Maharashtra Breaking News Updates Today
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज एका नव्या हरित पर्वाला प्रारंभ होत आहे. रेल्वेमार्गावर आवाज किंवा धूर दिसणार नाही, एका स्वच्छ भविष्याचा वेग दिसेल. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर चालणारी भारतातील पहिली ट्रेन रुळांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन सुरुवातीला जिंद आणि सोनीपत रेल्वे स्थानकांदरम्यान धावेल.
पारंपरिक इलेक्ट्रिक किंवा डिझेल इंजिनच्या विरुद्ध ही ट्रेन हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रक्रियेत, हायड्रोजनचे विजेमध्ये रूपांतर केले जाते, जी ट्रेनला पुढे नेते. या प्रक्रियेत कार्बन उत्सर्जन होत नाही आणि उप उत्पादन म्हणून फक्त पाण्याची वाफ तयार होते. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन स्वतःच ऊर्जा निर्माण करते. ती हवेतील ऑक्सिजनची हायड्रोजनसोबत अभिक्रिया करून वीज निर्माण करते, ज्यामुळे इंधनाचे ज्वलन टाळले जाते आणि कोणत्याही बाह्य वीज पुरवठ्याची आवश्यकता राहत नाही.
17 Jul 2026 06:00 PM (IST)
UPI Payment Charges: डिजिटल पेमेंट वापरकर्त्यांना एका मोठा धक्का बसणार आहे. आतापर्यंत आपण UPI पेमेंट पूर्णपणे फ्री वापरत होतो. पण आता त्यावर अतिरिक्त शुल्क लागण्याची शक्यता आहे. ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांसाठी मोठ्या व्यापाऱ्यांकडून अतिरीक्त शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. सध्या, UPI पेमेंट पूर्णपणे मोफत आहे, परंतु व्यवहारांची झपाट्याने वाढणारी संख्या आणि वाढता खर्च लक्षात घेता, ही प्रणाली बदलण्याची तयारी सुरू आहे. नेमका काय बदल होणार आणि त्याचा सामान्यांवर काय परिणाम होणार?
17 Jul 2026 05:40 PM (IST)
Moshi Garbage Depot Accident: मोशी येथील कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या 9 नागरिकांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पीसीएमसीचे महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार ही मदत तातडीने वितरित करण्याचे काम सुरू कऱण्यात आले आहे. मृत अक्षय सावंत यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
17 Jul 2026 05:20 PM (IST)
Bab el-Mandeb Strait trade disruption 2026 : जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी वर्तुळातून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे. मध्य पूर्वेतील (Middle East) अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाचे सावट आता जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांवर पडले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) वाहतूक आधीच प्रभावित झाली असताना, आता इराणच्या इशाऱ्यानंतर येमेनच्या हुथी बंडखोरांनी ‘बाब अल-मंदेब’ (Bab el-Mandeb Strait) हा सागरी मार्ग पूर्णपणे बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. इराणच्या ऊर्जा आणि वीज पायाभूत सुविधांवर अमेरिकेने हल्ले केल्यास, हुथी बंडखोर या रणनीतिक मार्गाची संपूर्ण नाकेबंदी करतील, असा इशारा देण्यात आला आहे. हा मार्ग बंद झाल्यास केवळ जागतिक अर्थव्यवस्थाच कोलमडणार नाही, तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेला आणि अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो.
17 Jul 2026 05:10 PM (IST)
Japan Open 2026 Semifinal: जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये सध्या जपान ओपन सुपर 750 स्पर्धा सुरू आहे. या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. पीव्ही सिंधूने दोन वेळा ऑलिंपिक स्पर्धेत देखील पदक जिंकले आहे. आता तिने जपान ओपन स्पर्धेच्या (Sports) सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत महिला एकेरी स्पर्धेत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आगामी काळात लवकरच एशियन्स गेम्स स्पर्धा होणार आहे. त्यामुळे परतलेला पीव्ही सिंधूचा फॉर्म भारतासाठी दिलसडायक समजला जात आहे. 17 जुलै रोजी झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये पीव्ही सिंधूचा विजय झाला आहे.
