(फोटो सौजन्य: Pinterest)
गणेश चतुर्थी हा तो दिवस आहे ज्या दिवशी भगवान गणेशाचे आपल्या पृथ्वीलोकावर आगमन होते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला हा सण साजरा होतो. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे आणि संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. घराघरात या दिवशी बाप्पाची मूर्ती विराजमान होते आणि मोठ्या श्रद्धेने लोक बापाच्या मूर्तीची पूजा करतात.
Ganesh Chaturthi 2025 : गव्हाच्या पिठापासून झटपट बनवा कुरकुरीत तळणीचे मोदक
धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी गणपतीचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे, म्हणून याला गणपतीचा जन्मदिवस मानले जाते. गणपती हा बुद्धी आणि अडथळे दूर करणारा देव आहे, त्यामुळे त्याचे पूजन करून जीवनातील संकटे दूर होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. आता गणेशाला खुश करायचे असेल तर त्याच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य घरी करायलाच हवा. गणेशाच्या आवडीचा पदार्थ म्हटला की सर्वांच्या मुखात मोदक हा एकच पदार्थ येतो. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, गणेशाला फक्त मोडकंच प्रिय नाही तर इतरही असे काही पदार्थ आहेत जे गणेशाला प्रसादात अर्पण करणे फायद्याचे मानले जाते. आज आपण त्याचा पदार्थांची यादी जाणून घेणार आहोत.
लाडू
मोदकांनंतर बाप्पाच्या आवडीच्या पदार्थांमध्ये लाडूचा प्रामुख्याने समावेश होतो. पौराणिक कथेनुसार, बाप्पाला आणि त्याचे वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूषकराज यांना मोतीचूरचे लाडू खायला फार आवडतात. शुद्ध तुपापासून बनवलेले लाडू तुम्ही बाप्पाच्या प्रसादात अर्पण करू शकता.
श्रीखंड
बाप्पाच्या पूजेत श्रीखंडाला खास मान दिला जातो. दही, साखर, वेलदोडा पूड आणि ड्रायफ्रूट्स घालून गोडसर श्रीखंड तयार केला जातो, जो चवीला फार अप्रतिम लागतो. बाप्पाला श्रीखंडाचा हा नैवेद्य फार आवडतो अशी मान्यता आहे.
पुरणपोळी
चण्याची डाळ, गूळ वापरून बनवलेली स्टफिंग मैद्याच्या गोळ्यात टाकली जाते आणि त्याची छान पातळ पोळी तयार केली जाते जिला पुरणपोळी म्हणतात. ही पोळी महाराष्ट्राचा एक पारंपरिक पदार्थ असून गणेशोत्वात तो आवर्जून बनवला जातो.
नारळी भात
गोड पदार्थच नाही तर चविष्ट असा नारळी भातदेखील बाप्पाच्या विशेष आवडीचा आहे. गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बाप्पाच्या प्रसादात नारळी भाताचा भोग तयार केला जातो.
केळी
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला केळीचा नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातो. गणेशाला केळी आवडतात आणि बंगाली परंपरेनुसार त्यांनी कोला बो, म्हणजेच केळीच्या झाडासोबत बाप्पाने लग्न केलं होत. यामुळेच अनेकदा जेवण देखील केळीच्या पाण्यात वाढले जाते.
शिरा
बाप्पाच्या प्रसादात रव्याच्या शिऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. प्रसादाच्या शिऱ्यात खास करून रवा, तूप, ड्रायफ्रूट्स आणि केळी घालून हा शिरा तयार केला जातो. सत्यनारायणाच्या पूजेतही या शिऱ्याचाच प्रसाद तयार केला जातो आणि वाटलाही जातो.
खीर
खीर हा बाप्पाला प्रिय असणारा आणखीन एक मिष्टान्नाचा प्रकार. दुधापासून तयार केलेली कोणतीही खीर तुम्ही बाप्पाच्या प्रसादात अर्पण करू शकता. अनेक सणसमारंभातही घरी खीर बनवण्याची प्रथा आहे.
तूप आणि गूळ
बाप्पाला शुद्ध तुपात शिजवलेला गूळ देखील फार आवडतो. गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर तुम्ही बाप्पाला हे अर्पण करू शकता. तुम्हाला वाटल्यास तुम्ही गुळात खजूर आणि खोबरंही घालू शकता.
मुरमुऱ्यांचे लाडू
पौराणिक कथेनुसार, जेव्हा कुबेराने गणपतीला जेवणासाठी आमंत्रण दिले तेव्हा काही केल्या गणेशाचे पोट भरत नव्हते. अशात कुबराने देव शंकराकडे मदतीची हाक मारली ज्यानंतर शंकराने काही तांदूळ तळून गणेशाला अर्पण करण्याचा सल्ला दिला. यानंतर गणेशाची भूक भागली आणि गणेश जयंतीला मुरमुरा आणि गुळाचे लाडू अर्पण केले जाऊ लागले.
उकडीचे मोदक
अखेरीस सर्वांनाच ठाऊक असलेला बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक. तांदळाचे पीठ, खोबरं आणि गुळापासून हे उकडीचे मोदक तयार केले जातात. मोदक अनेक प्रकारे बनवले जातात पण त्यातही उकडीचे मोदक बाप्पाच्या आवडीचे मानले जातात.