(फोटो सौजन्य: Pinterest)
अमरनाथ यात्रा ही एक प्रसिद्ध हिंदू तीर्थयात्रा आहे, जी जम्मू आणि काश्मीरमधील अमरनाथ गुहेत होते. येथे भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही यात्रा लवकरच सुरु केली जाणार आहे. यंदा ३ जुलै २०२५ पासून यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रेला धार्मिक महत्त्व जरी प्राप्त झालं असलं तरी ही यात्रा देशातील सर्वात कठीण आणि खडतर यात्रा मानली जाते. एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही लोक घाबरले आहेत, परंतु प्रशासनाने कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
अमरनाथ यात्रेला कसे पोहोचायचे?
अमरनाथ यात्रा दोन मार्गांनी होते, एक म्हणजे पहलगाम तर दुसरी म्हणजे बालताल. दोन्ही मार्गांचे अनुभव आणि अंतर वेगवेगळे आहे. जर तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल तर श्रीनगरला थेट विमानसेवा उपलब्ध आहे. तर, ज्यांना रेल्वेने प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी देशातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या शहरातून जम्मूला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. जम्मूला पोहचल्यानंतर तुम्हाला यात्रेचा परवाना अथवा एक स्लिप घ्यावी लागेल. त्यानंतर बस किंवा टॅक्सी करून तुम्ही बालटाल किंवा पहलगामला जाऊ शकता. बसचं भाडं ७०० रुपयांपासून सुरु आहे. जर तुम्ही श्रीनगर विमानतळावरून थेट टॅक्सी घेतली तर शेअरिंग टॅक्सीचे भाडे ८०० ते १००० रुपये आणि खाजगी टॅक्सीचे भाडे ३००० ते ४००० रुपये आहे.
राहण्याची सोय
बालटालमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. इथे तुम्हाला तंबूमध्ये राहायला लागेल , ज्याची किंमत ५०० रुपये आहे. काही ठिकाणी तुमची राहण्याची सोया मोफत देखील होऊ शकते. परंतु फार गर्दी असल्याकारणाने लवकरात लवकर तिथे पोहचणे फार गरजेचे आहे.
दर्शनाची पद्धत आणि महत्त्वाच्या गोष्टी
बालटालपासून गुहेचे अंतर सुमारे १४ किमी आहे आणि प्रवेश डोमेल गेटपासून आहे. तर पहलगामपासून अंतर सुमारे ३२ किमी आहे आणि प्रवेश चंदनवाडीपासून आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला एक RFID कार्ड घ्यावे लागेल, ज्याची फी २५० रुपये आहे. या कार्डाशिवाय तुम्हाला येथे प्रवास करण्याची परवानगी दिली जात नाही.
प्रवेश वेळ?
डोमेल गेटवरून प्रवेश पहाटे ४ ते सकाळी १० वाजेपर्यंत आहे. त्यानंतर तुम्ही प्रवास सुरू करू शकता. वाटेत तुम्हाला अनेक भंडारे लागतील ज्यात तुम्हाला मोफत अन्न खायला मिळेल. जर तुम्हाला पायी जायचे नसेल तर घोडा किंवा पालखीचा पर्याय उपलब्ध असेल. घोड्याचे भाडे एका बाजूसाठी २००० ते २५०० रुपये आणि दोन्ही बाजूंसाठी ४ ते ५ हजार रुपये आहे. एका बाजूसाठी पालखीची किंमत सुमारे ८ हजार रुपये येते. तथापि, घोडा किंवा पालखीने जरी गेलात तरी शेवटचा १ किलोमीटर पायीच पार करावा लागतो.
या देशात २०० रुपयांहून स्वस्त आहेत हॉटेल्स; लग्झरी रूम अन् पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण
लवकर दर्शनासाठी काय करावे?
गर्दीशिवाय दर्शन हवे असेल तर सकाळी लवकरच निघा. गर्दीशिवाय दर्शन घ्यायचे असेल तर सकाळी लवकर निघा. डोमेलपासून सुरुवातीचे २ किमी अंतर बॅटरी रिक्षा किंवा लहान बसने कापता येते, ज्यामुळे पायी प्रवास थोडा सोपा होतो. प्रवास सुरू करण्यापूर्वी, रजिस्ट्रेशन करा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. जर तुम्ही पहिल्यांदाच अमरनाथ यात्रेला जात असाल तर अनुभवी व्यक्ती किंवा टूर ऑपरेटरचा सल्ला घ्या. बाबा बर्फानीला भेटण्यासाठीचा हा प्रवास निश्चितच कठीण आहे मात्र तुम्ही पूर्ण श्रद्धेने किंवा मनोभावनेने हा प्रवास केला तर तुम्हाला हा एक खास अनुभव देऊन जाईल.