File Photo : Solapur ZP
सोलापूर : राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्याचा धसका अनेकांनी घेतला आहे. सोलापुरात झेडपीतील तीन डॉक्टरांनी राजीनामे दिल्याचे समोर आले आहे. राज्याच्या आरोग्य आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे. आरोग्य सेवेची मुंढे यांनी प्रत्यक्ष तपासणी सुरू केली आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील तीन डॉक्टरांनी कार्यकाल पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे. या डॉक्टरांनी राजीनामे मागे घ्यावेत म्हणून मनपरिवर्तन करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अधिकार्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. एनआरएचएममधील आरोग्य सेवक हे नियुक्तीच्या ठिकाणीच काम करतील. या अभिनातील कर्मचार्यांची पदस्थापना कोणत्याही स्थितीत परस्पर बदलता येणार नाही, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रतिनियुक्तीस असलेल्या कर्मचार्यांनी आपल्या मूळ कामाची ठिकाणी तात्काळ हजर रहावे, असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी जारी केले आहेत. त्यामुळे मुख्यालयात ठाण मांडणार्या कर्मचार्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली आहे.
आरोग्य विभागात सन्नाटा
जिल्हा आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या समुपदेशनाद्वारे एप्रिलमध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या. पण बर्याच कर्मचार्यांना बदलीचे आदेश दिले नव्हते. मुंढे यांच्या पवित्र्यानंतर बदल्यांच्या आदेशावर सह्या झाल्याचे सांगण्यात आले. मुख्यालयात बदली मागणार्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी काम करणे आता पसंत केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य विभागात होणारी गर्दी कमी झाली आहे. कार्यालयात सन्नाटा पसरल्याचे चित्र पहावयास मिळाले.