३० - ६५ वयोगटातील अनेक लोक मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्यांनी त्रस्त! चाचणीनंतर Diabetes चे निदान
भारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून लाखो लोक या आजाराने पिडीत आहेत. त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे त्यापैकी जवळपास ५० टक्के रुग्णांना त्यांच्या मधुमेहाबद्दल माहितीच नाही. हृदयरोग, मूत्रपिंडाचे नुकसान किंवा दृष्टीदोष यांसारख्या गंभीर गुंतागुंती झाल्यानंतरच या व्यक्तींना मधुमेहाचे निदान होते. तज्ज्ञांच्या मते, वेळेवर तपासणी, नियमित निदान आणि संतुलित जीवनशैली या दीर्घकालीन गुंतागुंत टाळण्यासाठी आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.(फोटो सौजन्य – istock)
मधुमेह हा एक जुनाट असा चयापचय विकार आहे, मधुमेह तेव्हा होतो जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही. यामुळे रक्तातील साखरेची (ग्लुकोजची) पातळी वाढते. स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नसल्यास टाईप १ मधुमेह किंवा शरीर इन्सुलिनला प्रतिरोधक बनल्यास टाईप २ मधुमेह होतो. यावर नियंत्रण न ठेवल्यास मधुमेहामुळे हृदयविकार, मज्जातंतूंचे नुकसान, मूत्रपिंड निकामी होणे, अंधत्व आणि अवयव कापावा लागणे यांसारख्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
मुंबईतील झायनोवा शाल्बी हॉस्पिटलच्या एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. राशी अग्रवाल सांगतात की, बऱ्याचदा मधुमेहाची सुरुवातीला लक्षणं जाणवत नाहीत, म्हणूनच ५० टक्के लोकांना आपल्याला मधुमेह आहे हे माहित नसते. ३० ते ६५ वयोगटातील अनेक रुग्ण आमच्याकडे हृदय किंवा मूत्रपिंडाच्या समस्येनंतर उपचाराकरिता येतात आणि त्यांना त्यावेळी मधुमेहाचे निदान होते. जागरूकतेचा अभाव, अनियमित तपासणी आणि ‘मधुमेह फक्त वयवृद्धांचा आजार आहे’ हा गैरसमजूतीमुळे निदानात विलंब होतो.
डॉ. राशी पुढे सांगतात की, तहान वाढणे, वारंवार लघवी होणे, वजन कमी होणे, थकवा, दृष्टी कमजोर होणे आणि जखमा बरे होण्यास वेळ लागणे ही लक्षणे कायम राहिल्यास रक्तातील साखरेची तात्काळ तपासणी करावी. साध्या रक्तातील साखरेच्या चाचण्यांमुळे आजार वेळीच ओळखता येतो आणि गंभीर गुंतागुंत टाळता येते.”
मुंबईतील अपोलो डायग्नोस्टिक्स येथील रिजनल टेक्नीकल हेड डॉ. उपासना गर्ग सांगतात की, मधुमेहाच्या निदानाकरिता नियमित तपासणी हा सर्वात प्रभावी उपाय आहे. फास्टिंग ब्लड शुगर (FBS), पोस्टप्रांडियल ब्लड शुगर (PPBS) आणि HbA1c चाचण्या मधुमेह नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विशेषतः ३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी किंवा कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असलेल्यांनी नियमित तपासणी करावी. निरोगी आहार, दररोज व्यायाम, तणावाचे नियंत्रण, धूम्रपान टाळणे आणि पुरेशी झोप हीच मधुमेह नियंत्रणाची गुरुकिल्ली आहे. नियमित तपासणी आणि जीवनशैलीत बदल केल्यास गंभीर आजारांपासून दूर राहता येणे शक्य आहे.
Ans: मधुमेह हा एक आजार आहे ज्यामध्ये शरीरातील रक्तातील साखरेची पातळी (ग्लुकोज) नियंत्रित होत नाही.
Ans: खूप तहान लागणे, नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होणे, विशेषतः रात्री जास्त थकवा जाणवणे, प्रयत्न न करताही वजन कमी होणे, वारंवार इन्फेक्शन होणे
Ans: कार्बोहायड्रेट्सचे सेवन नियंत्रित करा आणि फायबरयुक्त पदार्थ जास्त खा. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ निवडा.






