चमचाभर तांदळाचा वापर करून घरीच तयार करा महागडी क्रीम, हिवाळ्यातही राहील सुंदर आणि चमकदार त्वचा
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची सुद्धा काळजी घ्यावी. कारण थंडीत त्वचा आणि केस खूप जास्त कोरडे होऊन जातात. चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेशिअल करून घेतले जाते तर कधी क्लीनअप आणि महागड्या स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. वारंवार स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे वाढत्या वयात त्वचा सैल होऊन जाते. त्वचा सैल झाल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, बारीक रेषा दिसणे इत्यादी अनेक त्वचेसंबंधित समस्या उद्भवतात. त्वचा चमकदार आणि ग्लोइंग करण्यासाठी कोणत्याही स्किन ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चमकदार तांदळाचा वापर त्वचेसाठी कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे तुमच्या त्वचेवर ग्लो येईल आणि काळे डाग कमी होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
सुंदर दिसण्यासाठी कायमच महागड्या स्किन ट्रीटमेंट करण्याऐवजी तांदळाचा वापर करावा. कोरियन स्किन केअर प्रॉडक्टमध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होतात आणि त्वचा उजळदार दिसते. याशिवाय तांदळाचे पाणी तुम्ही केसांच्या वाढीसाठी सुद्धा वापरू शकता. तांदळाच्या पाण्याचा वापर केवळ त्वचा उजळदार करण्यासाठी नाहीतर चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी सुद्धा होतो. त्यामुळे तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी करावा. चला तर जाणून घेऊया राईस क्रीम बनवण्याची सोपी कृती.
वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यात पाणी घालून भिजत ठेवा. मोठ्या वाटीमध्ये कोरफड जेल आणि तयार केलेले तांदळाचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. व्हिस्कीच्या सहाय्याने फेटून घेतल्यास पांढरे मिश्रण तयार होईल. त्यानंतर त्यात विटामिन ई कँप्सूल घाला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा. कोरफड जेलचा रंग पूर्णपणे पांढरा झाल्यानंतर छोट्या डब्यात क्रीम भरून ठेवा. तयार केलेली क्रीम आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते. रात्री झोपण्याआधी क्रीम नियमित त्वचेवर लावल्यास आठवडाभरात त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसून येतील. त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केल्यास त्वचा खु[ जास्त उजळदार दिसेल.
तांदळाच्या पाण्यात असलेले गुणकारी घटक त्वचा अतिशय मुलायम आणि चमकदार करण्यास मदत करतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स आणि ऍक्ने कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होऊन जातात. त्वचेमधील कोलेजन निर्मिती वाढल्यानंतर त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या दूर होतात. उन्हामुळे चेहऱ्यावर आलेले टॅनिंग कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा.






