भारत साजरा करतोय 79 वा स्वातंत्र्य दिन, जाणून घ्या यामागील इतिहास, महत्व आणि साजरा करण्याची पद्धत (फोटो सौजन्य: iStock)
Independence Day: कुठल्याही व्यक्तीसाठी त्याचे स्वातंत्र्य खूप महत्वाचे असते. जर ते त्याकडून हिरावून घेतले तर संघर्ष अटळ आहे. हेच स्वातंत्र्य ब्रिटिशांनी भारतीयांकडून हिरावून घेतले. तेही तब्बल 200 वर्ष! भारत देश पारतंत्र्यात गेल्यानंतर अनेक क्रांतिकाऱ्यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली. मग ते 1857 चा उठाव असो की जालियनवाला बाग हत्याकांड. इतिहासाच्या पानांवर आपल्याला अशा अनेक रक्तरंजित घटना पाहायला मिळतील, जिथे भारत मातेला पारतंत्र्यांपासून मुक्त करण्यासाठी प्रत्येक वयाच्या व्यक्तीने योगदान दिले. शेवटी, अखेर 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि या सुजलाम सुफलाम देशाचे पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले.
आज भारत 15 ऑगस्ट 2025 रोजी 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. हा मुख्य कार्यक्रम दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रध्वज फडकावतील, त्यानंतर राष्ट्रगीत, गार्ड ऑफ ऑनर आणि 21 तोफांची सलामी दिली जाईल. यानंतर पंतप्रधान देशाला आपल्या भाषणातून संबोधित करतील.
Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनाचा दिवस होईल आणखीनच गोड, घरी बनवून तर पाहा तिरंगा कुल्फी
200 वर्षांहून अधिक काळ भारताने ब्रिटिश राजवटीत घालवल्यानंतर अखेर 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य दिवस उजाडला. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मध्यरात्रीच्या आधी देशवासियांना संबोधित केले आणि पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकावले. तेव्हापासूनच, दरवर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचे नेतृत्व करतात.
स्वातंत्र्य दिन केवळ भारताच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली म्हणून साजरा केला जात नाही तर लोकशाही प्रजासत्ताक म्हणून देशाच्या प्रगतीवर चिंतन करण्याचा क्षण म्हणून देखील साजरा केला जातो.
स्वातंत्र्य दिन हा देशभरात साजरा केला जाणारा राष्ट्रीय सण आहे, ज्यामध्ये ध्वजारोहण समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि राज्यांच्या राजधानी, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी परेड होतात. हा दिवस स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या बलिदानाची आणि देशाच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याच्या सततच्या जबाबदारीची आठवण करून देतो. म्हणूनच तर या दिवशी आपल्याला एक गाणं आवर्जून ऐकायला मिळते. ते म्हणजे “ऐ मेरे वतन के लोगों”
काळानुसार स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची पद्धत बदलत चालली आहे. आज डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात अनेक जण ऑनलाईन तसेच डिजिटल कॅम्पेन मार्फत स्वातंत्र्य दिन साजरा करत असतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
ध्वजारोहण: देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्था ध्वजारोहण समारंभ आयोजित करतात. तसेच, आपल्या अवतीभवती असणाऱ्या सोसायट्यांमध्ये देखील ध्वजारोहण कार्यक्रम असतात.
सांस्कृतिक कार्यक्रम: शाळा, महाविद्यालये आणि सामुदायिक केंद्रात देशभक्तीवरील गाणी, नृत्य आणि नाटके असलेले सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केली जातात, जे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे चित्रण करतात आणि त्याचा समृद्ध वारसा दाखवतात.
परेड: सैन्य, पोलिस आणि शालेय विद्यार्थी परेडमध्ये भाग घेतात, शिस्त आणि एकता दर्शवतात.
चित्रपट प्रदर्शन: देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाबद्दल देशभक्तीवरील चित्रपट आणि माहितीपट या काळात प्रदर्शित होत असतात. हे चित्रपट पाहून अनेक जण स्वातंत्र्य दिन साजरा करत असतात.
डिजिटल कॅम्पेन: स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा आणि त्यांच्या योगदानाचे माहिती देण्यासाठी अनेक जण सोशल मीडियाचा वापर करून डिजिटल कॅम्पेन राबवत असतात.