तुम्हाला माहितीये का Google वर सर्वात पहिले काय Search करण्यात आले होते? (Photo Credit- X)
जर तुम्हाला वाटत असेल की जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलकडे आपल्या पहिल्या सर्चचा डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित असेल, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. गुगलने कधीही अधिकृतपणे ही माहिती जाहीर केलेली नाही की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पहिली गोेष्ट कोणती शोधली गेली. गुगलच्या सुरुवातीच्या काळात ‘सर्च लॉग’ (Search Logs) दीर्घकाळासाठी सुरक्षित ठेवण्याची किंवा बॅकअप घेण्याची कोणतीही प्रगत यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची माहिती काळाच्या पडद्याआड गेली असून इतिहासाचे एक रहस्य बनली आहे.
अधिकृत माहिती उपलब्ध नसली, तरी इंटरनेट आणि सोशल मीडिया विश्वात या संदर्भात अनेक दावे केले जातात. काही टेक तज्ज्ञांच्या मते, गुगलची चाचणी घेण्यासाठी सर्वात आधी “Google” हाच शब्द टाईप करून पाहिला गेला असावा. तर काहींच्या मते, “What is Google?” किंवा त्या काळात लॅरी आणि सर्गेई ज्या विद्यापीठात शिकत होते, त्या ‘स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी’शी (Stanford University) संबंधित एखादा शब्द शोधला गेला असावा. मात्र, यापैकी कोणत्याही दाव्याची गुगलने पुष्टी केलेली नाही.
BSNL ने लाँच केला नवा सॅटेलाईट फोन; खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला घ्यावी लागणार परवानगी
या सर्व दाव्यांमध्ये आणखी एक नाव प्रामुख्याने समोर येते, ते म्हणजे “Gerhard Casper”. गेरहार्ड कॅस्पर हे गुगलच्या स्थापनेदरम्यान स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष होते. गुगलच्या संस्थापकांनी सर्च इंजिनचे अल्गोरिदम तपासण्यासाठी त्यांचे नाव सर्वात आधी सर्च केले होते, असा एक मोठा मतप्रवाह इंटरनेटवर आहे. परंतु, हा दावा देखील केवळ चर्चांपुरताच मर्यादित राहिला असून गुगलने याला कधीही अधिकृत मान्यता दिली नाही.
गुगलची सुरुवात १९९८ मध्ये लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन या दोन पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी केली होती. इंटरनेटवर विखुरलेली माहिती अत्यंत सोप्या आणि व्यवस्थित पद्धतीने लोकांसमोर आणणे, हाच यामागचा मुख्य उद्देश होता. सुरुवातीच्या काळात कंपनीचे संपूर्ण लक्ष सर्च इंजिनची क्षमता आणि अचूकता वाढवण्यावर होते, न की प्रत्येक सर्चचा कायमस्वरूपी रेकॉर्ड ठेवण्यावर. यामुळेच जगातील पहिला गुगल सर्च कोणता होता, याचे प्रमाणित उत्तर आजही कोणाकडेही नाही. मात्र, गेल्या दोन दशकांत गुगलने जगभरातील मानवी जीवन आणि माहिती शोधण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे, हे मात्र निश्चित!






