(फोटो सौजन्य :istock)
आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुम्ही तुमच्या आहारात खूप जास्त अनहेल्दी पदार्थ खाल्ले तर तुम्हाला लठ्ठपणा आणि आरोग्याच्या अन्य समस्या उद्भवू शकतात. त्याच वेळी, जर तुम्ही निरोगी आहार घेतला तर तुम्ही तंदुरुस्त आणि हेल्दी लाइफस्टाइल जगू शकता.
तंदुरुस्त राहण्यासाठी, व्यायामासह आहारात निरोगी गोष्टींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आरोग्यदायी गोष्टी चुकीच्या पद्धतीने शिजवल्या आणि खाल्ल्या तर त्याचा तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी किंवा ते नियंत्रणात ठेवण्यासाठी अन्न बटर किंवा चुकीच्या तेलामध्ये फ्राय करतात ज्यामुळे आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम होत असतो. अलिकडेच, हार्वर्डच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बटरचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि शास्त्रज्ञांनी हे देखील सांगितले आहे की तुमच्या आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचे तेल सर्वोत्तम ठरू शकतो. अभ्यासात नक्की काय आढळून आले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
बटर देते मृत्यूला आमंत्रण
असे बरेच लोक आहेत ज्यांना जवळजवळ प्रत्येक गोष्टीत बटर घालून खायला फार आवडते, मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. JAMA इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या हार्वर्डच्या अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, जास्त प्रमाणात बटर सेवन केल्याने मृत्युदर वाढण्याचा धोका असतो, तर लोण्याऐवजी काही प्लांट बेस ऑईलची निवड केल्याने लोकांना जास्त काळ जगण्यास मदत होऊ शकते. अहवालात म्हटले आहे की जास्त प्रमाणात बटर खाल्ल्याने कर्करोगामुळे मृत्यूचा धोका देखील वाढतो. जे लोक जास्त प्रमाणात प्लांट ऑइलचे सेवन केले त्यांना कर्करोग किंवा स्ट्रोक किंवा हृदयविकार यांसारख्या हृदयरोगांमुळे मृत्यू होण्याचा धोका कमी होतो.
प्लांट ऑइलचे सेवन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका कमी होतो
शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, जे लोक जास्त प्रमाणात बटर खातात, त्यांना मृत्यूचा धोका अधिक असतो. ज्या लोकांनी सर्वात जास्त बटर खाल्लं, त्यांना कमीत कमी बटर खाल्ल्यांपेक्षा १५% जास्त मृत्यूचा धोका होता. याचा अर्थ, बटरच्या अतिसेवनामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्याचवेळी, जे लोक जास्त प्लांट ऑइलचे सेवन करतात, त्यांना मृत्यूचा धोका १६% कमी असतो.
डार्क सर्कल्सच्या समस्येने त्रस्त आहात? चमचाभर दह्यात मिक्स करा ‘हा’ प्रभावी पदार्थ, दिसाल कायम तरुण
या अभ्यासात पाच प्रकारच्या वनस्पती तेलांचा समावेश करण्यात आला होता, ज्यात सोयाबीन, कॅनोला, आणि ऑलिव्ह तेल हे प्रमुख होते. हे तेल जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, आवश्यक फॅटी ॲसिड्स आणि असंतृप्त चरबींनी समृद्ध असतात. या घटकांचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. संशोधनानुसार, या तेलांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि असंतृप्त चरबी कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सच्या पातळ्यांना नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात. तसेच, इन्सुलिन प्रतिरोधकता कमी करण्यासही ते फायदेशीर ठरतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.