Hair Fall: केस गळतीने त्रस्त आहात? आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश; काही दिवसांत दिसेल फरक
डोळ्यांना अंधूक दिसणे ही समस्या थेट स्यूडोमायोपिया संबंधित समस्या असू शकते. डोळ्यांचा आजार दृष्टीदोषासारखा वाटत असला तरीही प्रत्यक्षात हा आजार फार वेगळा आहे. स्यूडोमायोपिया या आजारातील स्यूडो हा मूळ ग्रीक शब्द आहे. स्यूडो या शब्दाचा अर्थ खोटा किंवा तात्पुरता असा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर स्यूडोमायोपिया म्हणजे खोटा चष्मा किंवा भास होण्यासारखा दृष्टीदोष होय. या अवस्थेत डोळ्यांना काही काळासाठी दूरचे दिसेनासे होते. मात्र, यामागे डोळ्याच्या बुबुळाच्या आकारात झालेला बदल कारणीभूत नसतो. मोबाईल, संगणक किंवा पुस्तकांकडे एकटक पाहिल्याने डोळ्यांवर परिणाम होतो.
डोळ्यांसमोरील दृष्ट्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करणा-या स्नायूंवर ताण येतो. हे स्नायू आकुंचित राहिल्याने डोळ्यासमोर तात्पुरता धूसरपणे येतो. त्यामुळे ही समस्या खरी मायोपिया नसून, डोळ्यांवर निर्माण झालेली तात्पुरती समस्या आहे. स्नायूंवर ताण आल्याने स्यूडोमायोपियाचा त्रास संभवतो.ख-या दृष्टीदोषामध्ये (मायोपिया) डोळ्यांच्या बाहुलीचा किंवा गोलकाचा आकार हा गरजेपेक्षा जास्त लांब झाल्याचे दिसून येते. यामुळे दूरच्या वस्तू अंधुक दिसू लागतात. मात्र, स्यूडो-मायोपिया मध्ये डोळ्याचा आकार पूर्णपणे सामान्य दिसतो. या अवस्थेत डोळ्यासमोर दृश्य धूसर असण्यामागे सिलियरी स्नायू कारणीभूत ठरतो. सिलिअरी स्नायू हा आकाराने लहान आणि वर्तुळाकार दिसून येतो. डोळ्यांसमोरील दृश्य विचलित होऊ नये हे महत्त्वाचे कार्य या स्नायूकडून केले जाते. मोबाईल, संगणक किंवा पुस्तकांकडे फार वेळ एकटक पाहिल्याने सिलियरी स्नायू आकुंचित होतो. त्यामुळे डोळ्यांना लांबच्या वस्तू नीट दिसत नाहीत. उदाहरणार्थ, अतिव्यायाम केल्याने हात किंवा पायांच्या स्नायूंना गोळा येतो. याच पद्धतीचा ताण डोळ्यांवर आल्याने समोरील दृश्य अस्पष्ट दिसते.
स्यूडो-मायोपिया हा आजार अनेकांना होतो. प्रामुख्याने लहान मुले, तरुण वयोगटातील मुलांना या आजाराची बाधा झाल्याचे आढळून येते. सततचा अभ्यास, मोबाईल, संगणक किंवा इतर डिजिटल स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्याने स्यूडोमायोपियाचा त्रास जाणवतो. विविध संशोधनानुसार, ६ वर्षांच्या २४ टक्के मुलांना तर १३ वयोगटातील १८ टक्के मुलांना स्यूडोमायोपियाच्या केसेसची नोंद झाली आहे. येत्या काळात स्यूडोमायोपियाच्या केसेस वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
१) कार्यात्मक कारणे – ही कारणे जीवनशैलीशी निगडीत आहेत. या कारणांमुळेच अनेकदा स्यूडो-मायोपिया आजार झाल्याचे दिसून येते. सतत मोबाईल, संगणक किंवा इतर डिजिटल स्क्रीनकडे पाहणे, अभ्यास करणे, अपु-या प्रकाशात काम करणे किंवा वाचन करताना पुस्तक किंवा मोबाईल चेह-याच्या खूप जवळ धरून ठेवणे यामुळे डोळ्यांतील सिलिअरी स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे हा स्नायू आकुंचित अवस्थेत जातो. अनेकदा किशोरवयीन मुले आणि तरुणांच्या डोळ्यांत समोरील दृश्यावर लक्ष केंद्रित करताना अडथळे येतात. या वयोगटातील मुलांमध्ये ही समस्या हमखास दिसून येते कारण त्यांच्या डोळ्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता अधिक सक्रिय आणि लवचिक असते.
२) जैविक कारणे – काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, हा त्रास गंभीर स्वरुपातील वैद्यकीय आजारांमुळे झाल्याचेही दिसून आले आहे. डोक्याला गंभीर दुखापत होणे, मेंदूतील संसर्ग, मल्टिपल स्क्लेरोसिससारखे मज्जासंस्थेचे आजार, मेंदूच्या तळाजवळील गाठ किंवा काही विशिष्ट औषधांच दुष्परिणाम यांमुळेही स्यूडोमायोपिया होऊ शकतो. काही औषधे आणि मानसिक आजारदेखील याला कारणीभूत ठरतात.
