जुलाब होत असतील तर काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
लूज मोशन आणि डिहायड्रेशनच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, विशेषतः तीन वर्षाखालील मुलांमध्ये याचे प्रमाण वाढले आहे. काही प्रकरणांमध्ये, नवजात बालकांना ताप आणि डिहायड्रेशनची लक्षणे दिसून येत आहेत. म्हणूनच पालकांनी या काळात विशेष खबदारी घ्यावी आणि विलंब न करता बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हंगामी बदलांमुळे केवळ प्रौढांमध्येच नाही तर मुलांमध्येही जुलाब आणि निर्जलीकरणाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये शरीरातील द्रवपदार्थ जलद गतीने कमी होऊ शकतात, विशेषत: जेव्हा त्यांना उलट्या किंवा ताप येतो. मुलांमध्ये डिहायड्रेशन लवकर होऊ शकते, ज्यामुळे त्वरित उपचार न केल्यास प्रकृती गंभीर होते आणि मुलांन रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.
जुलाब आजारात वाढ का?
आजारात वाढ का होतेय
या आजारांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे व्हायरल किंवा बॅक्टेरियाचे संक्रमण, अस्वच्छता, हवामानातील बदल किंवा दूषित अन्न आणि दुषित पाणी यामुळे होते. मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत असते तसेच त्यांच्या आतड्यांवर परिणाम करणारा संसर्ग होण्याची शक्यता असते. वारंवार जुलाब झाल्यास निर्जलीकरण होऊन बाळाची प्रकृती खालावते.
नवजात मुलांमध्ये सौम्य ताप देखील काहीवेळेस धोकादायक ठरु शकतो कारण त्यामुळे लगेचच निर्जलीकरण, तोंड कोरडे पडणे, डोळे खोलवर जाणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे असे प्रकार होतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि पालकांनी वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सध्या, १ ते ३ वयोगटातील १० पैकी ७ मुलांना एका महिन्यातच जुलाब आणि निर्जलीकरणाची समस्या आढळून आली आहे. ७ पैकी १ ते २ मुलांना निर्जलीकरण किंवा उच्च तापामुळे रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याची माहिती डॉ. विदुशी तनेजा(बालरोग आणि नवजात शिशू तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खराडी, पुणे) यांनी दिली.
काय सांगतात तज्ज्ञ
तज्ज्ञांनी दिला सल्ला
डॉ. अपोलो स्पेक्ट्रा पुणे येथील इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट आदित्य देशमुख सांगतात की, वाढते तापमान, संसर्ग आणि पुरेसे पाणी न पिण्यामुळे १ ते ३ वर्षे वयोगटातील लहान मुलांमध्ये जुलाब आणि डिहायड्रेशनच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दर आठवड्याला तीन वर्षाखालील सुमारे ६ ते ७ मुलं आणि ७-१५ वयोगटातील ८ ते ९ मुलं ओपीडीमध्ये उपचाराकरिता दाखल होत आहेत. मुलांमध्ये जुलाब आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी, पालकांनी मुलांना उकळून थंड केलेले पाणी आणि ओआरएस पिण्याची पाजावे. स्वच्छता राखणे, मुलांना नियमित हात धुण्याचा प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शिवाय, ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी घरी शिजवलेल्या अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे. जर १-२ दिवस जुलाब चालू राहिले तर दुर्लक्ष न करता त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या.
‘हे’ नैसर्गिक पेय उलट्या आणि जुलाबात देते आराम, जाणून घ्या घरगुती उपाय
नक्की काय करावे
डॉ. विदुशी तनेजा पुढे सांगतात की , जर मुलांना दिवसातून तीनपेक्षा जास्त वेळा जुलाब होत असतील, तसेच मुलांमध्ये सुस्तपणा, कोरडे ओठ, डोळे खोलवर जाणे किंवा स्तनपानास नकार देणे यासारखी लक्षणं आढळून येत असतील तर पालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. अतिसारासाठी उपचारांमध्ये ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) देणे, बाळाला स्तनपान सुरु ठेवणे समाविष्ट आहे.
वैद्यकीय सल्ल्याशिवाय अतिसारविरोधी औषधे देणे टाळावे. तापाची लक्षणे किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यास नवजात बालकांना तपासणीसाठी ताबडतोब रुग्णालयात आणले पाहिजे. मुलांना आहार देण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, पिण्याचे पाणी स्वच्छ उकळून व गाळून घेणे, उघड्यावरचे व दुषित अन्न टाळणे तसेच दूधाच्या बाटल्या आणि भांडी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. पहिले सहा महिने स्तनपानाची नितांत गरज असून ते नवजात बालकांना अनेक संसर्गांपासून सुरक्षित ठेवते. बाळाला निरोगी राहण्यास मदत करण्यासाठी वेळीच निदानव उपचार करणे आवश्यक आहे.
Loose Motions थांबविण्यासाठी घरगुती उपाय, पोटाची जळजळही होईल कमी
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.