17 Jul 2026 05:01 PM (IST)
टेस्लाने आपली लोकप्रिय ‘Model X’ ही मोठी एसयूव्ही बंद करून, तिची जागा घेण्यासाठी आता अधिक प्रशस्त आणि आरामदायी अशी ‘2027 Model Y L’ मार्केटमध्ये आणली आहे. सहा सीटर येणारी ही कार जिची बांधणी २+२+२ अशी आहे, आता टेस्लाच्या ताफ्यातील सर्वात प्रशस्त मॉडेल ठरली आहे. अमेरिकेत हिच्या ‘प्रीमियम लाँच एडिशन’ची किंमत ६३,६३० डॉलर्स म्हणजे जवळपास ५३ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
17 Jul 2026 04:57 PM (IST)
उद्धव ठाकरे (Uddhav Thaceray) यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दांत राजकीय निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे हे प्रभू श्रीरामाचा राजकीय आधार घेऊन आपला गमावलेला पाठिंबा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा थेट आरोप बावनकुळे यांनी केला. तसेच ठाकरेंची नागपूरमधील आगामी ‘रामरक्षा’ मोहीम ही पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावाही त्यांनी केला. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चौफेर टीका केली. वाचा सविस्तर...
17 Jul 2026 04:47 PM (IST)
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील गोबिंदापूर रेल्वे फाटकावर शुक्रवारी (17 जुलै 2026) सकाळी भीषण अपघात झाला. शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला भरधाव ट्रेनने जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण अपघातात दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांसह एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. तर व्हॅनमधील अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
17 Jul 2026 04:37 PM (IST)
जागतिक पातळीवर आणि भारताच्या शेजारी देशात एक अत्यंत खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. पाकिस्तानने गेल्या ७८ वर्षांपासून आपल्या बेकायदेशीर ताब्यात ठेवलेल्या गिलगिट बाल्टिस्तान (Gilgit-Baltistan) या क्षेत्राला पूर्णपणे आपल्या देशात विलीन करण्यासाठी हालचाली तीव्र केल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ ( आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या मार्गदर्शनाखाली गिलगिट बाल्टिस्तानच्या विधानसभेने या भागाला पाकिस्तानचा ‘पाचवा प्रांत’ (Provisional Fifth Province) बनवण्याचा एक संयुक्त ठराव बिनविरोध मंजूर केला आहे. वाचा सविस्तर...
17 Jul 2026 04:27 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी घेतलेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. राज्यातील राजकीय वातावरणात आधीच मोठ्या घडामोडी घडत असताना या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. या भेटीबाबत सुनेत्रा पवार यांना माहिती नव्हती आणि त्या नाराज आहेत, अशा चर्चादेखील रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांवर आता सुनील तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. वाचा सविस्तर...
17 Jul 2026 04:17 PM (IST)
सर्वोच्च न्यायालयाने हिंदू उत्तराधिकार कायद्यासंदर्भात दूरगामी निकाल दिला आहे. वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता विकताना भावंडांना प्रथम खरेदीचा हक्क असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला जमीन वारसा हक्काने मिळाली असेल आणि त्यांना आपला वाटा बाहेरील व्यक्तीला विकायचा असेल, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबातील इतर वारसांना ती खरेदी करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांनी खरेदी करण्यास असमर्थता दर्शवली, तरच ती मालमत्ता तिसऱ्या व्यक्तीला विकली जाऊ शकते. वाचा सविस्तर...
17 Jul 2026 04:07 PM (IST)
सध्या हंगेरी देशात बुडापेस्ट रँकिंग (Sports) सिरीज सुरू आहे. या स्पर्धेत भारताने चांगली यशस्वी कामगिरी केली आहे. येथे सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. 19 वर्षीय हंसिका लांबाने रौप्य पदक जिंकले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे. वाचा सविस्तर...