मानसिक तणावाचा सामना करणा-या व्यक्तीच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. सततच्या ताणामुळे शरीरात पॅरासिम्पथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते. ही मज्जासंस्था डोळ्यांतील सिलियरी स्नायूंचे कार्य नियंत्रित करते. मानसिक तणाव वाढल्यास हा स्नायू आकुंचित अवस्थेत जातो. परिणामी, डोळ्यांना दूरवरच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करता येत नसल्याने दृष्टी धूसर होते. हेच स्यूडो-मायोपिया चे मुख्य लक्षण मानले जाते. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, मानसिक तणावाचा थेट परिणाम हा डोळ्यांच्या लक्ष केंद्रित करणा-या स्नायूंवर होतो. त्यामुळे स्नायूंमध्ये तणाव निर्माण होतो. काही काळासाठी दूरवरचे दृश्य अस्पष्ट दिसते.
क्युरिअस या वैद्यकीय नियतकालिकात २०२१ साली प्रकाशित झालेल्या एका संशोधनात, स्यूडोमायिया आणि मानसिक आरोग्य यांच्यातील महत्त्वाचा संबंध स्पष्ट करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये १२ ते १८ वयोगटातील स्यूडोमायोपियाग्रस्त २१ रुग्णांची माहिती दिली गेली. यापैकी ७१.३ टक्के रुग्णांना मानसिक आरोग्याशी संबंधित आजार होता. सर्वाधिक रुग्ण हे चिंताग्रस्त (जनरल एन्झायटी डिसऑर्डर) आढळले. याशिवाय पॅनिक डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर, सामाजिक चिंता (सोशल एन्झायटी डिसऑर्डर) आणि आघातामुळे येणारा ताण (पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिअऑर्ड) यांसारख्या समस्यादेखील आढळल्या. सतत चिंता भेडसावणा-या रुग्णांमध्ये डोळ्यांवरील ताण आणि अंधुकतेची समस्या गंभीर पातळीवर नोदवली गेली. मानसिक चिंतेचा त्रास उद्भवल्यास, स्यूडोमायोपियाचा त्रास वाढण्याची शक्यता असल्याचे या अभ्यासाअंती स्पष्ट झाले.
यासंबंधित अजून एका संशोधनातील माहितीनुसार, स्यूडो-मायोपिया आणि मानसिक आरोग्याचा घनिष्ठ संबंध आहे. ७१.४ टक्के स्यूडोमायोपियाग्रस्त रुग्णांना मानसिक आरोग्याशी संबंधित आजार असल्याचे या संशोधनात अधोरेखित करण्यात आले. मानसिक आजाराची तीव्रता जास्त असल्यास, गंभीर स्वरूपातील स्यूडोमायोपिया बळकावतो, असे संशोधकांनी नमूद केले आहे. या निष्कर्षांच्या आधारे, स्यूडोमायोपियाचे निदान करताना डोळ्यांची तपासणी करा, प्रत्येक रुग्णाच्या मानसिक आरोग्याचे मूल्यांकन करा, असा आवर्जून सल्ला देण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला हा स्यूडोमायोपियाच्या तपासणीचा नियमित आणि महत्त्वपूर्ण भाग असावा.
स्यूडोमायोपियाचे अचूक निदान करण्यासाठी योग्य नेत्ररोगतज्ज्ञ किंवा ऑप्टोमेट्रिस्टकडूनच डोळ्यांची तपासणी करुन घ्यावी. ऑप्टिकल दुकानाला भेट देत केवळ चष्म्याचा नंबर तपासणे पुरेसे नसते. या तपासणीतून स्यूडोमायोपिया आणि दृष्टीदोष यातील फरक स्पष्ट होत नाही. या दोन्ही अवस्थांमधील अचूक फरक ओळखण्यासाठी सायक्लोप्लेजिक रिफ्रॅक्शन ही विशेष तपासणी केली जाते.
डोळ्यांत विशेष पद्धतीचे आय ड्रॉप्स टाकून ही तपासणी केली जाते. यासाठी अट्रोपिन किंवा सायक्लोपेंटोलेट या औषधांचा वापर केला जातो. या आय ड्रॉप मुळे डोळ्यातील सिलियरी स्नायू काही काळासाठी पूर्णपणे शिथिल होतो. त्यामुळे ताण कमी होतो. डोळ्याची अपवर्तन (रिफ्रॅक्टिवे) क्षमता अचूकपणे मोजता येते. डोळ्यांच्या चष्म्याचा खरा नंबर अचूकपणे मोजता येतो. ड्रॉप्स टाकल्यानंतर दूरचे अंधुक दिसणे बंद झाल्यास किंवा चष्म्याचा नंबर लक्षणीयरित्या कमी झाल्यास, आजाराचे अचूक निदान होते. यावरुन रुग्णाला धूसर दिसण्याची कारणे डोळ्यांच्या रचनेतील कायमस्वरूपी बदल नसून, सिलियरी स्नायूंवरील ताण असल्याचे स्पष्ट होते.
