कल्याण : मेल एक्सप्रेसमध्ये फेरीवाला बनून प्रवाशांचे मोबाईल पर्स आणि दागीने चोरणाऱ्या टोळीला मुंबई रेल्वे एसटीएफ पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी जवळपास ९ लाखाचा चोरीचा माल हस्तगत केला आहे. ज्यामध्ये दागिने, १७ मोबाईल, महागडी घड्याळे याचा समावेश आहे. अटक आरोपींची नावे रामेश्वर साहनी, खूबलाल महतो, विनोद महतो अशी आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर आत्तापर्यंत ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. ज्यामध्ये इतक्या मोठया प्रमाणात चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.
मेल एक्सप्रेसमध्ये एसीच्या डब्यात प्रवाशांचे किंमती वस्तू चोरीला जाणे अशा बऱ्याच घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या हाेत्या. पनवेल स्थानकात आणि आसपास जास्त गुन्हे घडले हाेते. पूर्णिमा बेन शर्मा ही महिला एन्राकुल्लम निजामउद्दीन या एक्सप्रेस प्रवास करीत असताना १३ एप्रिल रोजी त्या अचानक वाशरूम मध्ये गेल्या तेव्हा त्याची पर्स सीटवर होती. त्या परत आल्या तर त्यांची पर्स त्याजागेवरून गायब होती. त्यांच्या पर्समध्ये मोबाईल, एटीएम कार्ड आणि दागिने होते. या प्रकरणाची तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आली. सातत्याने होत असलेल्या गुन्ह्यामुळे या तपासाकरीता रेल्वे पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, मनोज पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश चिंचरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरशूद्दीन शेख , हेमराज साठे, दीपक शिंदे, रविंद्र दरेकर, प्रवीणसिंग धागे, सुनिल कुंभार, विकास नलगे, सतीश फडके, जयेश थोरात, गणेश महागावकर, वृषाली मयेकर, मिलिंद पाटील, प्रमोद दिघे, मयूर पाटील, नितीन भराडे, सुनील महागाडे यांच्या पथकाने तपास सुरु केला.
अखेर चोरीस गेलेले एक एटीएम कार्ड वापरण्यात आले होते. त्यातील व्यवहारामुळे पोलिसांना सुगावा लागला. अखेर या प्रकरणी रत्नागिरीहून तीन जणांना पोलिसांना अटक केली हे तिघे परप्रांतीय आहे. गाडीत फेरीवाला बनून प्रवास करायचे. संधी साधून प्रवाशांच्या किंमती वस्तू चोरायचे. या तिघांकडून आठ लाख ५८ हजार २८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये चार लाख ५० हजार रुपयांचे दागिने, महागडे घड्याळ, १७ मोबाईल हस्तगत केले आहे.