(फोटो सौजन्य: Pinterest)
हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पीती जिल्ह्यात वसलेली स्पीती घाटी ही भारतातील सर्वात सुंदर, शांत आणि रहस्यमय ठिकाणांपैकी एक मानली जाते. ही एक थंड, कोरडी पर्वतीय दरी आहे, जिला चारही बाजूंनी बर्फाच्छादित डोंगर, प्राचीन बौद्ध मठ आणि निळाशार आकाश वेढून टाकतं. ही दरी समुद्रसपाटीपासून सुमारे १२,५०० फूट उंचीवर आहे आणि तिची वेगळी भौगोलिक रचना आणि संस्कृती यामुळे ती भारताच्या पर्यटन नकाशावर एक वेगळी ओळख निर्माण करते.
या देशात २०० रुपयांहून स्वस्त आहेत हॉटेल्स; लग्झरी रूम अन् पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण
स्पीती दरीचं खास वैशिष्ट्य काय?
स्पीती दरीचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी सुमारे सहा महिने ही दरी भारताच्या इतर भागांपासून पूर्णपणे अलग राहते. विशेषतः नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत येथे अत्यंत थंडी असते आणि मनालीहून स्पीतीकडे जाणारा कुंजुम पास रस्ता संपूर्ण बर्फाने झाकलेला असतो. त्यामुळे हा मार्ग बंद होतो आणि दळणवळण पूर्णपणे थांबते. अशा परिस्थितीत येथे पोहोचण्यासाठी केवळ हवाई मार्ग किंवा शिमला मार्गे पोहोचणे शक्य असते – तेही थोड्याशा धोकादायक व कठीण परिस्थितीत.
स्पीतीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणता?
जर तुम्हाला स्पीती दरीचे सौंदर्य अनुभवायचे असेल, तर जून ते सप्टेंबर हा काळ सर्वोत्तम मानला जातो. या काळात बर्फ वितळलेला असतो, रस्ते खुले असतात आणि हवामान प्रवासासाठी अनुकूल असते. याच वेळी पर्यटक येथे बाइक ट्रिप, ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि बौद्ध मठांची सैर यांचा आनंद घेतात. तसेच, जुलै महिन्यात आयोजित होणारा लदारचा महोत्सव हे येथील पारंपरिक आणि सांस्कृतिक आकर्षण ठरते.
स्पीती दरी किती आकर्षक आहे?
स्पीती दरीला अनेकदा “मिनी तिबेट” असेही म्हटले जाते, कारण येथील संस्कृती, बांधकामशैली आणि जीवनशैली तिबेटी बौद्ध परंपरेशी खूप मिळती-जुळती आहे. की मठ, धंकर मठ, किब्बर गाव आणि चंद्रताल सरोवर ही ठिकाणं इतकी सुंदर आहेत की पोस्टकार्डवर छापावी अशी वाटतात. बर्फाच्छादित शिखरं, शांत नदी आणि निळसर आकाश हे दृश्य या ठिकाणी जादुई अनुभव निर्माण करतात. येथे प्रत्येक क्षण हा कॅमेऱ्यात कैद करण्यासारखा असतो.
उत्तराखंडमधील या ठिकाणाला म्हटले जाते भारतातील पहिले गाव, फक्त इथेच घडते सरस्वती नदीचे दर्शन
हवामान कसं असतं?
स्पीती दरीचं तापमान वर्षभर खूपच कमी असतं. मे ते ऑगस्ट या उन्हाळ्याच्या काळात दिवसा तापमान १५°C ते २०°C दरम्यान असतं, तर रात्री ०°C ते ५°C पर्यंत खाली येतं. थंडीच्या महिन्यांत म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान तापमान -२०°C पर्यंत खाली घसरतं. त्यामुळे येथे येण्यापूर्वी गरम कपडे, औषधं आणि उंचीशी संबंधित तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे.जर तुम्ही गर्दीपासून दूर, शांत आणि निसर्गरम्य हिमालयी सौंदर्य अनुभवायचं ठरवलं असेल, तर स्पीती दरी हे तुमच्यासाठी एक परिपूर्ण पर्यटनस्थळ ठरू शकतं.