सायक्लोप्लेजिक रिफ्रॅक्शन तपासणी न केल्यास केवळ सामान्य दृष्टी तपासणीत व्यक्तीचा नेमका दृष्टीदोष समजत नाही. अशावेळी चष्म्याच्या दुकानातील ही तपासणी नेमका आजार ओळखत नाही. तंत्रज्ञ केवळ चष्म्याचा नंबर नोंदवतात. यातून चुकीचे उपचार दिले जातात. त्यामुळे स्यूडोमायोपियाचे अचूक निदान करणे महत्त्वाचे ठरते. याशिवाय प्रत्येक तपासणीत दृष्टीमध्ये बदल दिसणे, रेटिनोस्कोपी तपासणीत वेगवेगळे निष्कर्ष येणे किंवा रुग्णाला जाणवणारी दृष्टीची समस्या आणि तपासणीत मिळणारे निष्कर्ष यांच्यात तफावत आढळणे, ही स्यूडोमायोपियाची महत्त्वाचे संकेत मानले जातात.
चष्मा लावल्याने हा आजार बरा होतो, हा गैरसमज स्यूडोमायोपियासाठी घातक ठरतो. चष्म्याच्या वापराने काही काळासाठी अंधुक दिसणे कमी होते. मात्र दृष्टीदोष नसताना केवळ स्यूडो-मायोपिया या रुग्णाला चुकीच्या नंबरचा चष्मा दिल्यास डोळ्यातील सिलियरी स्नायूंवरील ताण वाढतो. या स्नायूची हालचाल वाढते. डोळ्यांची तात्पुरती समस्या पूर्णपणे बरी होत असण्यायोग्य असली तरीही केवळ या चुकीमुळे कायमचा दृष्टीदोण होण्याची भीती असते. चुकीच्या चष्म्यामुळे डोळे कायमचे खराब होतात.
डिजिटल युगातील स्यूडोमायोपियाची समस्या – आजच्या काळात डिजिटल उपकरणांचा वापर वाढला आहे. लहान मुले टॅबलेटवर शिक्षण घेत आहेत. प्रौढ व्यक्ती दिवसांतील आठ ते दहा तास संगणकासमोर काम करतात. अनेकजण मोकळ्या वेळेत मोबाईल वापरतात. मुळात मानवी डोळ्यांची रचना ही दीर्घकाळ जवळच्या वस्तू पाहण्यासाठी झालेली नाही. आजच्या डिजिटल जीवनशैलीचा दुष्परिणाम म्हणून स्यूडोमायोपियाची समस्या वाढू लागली आहे.
१) २०-२०-२० चा नियम – डिजिटल उपकरणांवरील कामाला दर २० मिनिटांनी ब्रेक द्या. किमान २० फूट अंतरावरील वस्तूकडे २० सेकंद पाहा. यामुळे डोळ्यातील स्नायूला विश्रांती मिळते.
२) मैदानी वातावरणात वेळ व्यतीत करा – दिवसातून किमान दोन तास घराबाहेर नैसर्गिक प्रकाशात राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. दूरवरच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित केल्याने डोळ्यांवरील ताण कमी होतो.
३) स्क्रीनपासून योग्य अंतर पाळा – मोबाईल, टॅबलेट किंवा संगणक वापरता स्क्रीन डोळ्यांपासून किमान ३० सेंटीमीटर अंतरावर ठेवा. मोबाईल चेह-याच्या जवळ धरून वापरू नका.
४) सतत स्क्रीनकडे पाहणे टाळा – सलग ३० मिनिटांपेक्षा जास्त स्क्रीन किंवा पुस्तकांकडे पाहू नका. या दरम्यान, डोळ्यांना काही मिनिटांसाठी सलग विश्रांती द्या.
५) मानसिक ताण कमी करा – मानसिक ताण हा स्यूडो-मायोपिया साठी प्रामुख्याने कारणीभूत ठरतो. ध्यान, प्राणायाम, योग, श्वसनाचे व्यायाम किंवा माइंडफुलनेस यांसारख्या पद्धतीचा अवलंब केल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
स्यूडो-मायोपिया बद्दल जागरुकता बाळगावी अचानकपणे मुलाला धुसर दिसू लागल्यास त्याला चष्म्याची गरज आहे, असा निष्कर्ष काढू नये. पालकांनी आपल्या मुलाची नेत्ररोगतज्ज्ञाकडून तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, सायक्लोप्लेजिक आय ड्ऱॉप्स वापरुन तपासणी करून घ्यावी. योग्य तपासणी न करता दिलेला चुकीच्या नंबरचा चष्मा मुलांच्या डोळ्यांसाठी घातक ठरतो.






