पारगाव शिंगवे : सदानंदाचा यळकोटचा गजर आणि भंडारा खोबऱ्याची उधळण करीत पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंबेगाव तालुक्यातील नागपूर येथील श्रीक्षेत्र थापलिंग येथील खंडोबा देवाचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हवेली, पारनेर, संगमनेर, आदी तालुक्यातील भाविक या यात्रेला आले होते. लाखो भाविकांनी रांगेत दर्शन घेतले. तळी भंडाराची उधळण करुन नवसपूर्तीची जागर गोंधळे घालण्यात आली.
जिल्ह्यात थापलिंग खंडोबा देवाचा बैलगाडा शर्यतीचा घाट प्रसिद्ध आहे. या घाटातून नवसपूर्तीचे बैलगाडे पळवण्यात येतात. या यात्रेपासून जिल्ह्यातील गावोगावाच्या ग्रामदेवतेच्या यात्रेला सुरुवात होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी घाटातून नवसाचे बैलगाडे धावले. भाविकांनी बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला.
यात्रेनिमित्त पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम व उपाध्यक्ष गणेश म्हस्के, सरपंच गणेश यादव, उपसरपंच सुनील शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष दौलतराव भोर, दगडू पवार, तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी यात्रेची व्यवस्था पाहिली. आरोग्य विभागाने आरोग्याच्या सुविधा पुरवल्या होत्या. थापलिंग देवस्थान वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सेवा उपलब्ध केली होती.
भाविकांनी लुटला यात्रेचा आनंद
यात्रेत भाविकांनी जिलेबी, भजी, शेव रेवडीचा स्वाद घेतला. लहान मुलांनी पाळण्यात बसण्याचा आनंद लुटला. तसेच शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी केली एका दिवसात सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाली. मुंबई, पुणे इत्यादी शहरात नोकरी आणि व्यावसायिका निमित्ताने बाहेर असलेले चाकरमानी आपल्या कुटुंबासह व मित्रमंडळीसह यात्रेला हजेरी लावून यात्रेचा आनंद लुटला.