ठाणे : ठाणेकर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाणेकरांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. ठाण्यातील घोडबंदर सेवा रस्त्याचे काँक्रिटीकरण, रायलादेवी तलावाचे सुशोभीकरण, वालधुनी नदीस समांतर २४ मीटर रुंदीचा रस्ता, अशा सुमारे १३०० कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांना (Development Work) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नागपुरात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
ठाणे ते बोरिवलीदरम्यानच्या दुहेरी बोगद्याच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उभारण्यास मान्यता देण्यात आली. ठाणे शहरातील रायलादेवी तलावाचे ६० कोटी २४ लाख रुपये खर्चुन सुशोभीकरण, कापूरबावडी ते गायमुखदरम्यान मुख्य व सेवा रस्त्याचे क्रॉक्रिटीकरणासाठी ५५९.२७ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. मेट्रोच्या ठाणे आणि परिसरातील विविध मेट्रो मार्गिकांसाठी मोगरपाडा येथे कारशेड उभारण्यात येणार असून, त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यातील अधिकृत शेतकऱ्यांना २२.५ टक्के आणि अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना १२.५ टक्के विकसित जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्गत डॉबविली व भिवंडी शहरांना जोडणाऱ्या मानकोली-मोठागाव जोडरस्ता व राष्ट्रीय महामार्गादरम्यान तयार होणाऱ्या जंक्शनवर ५७.६७ कोटी रुपयांचा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मुरबाड रोड, बदलापूर रोड आणि पुणे लिंक रोड यांना जोडणारा वालधुनी नदीस समांतर असा २४ मीटर रुंदीचा रस्ता व त्यावरील दोन उड्डाणपूल बांधण्यासाठी ६४२ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
कर्जत ते हाळ फाटा रस्त्याच्या कामासाठी भू संपादनाकरिता १०० कोटी, मुंबई- गोराई रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या खाडी पूल आणि पोहोच रस्त्यासाठी ८८८. ८४ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.