'अॅक्टरेक'च्या प्रोटॉन थेरपीचा कर्करुग्णांना दिलासा! आतापर्यंत एकूण ९०० रुग्णांवर उपचार
कर्करोग उपचारातील अत्याधुनिक तंत्रज्ञान मानल्या जाणाऱ्या प्रोटॉन थेरपीद्वारे खारघर येथील टाटा मेमोरियलच्या ‘अॅक्टरेक’ केंद्रात आतापर्यंत सुमारे ९०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यापैकी ४०० हून अधिक रुग्ण लहान मुले म्हणजे एकूण रुग्णसंख्येच्या सुमारे ४४ टक्के लहान मुले आहेत प्रोटॉन थेरपी केंद्र १५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरु झाले असून कर्करोग उपचारातील ही सुविधा देशात अत्यंत मर्यादित ठिकाणी उपलब्ध असून रुग्णांना तुलनेने कमी दुष्परिणामांसह उपचार मिळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. पत्र संचार कार्यालय (पीआयबी) यांच्यावतीने आयोजित भेटीदरम्यान या प्रोटॉन थेरपी केंद्राची माहिती देण्यात आली. राष्ट्र उभारणीसाठी विविध क्षेत्रांत सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने अशा भेटी आयोजित केल्या जातात.(फोटो सौजन्य – istock)
अॅक्टरेक येथील प्रोटॉन थेरपी केंद्रात दर महिन्याला सरासरी ७५ ते ७६ रुग्णांवर उपचार केले जातात. प्रत्येक रुग्णाच्या उपचारासाठी साधारण ४० मिनिटे लागतात. प्रोटॉन थेरपी ही रेडिएशन उपचाराची अत्याधुनिक पद्धत आहे. या थेरपीचा उपयोग प्रामुख्याने स्कल बेस, न्यूरो कर्करोग, लहान मुलांमधील कर्करोग, हाडांचे कर्करोग तसेच लिव्हर, पॅनक्रियाज आणि प्रोस्टेट कर्करोग अशा विविध प्रकारच्या कर्करोगांवर उपचारासाठी केला जातो.
ही एक अत्याधुनिक सुविधा आहे. या उपचार यंत्रात रुग्णाभोवती ३६० अंशात हे रोटेशन गॅन्ट्री फिरून पेन्सिल बीम स्कॅनिंग (पीबीएस) तंत्रज्ञानासह इंटेन्सिटी मॉड्युलेटेड प्रोटॉन थेरपी दिली जाते, अशी माहिती डॉ. सुब्रमण्यम यांनी दिली. विशेषत लहान मुलांमध्ये दीर्घकालीन दुष्परिणाम कमी करण्यासाठी प्रोटॉन थेरपी प्रभावी ठरत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या उपचारामुळे देशभरातून कर्करोगग्रस्त रुग्ण खारघर येथील या केंद्राकडे उपचारासाठी येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
टीएमसीचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी अॅक्ट्रेक येथील प्रोटॉन थेरपी सेंटर हे टीएमसीच्या सर्व गरजू रुग्णांना, उपचारांसाठी पैसे देण्याची क्षमता विचारात न घेता, अत्याधुनिक कर्करोग उपचार प्रदान करण्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे म्हटले.या थेरपीसाठी रुग्णांची प्रतीक्षा यादी असते. रुग्णांसाठी उपचाराचा खर्च ठरलेले असून संस्थेकडून येणाऱ्या रुग्णांना साधारण ५ लाख रुपयांत उपचार केले जातात.तर खासगीसाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च येतो, असे अॅक्टरेकचे डॉ. सुब्रमण्यम यांनी सांगितले






