अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : एकीकडे एसटीचा संप सुरू असतानाच अहमदनगर शहरामध्ये एका वाहकाचा मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात एसटी वाहकाने शेवटचा श्वास घेतला.
विजय महादेव राठोड (वय ४२, राहणार बुर्हाणनगर, तालुका नगर) असे मृत एसटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. मूळचे नगर येथील राठोड हे कल्याण डेपोमध्ये वाहक म्हणून नोकरीस होते. गेल्या आठवड्यापासून ते नगर येथे आहेत.
तारकपूर येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातही ते सहभागी झाले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
दिवाळीचा बोनस नाही…
त्यांचा पगार सात हजार रुपये इतका झाला होता. दिवाळीचा बोनस ही मिळालेला नव्हता. लॉकडाऊन काळात केलेल्या कामाचा मोबदलाही त्यांना मिळाला नाही. सात हजार रुपयात घर खर्च कसा चालणार या चिंतेत ते होते. गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांनी जेवणही घेतले नव्हते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटूंबीय आणि नातेवाईकांनी केला आहे.