सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या पहिल्याच धनुर्विद्या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला समारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते 100 फुटी डीपी रोड, सर्वे नंबर 9, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शेजारी, कर्वेनगर, पुणे येथे पार पडला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, संकुलाच्या उभारणीसाठी प्रेरणा देणाऱ्या माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, संकुलाच्या उभारणीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने, माजी नगरसेवक सचिन दोडके, महापालिकेचे पुणे महापालिका भवन विभागाचे मुख्य अभियंता रोहिदास गव्हाणे, कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे, क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ आढाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुळे म्हणाल्या, सरकारला विरोधासाठी विरोध करण्याची आपली भूमिका नाही. सरकार बरोबर आपले मतभेद असले तरी मनभेद नाही, असे सांगताना सुळे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी सुरू केलेल्या खेलो इंडिया, या योजनेमुळे अनेक खेळाडू तयार झाल्याचे नमूद केले. मागील चार वर्षात महापालिका निवडणुका न झाल्यामुळे कोणतेही पद नसताना देखील आपल्या प्रभागात कामांचा धडाका सुरू ठेवणाऱ्या माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांचे सुळे यांनी कौतुक केले.
राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जाती जातीत आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करणे संविधान विरोधी असून, ते देशासाठी आणि भावी पिढ्यांसाठी घातक आहे, याची जाणीव यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी करून दिली. विविधता हे भारताचे वैशिष्ट्य आहे आणि बलस्थानही आहे. जाती धर्माच्या नावाखाली समाजात तेढ उत्पन्न करणे घटनेच्या विरोधात आहे. ही तेढ नष्ट करून एकी कायम ठेवण्यासाठी अपप्रवृत्तीच्या विरोधात संपूर्ण समाजाने संघर्ष करणे आवश्यक आहे. मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. शिव भोजन थाळी चे पैसे तब्बल आठ महिन्यांपासून दिले गेलेले नाहीत. त्यामुळे शिवभोजन थाळी पुरविणाऱ्या महिलांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून तब्बल 25 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. गुंतवणूक आणि औद्योगिक प्रगतीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिलेला नाही. उलट भ्रष्टाचारात मात्र महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. ही आकडेवारी खुद्द केंद्र सरकारने दिलेली आहे, असा दावाही सुळे यांनी केला.
सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे दौरे वाढलेले आहेत. केवळ महापालिका निवडणुकीला प्राधान्य न देता मुख्यमंत्र्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सातत्याने बैठका आयोजित करून पुण्याचे वाहतूक, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्था हे प्रश्न सोडवण्यालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन सुळे यांनी केले. सातत्याने प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांना आवरण्याचे आवाहन देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
सध्याच्या काळात सर्व स्तरांवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. ही सत्ता राबवून लोकांची कामे न करता जय श्रीराम च्या घोषणा देऊन धार्मिक तेढ वाढवण्याचे काम केले जात आहे. महागाई, बेरोजगारी या समस्या वाढतच आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत केवळ घोषणाबाजी करणाऱ्यांना मते न देता नागरिकांनी खरे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडून आणावे, असे आवाहन प्रशांत जगताप यांनी यावेळी केले.
स्वप्निल दुधाने यांनी नियोजित धनुर्विद्या क्रीडा संकुलाच्या तयारीसाठीचा चार वर्षापासूनचा प्रवास प्रास्ताविकात कथन केला. गरीब वर्गातील मुलांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता आहे. त्याचे चीज व्हावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना सुविधा मिळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळाल्याचेही ते म्हणाले.