तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, महागडे केमिकल प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त खरखरीत आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. बिघडलेल्या पचनक्रियेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरूम येण्याची शक्यता असते. याशिवाय तरुण वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. चेहऱ्यावर दिसू लागणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअरमध्ये बदल केला जातो तर कधी महागड्या ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण वारंवार केलेल्या ट्रीटमेंटमुळे त्वचा खूप जास्त सैल होऊन जाते. ज्याचा परिणाम उतार वयात दिसू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
उपवासाच्या दिवशी रताळ आवडीने खाल्ले जाते. पौष्टिक आणि शरीरासाठी गुणकारी असलेले रताळ नियमित खाल्ल्यास चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित रताळी खावी. सकाळच्या नाश्त्यात दोन किंवा तीन रताळ्याचे सेवन केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही शिजवलेलं किंवा भाजलेलं रताळं नियमित खाऊ शकता.
शरीरासाठी आवळा वरदान मानला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे मिठात घातलेले आवळे किंवा सकाळी उठल्यानंतर आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. आवळ्यामध्ये विटामिन सी, फायबर आणि इतर घटक आढळून येतात. आवळ्याच्या सेवनामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासोबतच त्वचा चमकदार आणि सुंदर होते.
सकाळी उठल्यानंतर नियमित चमचाभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास शरीर कायमच हेल्दी राहील. भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले घटक त्वचेला पोषण देतात. याशिवाय तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी मदत होते. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे त्वचेला ताकद मिळते. महिनाभर नियमित भोपळ्याच्या बिया किंवा इतर सीड्सचे सेवन केल्यास शरीरास त्वचेला अनेक फायदे होतील.
सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याआधी नियमित एक चमचा तूप खावे. तुपाच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. साजूक तूप त्वचेसाठी वरदान आहे. त्वचेच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुपाचे सेवन करावे. कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यायल्यास त्वचा हायड्रेट राहील.






