गर्भाशयाबाबत गैरसमजुती असतील तर नक्की वाचा
गर्भाशयाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे आणि सर्वात आधी याबाबत असलेल्या गैरसमजूती दूर करुन वास्तविकता जाणून घ्यावी. हे लक्षात असू द्या की, गर्भाशयाचा कर्करोग हे महिलांमध्ये मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक ठरत आहे. मात्र याबाबत योग्य जागरूकता पसरविल्यास ते महिलांमधील प्रतिबंधित कर्करोगांपैकी एक आहे. बहुतेक महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाची माहितीच नसते.
गर्भाशयासंबंधित तपासणी, लसीकरण, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता हे महिलांना जीवघेण्या आजारापासून संरक्षण करण्यास मदत करते. गर्भाशयाच्या आरोग्याबाबत महिलांबद्दल विविध गैरसमज आणि चुकीची माहिती समाजात पसरविली जाते. गर्भाशयाच्या आरोग्याचे महत्त्व समजून घेत या गैरसमजूती दूर कर त्यामागचे सत्य जाणून घेणे गरजेचे आहे.
डॉ. नितीन गुप्ते, स्त्रीरोग तज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. काय आहेत गर्भाशयाच्या आरोग्याबद्दलचे गैरसमज? त्यामागची खरी वास्तविकता काय? जाणून घेऊया
गैरसमज – गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका केवळ वयस्कर महिलांनाच आहे
वास्तविकता – वयानुसार गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो हे जरी हे खरे असले तरी तरुणींना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका नाही असे म्हणने चुकीचे ठरते. गर्भाशयाच्या कर्करोग हा २० ते ३० वयोगटातील महिलांमध्ये देखील होऊ शकतो. म्हणूनच महिलांना नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. महिलांनी २० व्या वर्षापासूनच पॅप स्मीअर चाचणी आणि एचपीव्ही चाचणी सारख्या नियमित गर्भाशयाच्या तपासणीसाठी करणे गरजेचे आहे.
शरीरात सर्व्हायकल कॅन्सर घुसलाय सांगणारे 4 संकेत, मणक्याचे हाड होते डॅमेज; करू नका दुर्लक्ष
गैरसमज – कोणतीही लक्षणे नाहीत, म्हणजे माझे गर्भाशय अगदी निरोगी आहे
वास्तविकता- गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधीत लक्षणे बऱ्याचदा सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. यामुळे त्याचे वेळीच निदान करणे शक्य होत नाही. नियमित तपासणी केल्यास या आजाराचे वेळीच निदान करण्यास मदत होते.
गैरसमज – एचपीव्ही लसीकरण हे केवळ लैंगिकदृष्ट्या सक्रिय महिलांसाठी गरजेचे
वास्तविकता: एचपीव्ही लस ही प्रत्येक महिलेसाठी गरजेची आहे. केवळ लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्यां महिलांनीच लसीकरण करावे हे अगदी चुकीचे आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या संपर्कात येण्यापूर्वी ही लस दिली तर ती सर्वात प्रभावी ठरते. किशोरावस्थेपूर्वीच ही लस दिल्यास ती भविष्यातील धोका कमी करते. सर्व प्रकारच्या एचपीव्ही लसीचा सामना करावा लागला नसला तरीही ४५ वर्षांपर्यंतच्या महिलांनाही एचपीव्ही लस दिली जाऊ शकते.
काय आहे Cervical Cancer ची ओळख? साधेसे संकेतही ठरतील जीवघेणे
गैरसमज: वर्षातून एकदा केलेली पॅप स्मीअर चाचणी नॉर्मल आहे म्हणजे मला दुसऱ्या वर्षी चाचणी करण्याची आवश्यकताच नाही
वास्तविकता: तुमचे पॅप स्मीअर सामान्य असले तरीही, तुम्हाला नियमित तपासणीसाठी करावी लागते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ला घ्या आणि त्यानुसार तुमची नियमित आरोग्य तपासणी आणि तपासणीचे वेळापत्रक आखा. गर्भाशय ग्रीवामध्ये असलेल्या पेशी कालांतराने बदलू शकतात आणि नियमित तपासणीने याचा शोध घेता येऊ शकतो.