मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याऐवजी उद्धव ठाकरे यांना सबुरीचा सल्ला द्यावा, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मर्यादा पाळाव्यात, असा सल्ला दिला आहे. शरद पवारांचे राजकीय वैरी असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी यावरुन शरद पवारांवर टीका केली.
सोलापुरात चार हुतात्मा पुतळा येथे सुशोभीकरण कार्यक्रमाप्रसंगी विखे पाटील बोलत होते. विखे पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांना सल्ला देऊन आपण एका राजकीय जबाबदार व्यक्ती आहात असे सांगावे. उद्धव ठाकरेंना यांनाच या सल्ल्याची अधिक गरज आहे. मविआ काळात राज्य अधोगतीकडे जात आहे. मात्र, आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकास करत आहे.
विखे पाटील म्हणाले, राज्यात विकासाचे काम सुरू झाले असून थोर महापुरुषांचे विचार जपले पाहिजे या उद्देशाने सोलापुरातील चार पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी आदी उपस्थित होते. सोलापूरच्या दौऱ्यात महापालिकेवर वर्चस्व असलेले आमदार विजयकुमार देशमुख दुपारपर्यंत कुठल्याही कार्यक्रमात हजेरी लावली नाही. त्यामुळे त्यांच्या गैरहजरेची चर्चा यावेळी होती.






