साथीच्या रोगांचं थैमान; डेंग्यू 113, मलेरिया 100, चिकनगुनियाचा कहर
राज्यासह संपूर्ण देशभरात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया इत्यादी आजारांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. सण उत्सवाच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्यामुळे आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून साथीच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पावसाळ्यातील अस्वच्छता, दूषित अन्न-पाणी, डास-कीटकांचा सुळसुळाट आणि हवामानामुळे आजार हे चटकन पसरत आहेत. जिल्हा हिवताप विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या ही ११३, त्याचबरोबर चिकूनगुनिया ४४ आणि मलेरियाच्या १०० असे रुग्ण आढळून आले आहेत.(फोटो सौजन्य – istock)
पाय आणि कंबर सतत दुखते? किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच व्हा सावध
साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. वारंवार ताप येणे, सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. अन्यथा हेच छोटे आजार मोठे स्वरूप घेऊन आरोग्य पूर्णपणे बिघडून टाकतात. डेंग्यू, मलेरिया झाल्यानंतर रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होऊन जातात, ज्यामुळे शरीरात सतत थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर इत्यादी समस्या उद्भवतात. साथीच्या आजारांमध्ये वाढ होऊ नये म्हणून साकारकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑगस्टपर्यंत ११३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण हे बाहेरील असून ते कामानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. केवळ बोटावर मोजता येतील एवढेच रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. साथीचे आजार टाळण्यासाठी घरासमोर पाण्याची डबके साचू न देणे, घराच्या खिडक्यांना जाळी लावणे, मच्छरदाणीचा वापर करणे, बाहेरील अन्नपदार्थ न खाणे, पाणी उकळून पिणे अशा सूचना जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
गणपती सणासाठी दाखल झालेल्या गणेशभक्तांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा साथरोगाचा फैलाव होऊ नये यासाठी २३ ते २६ ऑगस्ट या कालावधी जिल्ह्यातील रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि चेकपोस्ट येथे कार्यरत करण्यात आलेल्या वैद्यकीय पथकांनी तब्बल विविध साथीचे ९८८ रुग्ण शोधून त्यांना उपचार दिले. तर ६९ रुग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी आरोग्य प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. गटारातील सांडपाणी साचू न देणे, बाहेरील अन्नपदार्थ टाळणे आदी दक्षता घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
संसर्गजन्य रोग म्हणजे काय?
संसर्गजन्य रोग हे असे आजार आहेत जे सूक्ष्मजीवांमुळे होतात आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे (किंवा प्राण्याकडून माणसाकडे) पसरू शकतात.
संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी काय करावे?
नियमितपणे हात स्वच्छ धुवा, वैयक्तिक आणि परिसराची स्वच्छता राखा, दूषित अन्न आणि पाणी टाळा, अनेक संसर्गजन्य रोगांपासून लसीकरणामुळे संरक्षण मिळते.
काही सामान्य संसर्गजन्य रोगांची उदाहरणे कोणती?
सर्दी, फ्लू, कोरोना (COVID-19), क्षयरोग (TB), मलेरिया इत्यादींचा समावेश होतो. संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण कसे केले जाते.