(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)
मुलांची रोजची चिडचिड ही केवळ ‘बॅड मूड’ नसून ती एका गंभीर समस्येचे लक्षण असू शकतं. यामुळे मुले नकारात्मक गोष्टींवर तीव्र प्रतिक्रिया देतात. त्यांना अचानक राग येतो आणि त्यामुळे त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. संशोधनानुसार, हा चिडचिडेपणा पुढे जाऊन नैराश्य, चिंता आणि आत्महत्येसारख्या नकारात्मक विचारांना जन्म ही देऊ शकतो. अशा गंभीर समस्यांना सामोरं जाण्यापेक्षा कमी दुष्परिणाम असलेले आणि सुरक्षित उपचार शोधणे गरजेचे होते.
12 ते 17 वयोगटातील 132 मुलांवर एक विशेष चाचणी घेण्यात आली. या मुलांना दोन गटांत विभागून एका गटाला सूक्ष्म पोषक घटक (व्हिटॅमिन्स आणि खनिजे) असलेल्या गोळ्या दिवसातून तीन वेळा देण्यात आल्या. 8 आठवड्यांनंतर आलेले निष्कर्ष थक्क करणारे होते.
गंभीर प्रकरणांत मोठे यश: ज्या मुलांमध्ये ‘मूड स्विंग्स’ किंवा हिंसक प्रवृत्ती जास्त होती, अशा 64% मुलांमध्ये व्हिटॅमिन्समुळे सकारात्मक सुधारणा दिसून आली आहे. याउलट, साध्या गोळ्या घेणाऱ्या मुलांमध्ये हे प्रमाण केवळ 12.5% इतकंच होते.
पालकांचे समाधान: जीवनसत्त्वं घेणाऱ्या मुलांच्या सामाजिक वर्तनात आणि वागण्यात वेगाने सुधारणा झाल्याचे त्यांच्या पालकांनीही नोंदवलं आहे.
नकारात्मक विचारांत घट: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अभ्यासाच्या सुरुवातीला ज्या 25% मुलांच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, ते सूक्ष्म पोषक घटकांच्या सेवनानंतर त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होऊन हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले.
हे संशोधन सिद्ध करते की, मुलांचा राग किंवा चिडचिड हा केवळ मानसिक प्रश्न नसून तो शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेशीही जोडलेला असू शकतो. पारंपारिक मानसोपचारांना ‘व्हिटॅमिन्स आणि खनिजे’ हा एक सुरक्षित, स्वस्त आणि नैसर्गिक पर्याय ठरू शकतो.
जर तुमचं मूल सतत चिडचिड करत असेल, तर त्याला ओरडण्याऐवजी किंवा केवळ औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी, त्याच्या आहारातील पोषक घटकांकडे लक्ष देणे हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. जीवनसत्त्वे आणि खनिजे मुलांचे मानसिक आरोग्य सुधारून त्यांना आनंदी आयुष्य जगण्यास मदत करतात.






