संग्रहित फोटो
पुणे : मेंदूतील गाठी (ब्रेन ट्यूमर) म्हटले की, तीव्र डोकेदुखी हे लक्षणे सर्वसाधारणपणे त्याच्याशी जोडले जातात. मात्र तज्ज्ञांच्या मते, मेंदूतील गाठीची काही सुरुवातीची जाणवणारी लक्षणे खूपच सूक्ष्म असू शकतात. वर्तनातील बदल, दृष्टीसंबंधी समस्या, स्मरणशक्ती कमी होणे आणि अगदी कारण कळून न येणारे झटके (सीझर्स) ही अशी लक्षणे आहेत. याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात किंवा तणाव, वाढते वय, जीवनशैलीशी संबंधित समस्या म्हणून पाहतात.
जागतिक ब्रेन ट्यूमर दिन २०२६ निमित्त, मेंदूविकारतज्ञ (न्यूरोलॉजिस्ट) नागरिकांना या कमी परिचित लक्षणांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. कारण लवकर निदान झाल्यास उपचारांचे परिणाम लक्षणीयरीत्या सुधारू शकतात. वर्तन आणि व्यक्तिमत्त्वातील बदल, अनेकदा दुर्लक्षित होणारा इशारा, मेंदूतील गाठीचे सर्वात जास्त दुर्लक्षित होणारे लक्षण म्हणजे वर्तन किंवा व्यक्तिमत्त्वात अचानक होणारा बदल. एखादी व्यक्ती असामान्यपणे आक्रमक, एकलकोंडी, भावनिकदृष्ट्या अस्थिर झाली आहे किंवा तिची निर्णयक्षमता व योग्य-अयोग्य ठरविण्याची क्षमता कमी झाली आहे, ही बाब कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येऊ शकते.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे येथील वरिष्ठ संचालक – न्यूरोसायन्सेस व न्यूरोसर्जन डॉ. राकेश रंजन यांच्या मते, फ्रंटल लोबमध्ये (मेंदूचा पुढील भाग) असलेल्या गाठीमुळे वर्तन, भावना आणि सामाजिक संवाद यामध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबीय अनेकदा ही लक्षणे तणाव, नैराश्य किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे असल्याचे समजतात. दृष्टीसंबंधी समस्या दुर्लक्षित करू नयेत. वारंवार धूसर दिसणे, दुहेरी दिसणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे किंवा बाजूची दृष्टी कमी होणे ही लक्षणे मेंदूच्या दृष्टीमार्गांवर पडणाऱ्या दाबाचे संकेत असू शकतात. डोळ्यांशी संबंधित कोणताही स्पष्ट आजार नसताना दृष्टीच्या समस्या कायम राहिल्यास न्यूरोलॉजिकल तपासणी करणे आवश्यक आहे.
प्रौढांमध्ये प्रथमच येणारे झटके तातडीने तपासणे गरजेचे
एखाद्या प्रौढ व्यक्तीला अपस्माराचा (एपिलेप्सी) पूर्व इतिहास नसताना झटका आल्यास त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. कारण न समजणारे झटके हे मेंदूतील गाठ किंवा इतर गंभीर न्यूरोलॉजिकल विकारांचे सुरुवातीचे लक्षण असू शकतात. स्मरणशक्ती कमी होणे आणि बोलण्यात अडचणी वाढता विसराळूपणा, योग्य शब्द शोधण्यात अडचण, दैनंदिन कामांमध्ये गोंधळ होणे किंवा बोलण्यात बदल होणे ही लक्षणे अनेकदा वाढत्या वयाशी संबंधित मानली जातात. मात्र ही लक्षणे अचानक दिसू लागल्यास किंवा हळूहळू वाढत असल्यास वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
गाठीची लक्षणे तिच्या स्थानानुसार बदलतात
मेंदूतील गाठीची लक्षणे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळी असू शकतात, कारण मेंदूचे विविध भाग वेगवेगळी कार्ये नियंत्रित करतात. फ्रंटल लोबमधील गाठ वर्तनात बदल घडवू शकते, तर टेम्पोरल लोबमधील (कानांच्या वरच्या भागाजवळ असलेला भाग) गाठ, स्मरणशक्ती आणि भाषण क्षमतेवर परिणाम करू शकते. सेरेबेलम (लघुमस्तिष्क) जवळील गाठीमुळे संतुलन राखण्यात आणि हालचालींच्या समन्वय साधण्यात अडचणी येऊ शकतात.
मुलांमध्ये वेगळी लक्षणे दिसू शकतात
लहान मुलांमध्ये सतत उलट्या होणे, डोकेदुखी, शरीर संतुलनाच्या समस्या, विकासात विलंब, शैक्षणिक कामगिरीत बदल किंवा चिडचिड ही मेंदूतील गाठीची व धोक्याची पूर्वसूचनेची लक्षणे असू शकतात. वेळेत उपचार सुरू होण्यासाठी पालक आणि काळजीवाहूंनी ही लक्षणे लवकर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वेळेवर केलेले स्कॅनिंग जीव वाचवू शकते
एमआरआय आणि सीटी स्कॅन यांसारख्या प्रगत निदान तंत्रज्ञानामुळे मेंदूतील गाठींचे लवकर निदान करणे शक्य झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, वेळेवर केलेल्या स्कॅनिंगमुळे उपचारांचे नियोजन लवकर करता येते आणि रुग्णांचे आयुर्मान तसेच जीवनमान सुधारण्यास मदत होते.
गैरसमजांमुळे उपचारांना विलंब होतो
मेंदूतील सर्व गाठी कर्करोगजन्य असतात किंवा त्यांच्यावर उपचार शक्य नसतात, असा एक सर्वसामान्य गैरसमज आहे. प्रत्यक्षात अनेक गाठी सौम्य असतात आणि शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, टार्गेटेड थेरपी (Targeted Therapy) किंवा विविध उपचारपद्धतींच्या संयोजनाद्वारे त्यांचे प्रभावी व्यवस्थापन करता येते. वैद्यकीय सल्ला घेण्यास होणारा विलंब हा अनेकदा गाठीपेक्षाही अधिक धोकादायक ठरू शकतो.
“मेंदूतील गाठ जीवघेणी होण्यापूर्वी मेंदू अनेकदा विविध इशारे देत असतो. वर्तनातील अचानक बदल, कारण न समजणारे झटके, सततच्या दृष्टीसमस्या, स्मरणशक्तीतील अडचणी किंवा बोलण्यात होणारे बदल याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. वेळेवर न्यूरोलॉजिकल तपासणी आणि इमेजिंगद्वारे निदान झाल्यास उपचारांचे परिणाम आणि जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारू शकते. मेंदूतील गाठींविरुद्धच्या लढ्यात जागरूकता हेच आपले सर्वात प्रभावी साधन आहे,” असे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या न्यूरोसायन्सेस विभागाचे वरिष्ठ संचालक व न्यूरोसर्जन डॉ. राकेश रंजन यांनी सांगितले.






