(फोटो सौजन्य: istock)
आपल्या शरीरात प्रत्येक अवयव फार महत्त्वाचा असतो अशात त्यांची योग्य काळजी घेणे फार गरजेचे असते. अनेकदा बाहेरून जाणवत नसलेल्या समस्या या अंतर्गत असून शकतात. आपल्या शरीराच्या आतील अवयव हे बऱ्याचदा खराब तर होत असतात मात्र बऱ्याचदा हे बदल आपल्याला बाहेरून समजून येत नाही. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकीच एक म्हणजे आपली किडनी. जर किडनी नीट कार्य करत नसेल, तर शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. कारण मूत्रपिंड (किडनी) हे शरीरातील टाकाऊ द्रव्यं फिल्टर करून बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं काम करतं. पण जेव्हा किडनी योग्यरीत्या काम करत नाही, तेव्हा हे टाकाऊ घटक शरीरात साचतात आणि काही विशिष्ट लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं ओळखून आपण वेळेत उपचार घेतले, तर पुढील गंभीर त्रास टाळता येतो. चला किडनी खराब झाल्यास शरीरात कोणती प्राथमिक लक्षणं दिसून येतात ते जाणून घेऊया.
लघवीतील बदल
किडनी ही लाघवीशी संबंधित असते, अशात लघवीत काही बदल दिसणे किडनी खराब होण्याचे महत्त्वाचे लक्षण असू शकते. लघवीचा रंग गडद पिवळा, तपकिरी किंवा रक्तमिश्रित होणे, लघवीतून तीव्र वास किंवा विचित्र वास येऊ लागणे, जास्त वेळा लघवी होणे किंवा खूप कमी प्रमाणात लघवी होणे ही काही लक्षणे किडनी खराब होत असल्याचे संकेत असू शकतात.
थकवा आणि अशक्तपणा
किडनी एक विशिष्ट हार्मोन (erythropoietin) तयार करते जो लाल रक्तपेशी बनवायला मदत करतो. किडनी खराब झाल्यास हा हार्मोन कमी तयार होतो, आणि यामुळे शरीरात सतत थकवा जाणवू लागतो, चक्कर येणे, अशक्त वाटणे आणि कामात एकाग्रता कमी होण्याच्या समस्या जाणवू लागतात.
सूज येणे
किडनी जर नीट काम करत नसेल, तर शरीरात पाणी साचू लागते आणि यामुळेच आपल्या शरीराच्या काही अंगात सूज जाणवू शकते. पाय, घोटे सुजणे, डोळ्यांभोवती किंवा चेहऱ्यावर सूज दिसू लागते यासहच आपले हातही सुजल्यासारखे वाटू लागतात.
त्वचेशी संबंधित त्रास
शरीरातून विषारी घटक नीट निघाले नाहीत, तर त्वचेवर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे त्वचेच्या समस्या जसे की, त्वचा कोरडी होते, सतत खाज येते, त्वचेवर पुरळ, रॅशेस किंवा अॅलर्जीची लक्षणे जाणवू लागतात. यामुळे तुमची त्वचा अचानक निस्तेज देखील वाटू लागते.
भूक मंदावणे आणि अन्नाची चव बदलणे
किडनी निकामी झाल्यास युरिया आणि इतर विषारी घटक शरीरात साचतात ज्यामुळे भूक कमी लागते अथवा लागतच नाही. तोंडाची चव जाते आणि तोंडात धातूसारखी चव जाणवू लागते.यासहच मळमळ आणि उलटीच्या समस्या जाणवू लागतात. तुम्हालाही जर अशा काही समस्या तुमच्या शरीरात जाणवत असतील तर याकडे दुर्लक्ष न करता वेळीच रुग्णालय गाठा आणि वेळीच यावर योग्य तो सल्ला घ्या.
फुफ्फुसांमधील घाण मुळांपासून होईल नष्ट! ‘हा’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, छातीत सुकलेला कफ होईल कमी
खराब होण्याची कारणे
मधुमेह, किडनी इन्फेक्शन, प्रदूषण आणि विषारी पदार्थ, अनुवांशिक आजार.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
किडनी निरोगी ठेवण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.