(फोटो सौजन्य: Wander Sky)
भारतात धार्मिक पर्यटनाला फार महत्त्व आहे. देशात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्यात काही ना काही गुपितं दडून बसली आहेत. हिंदू धर्मात अनेक देवी-देवतांना विशेष स्थान देण्यात आले आहे आणि प्रत्येकाची ठिकठिकाणी मंदिरे देखील स्थापित झाली आहेत. आज तुम्हाला देशातील अशा एका रहस्यमयी मंदिराविषयी माहिती सांगणार आहोत जे पातळ लोकाशी जोडलेले असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की, जगाच्या अंताचे रहस्य या मंदिरात लपलेले आहे. तुम्हाला प्राचीन मंदिरांना भेट द्यायला आवडत असेल तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. आम्ही ज्या मंदिराविषयी बोलत आहोत त्या मंदिराचे नाव पाताळ भुवनेश्वर मंदिर आहे. या मंदिराची रचना इतर मंदिरांपेक्षा काहीशी वेगळी आहे. प्रत्यक्षात या मंदिरात ९० फूट खोल गुहा आहे, ज्यातून गेल्यानंतर तुम्ही दर्शनासाठी मंदिराच्या मुख्य भागात पोहोचू शकाल.
जगाच्या अंताचे रहस्य दडलंय
जगाच्या अंताचे रहस्य पाताळ भुवनेश्वर मंदिरात लपलेले आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर तुम्हाला प्रथम प्रवेशद्वारावर शेषनागाची आकृती दिसेल. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की पृथ्वी त्याच्या फणावर टिकून आहे. यासोबतच, असे मानले जाते की भगवान शिव पाताळ भुवनेश्वर मंदिरात वास्तव्य करत होते. जर तुम्ही पाताळ भुवनेश्वर मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की मंदिरात जाण्याचा मार्ग खूपच कठीण आहे. भाविकांना गुहेत आरामात प्रवेश करता यावा म्हणून दोन्ही बाजूंना साखळ्या बसवण्यात आल्या आहेत. तथापि इथे प्रवेश करणे आणि मंदिरात बाहेर पडणे अत्यंत कठीण आहे, असे भाविकांचे म्हणणे आहे.
मंदिरात आहेत 4 दरवाजे
असे मानले जाते की या मंदिराच्या गुहेत स्वर्ग, नरक, मोक्ष आणि पाप असे चार दरवाजे आहेत. यासोबतच शेषनागाची एक विशाल नैसर्गिक आकृती आहे ज्यावर पृथ्वी विसावलेली आहे. या मंदिरात ३३ देव-देवता एकत्र दिसतात. येथे भगवान गणेशाचे डोके आहे, ज्यावर ब्रह्मकमलाचे दिव्य थेंब पडतात. यासोबतच, येथे एक शिवलिंग आहे, जे सतत वाढत आहे. असे म्हटले जाते की जेव्हा शिवलिंग गुहेच्या छताला स्पर्श करेल तेव्हा या जगाचा अंत होईल.
मंदिरात कसे पोहचायचे
उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यातील गंगोलीहाटपासून सुमारे १४ किलोमीटर अंतरावर पाताळ भुवनेश्वर मंदिर वसले आहे. याची गुहा सुमारे १६० मीटर लांब आणि ९० फूट खोल आहे. रेल्वेने तुम्ही पाताळ भुवनेश्वर मंदिराला भेट देऊ शकता. याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन टनकपूर आहे जे १५४ किमी अंतरावर आहे. टनकपूर रेल्वे स्टेशनपासून पाताळ भुवनेश्वर, गंगोलीहाट आणि लोहाघाट इत्यादी ठिकाणी टॅक्सी आणि बसेस सहज उपलब्ध आहेत. टनकपूर हे लखनऊ, दिल्ली, आग्रा आणि कोलकाता सारख्या भारतातील प्रमुख ठिकाणांशी चांगले जोडलेले आहे. त्यामुळे तुम्ही रस्त्याने देखील इथे सहज जाऊ शकता.