(फोटो सौजन्य: istock)
जर तुम्ही नव्या वर्षात परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक खास यादी तयार झाली आहे. Condé Nast Traveller Readers’ Choice Awards 2025 चे निकाल जाहीर झाले असून यात जगातील १० सर्वोत्कृष्ट देशांची निवड करण्यात आली आहे. या वेळी प्रवाशांनी केवळ आलिशान ठिकाणांनाच नाही, तर खरी आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव देणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य दिलं आहे. लोक आता स्थानिक जीवनशैली अनुभवायला, पारंपरिक खाद्यपदार्थ चाखायला आणि छोट्या हॉटेलांमध्ये राहायला आवड देत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक अनुभवपूर्ण आणि खास बनतोय. चला तर जाणून घेऊ या या वर्षीचे टॉप १० बेस्ट ट्रॅव्हल देश.
जपान
सलग तिसऱ्या वर्षी जपानला जगातील सर्वोत्तम प्रवास देश म्हणून निवडण्यात आलं आहे. इथली निसर्गसौंदर्य, स्वच्छता, अनुशासन आणि आदरातिथ्य यामुळे प्रवासी पुन्हा पुन्हा येथे येण्यास उत्सुक असतात.
ग्रीस
२०२४ मध्ये दहाव्या स्थानावर असलेला ग्रीस या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर झेपावला आहे. येथील सुंदर बेटे, बीच रिसॉर्ट्स आणि अथेन्समधील ऐतिहासिक गल्लीबोळ हे याचे आकर्षण आहेत. निळ्या-पांढऱ्या रंगातील ग्रीक इमारती जगभरातील प्रवाशांना मोहित करतात.
पोर्तुगाल
पोर्तुगाल आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. अल्गार्वेचे स्वच्छ समुद्रकिनारे, डोंगराळ प्रदेश आणि मेडेरा व अजोरेस बेटे येथे पर्यटकांना शांतता आणि सौंदर्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. इथले प्राचीन किल्ले आणि फाडो संगीत यामुळे ही जागा अधिक जिवंत वाटते.
इटली
कला, इतिहास आणि स्वादिष्ट खाद्यसंस्कृती यांचा सुंदर मिलाफ म्हणजे इटली. रोमचे कोलोसियम, फ्लॉरेन्समधील रेनॅसांस कला आणि व्हेनिसच्या नयनरम्य कालवे हे पाहण्यासारखे आहेत. प्रत्येक गल्लीमध्ये इतिहास आणि रोमँटिक वातावरण जाणवते.
स्पेन
रंगीत संस्कृती आणि विविध भूप्रदेशांसाठी स्पेन ओळखला जातो. आता प्रवासी फक्त बार्सिलोना किंवा माद्रिदपुरते मर्यादित राहत नाहीत, तर बास्क प्रदेश आणि ग्रनाडासारख्या शहरांचा अनुभवही घेत आहेत. यामुळे त्यांचा प्रवास अधिक समृद्ध बनतो.
तुर्की
तुर्कीचे सौंदर्य त्याच्या ऐतिहासिक मशिदी, एजियन किनारे आणि आदरातिथ्य यामुळे आणखीन खुलते. इथला राष्ट्रीय Sustainable Tourism Program पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देतो. इस्तंबूलचे रस्ते इतिहास आणि आधुनिकतेचे अद्भुत मिश्रण आहेत.
आयर्लंड
हिरव्या गार दऱ्या, लोककथांची परंपरा आणि प्रसिद्ध पब संस्कृती या सगळ्यामुळे आयर्लंड प्रवाशांसाठी सदैव आकर्षक राहतो. इथले लोक अतिशय मैत्रीपूर्ण असून निसर्ग सौंदर्य मन मोहून टाकते.
क्रोएशिया
क्रोएशिया आपली मोहक डल्मेशियन किनारपट्टी, हजारो बेटे आणि सुंदर राष्ट्रीय उद्याने यामुळे लोकप्रिय आहे. येथील प्राचीन रोमन अवशेष आणि मध्ययुगीन शहरं इतिहासप्रेमींना खास आवडतात.
फ्रान्स
फ्रान्स म्हणजे फक्त पॅरिस नाही! येथील वाइनयार्ड्स, डोंगरातील खेडी, फ्रेंच रिव्हियेराचे समुद्रकिनारे आणि अप्रतिम खाद्यपदार्थ हे सर्व मिळून हा देश कला, इतिहास आणि रोमँसचा परिपूर्ण संगम बनवतात.
कॅनडा
या यादीतील एकमेव उत्तर अमेरिकन देश म्हणजे कॅनडा. येथील तलाव, जंगलं आणि बर्फाच्छादित पर्वत प्रवाशांना एक आगळा अनुभव देतात. साहस, शांतता आणि निसर्गप्रेम हे तिन्ही अनुभव कॅनडामध्ये एकत्र मिळतात. २०२५ मध्ये जगभर फिरण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही यादी प्रेरणादायक ठरू शकते. या देशांमध्ये केवळ सौंदर्यच नाही, तर अनुभव, संस्कृती आणि मनमिळाऊ लोकही भेटतात ज्यामुळे प्रवास आयुष्यभर लक्षात राहतो.






