शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केला आहे. (फोटो -सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला आहे. राजकीय वर्तुळामध्ये मात्र दसरा मेळाव्याची चर्चा सुरु आहे. विविध पक्षांचे नेते हे दसरा मेळावा घेणार आहे. पण ही परंपरा शिवसेना पक्षाने सुरु केली आहे. मात्र शिवसेनेमध्ये बंडाचे राजकारण झाल्यानंतर दोन दसरे मेळावे होऊ लागले. पहिल्याच वर्षी ठाकरे गट व शिंदे गटामध्ये दसरा मेळाव्याच्या मैदानावरुन वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर नक्की कोणाचा आवाज घुमणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आता ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लाखो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी येणार असून जय्यत तयारी सुरु असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले की, “आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे. “सध्या अराजक माजलं आहे. त्यामुळे आम्ही अराजकीय गाणं आणलं आहे. दसऱ्याला सर्व गोष्टींचा फडशा पाडणार आहे.”, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : काँग्रेस नेत्याचे ‘स्वातंत्र्यवीरां’बद्दल वादग्रस्त विधान: फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल…”
तीन महिन्यांपूर्वी अर्ज
उद्धव ठाकरे गटाने तीन महिन्यांच्या आधीपासून तयारी सुरु केली आहे. दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजेच शिवाजी पार्कवर घेण्यात येण्याची तयारी केली जात होती. ठाकरे गटाकडून तीन महिन्यांपूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र तीन महिने पालिकेने अर्ज रखडवला होता. महेश सावंत यांनी या परवानगीसाठी पालिकेला तीन वेळा स्मरणपत्र देखील पाठवले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा होणार असल्याचे जाहीर केले आहे.
शिंदे गटाचा दसरा मेळावा
शिवसेना शिंदे गटाचा देखील दसरा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये हा तिसरा मेळावा असणार आहे. पहिल्या वर्षी दोन्ही गटातील मैदानाचा वाद न्यायालयापर्यंत गेला होता. त्यानंतर आता शिंदे गटाने शिवाजी पार्क सोडून बीकेसी मैदानावर मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या वर्षी देखील बीकेसी मैदानावर झाला होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी आझाद मैदानावरुन शिंदे गटाने दसऱ्याच्या मुहूर्तावर भाषण केले. त्यानंतर यंदाच्या वर्षी बीकेसी मैदानावरुनच शिंदे गटाचा आवाज घुमणार आहे.