संग्रहित फोटो
पुणे : अलीकडील काही वर्षांमध्ये बालकांच्या डोळ्यांशी संबंधित तक्रारींमध्ये चिंताजनक वाढ लक्षात येत आहे. ‘ऑर्बिस’च्या २०२० च्या अहवालानुसार, भारतात शून्य ते १५ वर्षे वयोगटातील अंदाजे १ हजारांपैकी १ मूल अंध आहे. भारतासारख्या एका देशात अंध मुलांची ही सर्वात मोठी संख्या आहे. आजच्या डिजिटल युगात मुले तासन्तास वेळ हा पुस्तके, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि स्क्रीन यांच्यासोबत घालवतात. पालकही त्यांचा अभ्यास, खाणेपिणे व शारीरिक वाढीकडे लक्ष देतात, मात्र यामध्ये त्यांच्या आरोग्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘डोळे’ या अवयवाकडे सोईस्कररीत्या दुर्लक्षित होते.
लवकर दिसणारी मात्र दुर्लक्षित होणारी लक्षणे
मुलांकडून वारंवार डोळे चोळणे, टीव्ही पाहताना किंवा वाचन करताना डोळे बारीक करणे, डोके वाकवणे किंवा एक डोळा झाकणे ही तशी पाहता सामान्य वाटणारी लक्षणे खरेतर तुमच्या मुलांमध्ये दृष्टिदोष असल्याची चिन्हे असू शकतात. स्क्रीनच्या जवळ बसणे, वारंवार पापण्यांची उघडझाप करणे, जवळचे काम टाळणे, फळ्यावरून पाहून लिहिताना चुका करणे किंवा ते करताना त्रास होणे ही देखील न ओळखलेल्या डोळ्यांच्या समस्या असू शकतात. पालकांना मुलांचे हे वागणे किंवा लक्षणे यांना थकवा, आळशीपणा किंवा लक्ष न देणे याचे लेबल लावतात. परंतु प्रत्यक्षात हे डोळ्यांची समस्या असल्याचा लवकर मिळणारा इशारा असू शकतो.
मुलांमध्ये सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या डोळ्यांच्या समस्या
डोळ्यांचा अपवर्तन दोष (रिफ्रॅक्टिव्ह एरर) जसे ‘मायोपिया’ (दूरच्या वस्तू अस्पष्ट किंवा धूसर दिसणारा दूरदृष्टीदोष) झपाट्याने वाढत आहे. ‘मायोपिया’मध्ये जवळची वस्तू स्पष्ट तर दूरची वस्तू अस्पष्ट दिसते. मैदानी खेळांचे कमी झालेले प्रमाण, घरातील उपक्रमांचे वाढते प्रमाण व दीर्घकाळ स्क्रीनसमोर वेळ घालवणे हे या डोळ्यांच्या दृष्टीदोशांशी संबंधित आहे. तिरळेपणा ही अजून एक सामान्य समस्या असून यामध्ये डोळे एकमेकांच्या तुलनेत सरळ दिसत नाहीत. ते कधी स्पष्ट तर कधी सौम्य स्वरूपात जाणवते. दुसरी समस्या म्हणजे ‘अॅम्ब्लायोपिया’ ज्याला आळशी डोळा (लेझी आय) असेही म्हणतात. यामध्ये एक डोळ्याची दृष्टी सामान्य असते तर दुसऱ्या डोळ्याची दृष्टी कमी प्रमाणात असते. हा विकार फक्त एका डोळ्यात असल्यास तो अनेकदा दुर्लक्षित होतो. याशिवाय, शहरी भागात ‘अॅलर्जिक कंजंक्टिव्हायटिस’ देखील वाढत आहे. थोडक्यात जास्त स्क्रीनच्या वापरामुळे डिजिटल डोळ्यांचा ताण (डिजिटल आय स्ट्रेन) ही नवी समस्या झाली आहे. अभ्यास सांगतो की २०५० पर्यंत जगातील जवळजवळ अर्धी लोकसंख्या ‘मायोपिया’ने प्रभावित होऊ शकते.
डोळ्यांच्या समस्या दुर्लक्षित केल्याचा धोका
अभ्यास करताना तसेच वाचन, लेखन व एकाग्रता यामध्ये मुले मागे राहतात व शाळेत त्याचे लक्ष कमी होते. कमी दृष्टीमुळे समाजात वावरतानाचा आत्मविश्वास घटतो. तसेच एकटेपणा येतो, खेळांमध्येही सहभाग कमी होतो. वर्तनात्मकदृष्ट्या त्यांच्यामध्ये चिडचिड होते व निराशा दिसून येते. यामुळे मुलांना चुकीने आळशी किंवा लक्ष न देणारे असे लेबल लावले जाण्याचा धोका असतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दृष्टी ही मेंदुविषयक (न्यूरोलॉजिकल) वाढीशी संबंधित असल्याने मुलांच्या डोळ्यांच्या विकारांकडे वेळेत लक्ष न दिल्यास मेंदूच्या विकासावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
मुलांचे डोळे कधी तपासावेत?
जर मूल प्रिमॅच्युअर म्हणजे वेळेआधी जन्मले असेल तर लगेचच तपासावेत. तसेच, डोळ्यांच्या आजारांचा कौटुंबिक इतिहास असेल किंवा डोळ्यात पांढरा पडदा दिसत असेल तरी तपासावेत. मुल सहा महिन्यांचे झाल्यावर त्याच्यामध्ये विकासात्मक विलंब, तिरळेपणा किंवा डोळ्यांना डोळे थेट भिडवत नसेल तर नेत्ररोगतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. तीन ते पाच वर्षांच्या वयोगटात लक्षणे नसली तरी प्रत्येक मुलाने संपूर्ण डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. हा वयोगट दृष्टी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
पालकांनी घरी काय करावे?
मुलांचे डोळे सुरक्षित ठेवणे हे अवघड काम नाही. त्यासाठी २०-२०-२० हा नियम अवलंब करावा. म्हणजे प्रत्येक २० मिनिटांच्या स्क्रीन टाइमनंतर, २० सेकंद २० फूट दूरच्या वस्तूकडे पाहावे. २ वर्षांखालील मुलांना स्क्रीन टाळावी. २ ते ५ वयाच्या मुलांसाठी दिवसाला जास्तीत जास्त १ तास स्क्रीन, तर मोठ्या मुलांसाठी २ तासांपेक्षा जास्त स्क्रीन पाहायला देऊ नका.
मुलांमधील डोळ्यांच्या बाबत छोटी – छोटी लक्षणे ओळखून, त्यांच्यामध्ये निरोगी सवयी जोपासून आणि नियमित नेत्रतपासणीला प्राधान्य देऊन पालक आपल्या मुलांना केवळ स्वच्छ दृष्टीच नव्हे तर अभ्यास, खेळ व दैनंदिन जीवनातही प्रगती करण्यास मदत करू शकतात. शेवटी, आजचे निरोगी डोळे म्हणजे उद्याचे उज्ज्वल, स्वच्छ भविष्य आहे.
लेखक : डॉ. निशा चौहान (सल्लागार नेत्ररोगतज्ज्ञ, आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे)