही तालुक्यांच्या विकासासाठी व प्रलंबित असलेले नानाविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.