17 Jul 2026 04:00 PM (IST)
नागपूर: वाढता गुन्हेगारीचा दर आणि कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन, नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध चौकांमध्ये नाकाबंदी, विशेष तपास आणि वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता कर्तव्यावर असताना ‘सर्व्हिस गन’ बाळगणे बंधनकारक आहे. पोलीस आयुक्तांनी गुरुवारी यासंबंधी आदेश जारी केले. वाचा सविस्तर
17 Jul 2026 03:55 PM (IST)
सई ताम्हणकर स्टारर सिनेमा ‘बोल बोल राणी’ आज सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन सिड विन्सूरकरने केले आहे. सईच्या अभिनयाने प्रेक्षक दंग झाले आहेत. या थरारक सिनेमामध्ये सई ताम्हणकरसह अभिनेता सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर तसेच अभिनेता संभाजी ससाणे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या तिन्ही पात्रांभोवती संपूर्ण सिनेमाची गोष्ट फिरते. मराठी मर्डर मिस्ट्री सिनेमा असल्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी अनेक मराठी नजरा आतुर होत्या. हा सिनेमा अखेर सिनेगृहात आला आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 03:50 PM (IST)
इराण आणि अमेरिकेचे युद्ध पुन्हा सुरु झाले आहे . हल्ले प्रतिहल्ले सुरु असतानाच , अमेरिकेने पुन्हा युद्धाचा नियम मोडला . इराणच्या अहवाज शहरात असलेल्या लहानमुलांच्या कॅन्सर हॉस्पिटल वर हल्ला झाला . सुदैवाने यात कोणीही मृत्युमुखी पडले नाही . पण हॉस्पिटल मधून आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामुळे उपचार घेणाऱ्या लहान मुलांच्या उपचारात अडथळे निर्माण झाले आहेत . या झालेल्या हल्ल्यामुळे इराण ने येमेन बंडखोर हुतींना मदत करण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 03:45 PM (IST)
Trump US Elections Controversy : अमेरिकेतील आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिथले राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीबाबत केलेल्या एका नवीन आणि वादग्रस्त विधानामुळे देशात मोठी राजकीय खळबळ माजली आहे. ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, २०२० च्या निवडणुकीदरम्यान चिनी मतदारांचा डेटा हॅक करण्यात आला होता आणि या संपूर्ण डेटा चोरीच्या प्रक्रियेत रशिया तसेच इराणचा थेट सहभाग होता. ट्रम्प यांच्या या विधानानंतर अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 03:40 PM (IST)
Fifa World Cup/Arjentina in Final 2026: फिफा वर्ल्डकपचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. दोन्ही सेमीफायनल पूर्ण झाल्या आहेत. 19 जुलै रोजी फिफा वर्ल्डकपकहा अंतिम सामना होणा आहे. अर्जेंटीना आणि स्पेनमध्ये अंतिम सामना होणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. या संपूर्ण वर्ल्ड कप दरम्यान (Sports) अर्जेंटिनाच्या सामन्यांमधील रेफरींच्या निर्णयांवरून बरीच टीका झाली होती. त्याला आता लिओनेल मेस्सीने प्रत्युत्तर दिले आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 03:35 PM (IST)
PMRDA News: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली (UDCPR) लागू करण्यात आली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने यासंदर्भात आदेश जारी केले असून, या निर्णयामुळे बांधकाम परवानग्या, चटई क्षेत्र निर्देशांक (FSI), हस्तांतरणीय विकास हक्क (TDR), पुनर्विकास आणि विकास प्रकल्पांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 03:30 PM (IST)
ब्रह्मांडात आपण एकटेच आहोत का? पृथ्वीशिवाय इतरही कुठल्या ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? या शतकानुशतके मानवाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याच्या आपण अगदी जवळ पोहोचलो आहोत. खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक अत्यंत क्रांतिकारी टप्पा गाठला आहे. आपल्या सूर्यमालेबाहेरील एका खडकाळ ग्रहाभोवती शास्त्रज्ञांना घन वातावरणाचा निश्चित आणि स्पष्ट पुरावा सापडला आहे. हा शोध अशा भागात लागला आहे ज्याला विज्ञानाच्या भाषेत ‘वासयोग्य क्षेत्र’ म्हणजेच ‘गोल्डीलॉक्स झोन’ (Habitable Zone) म्हटले जाते. या शोधामुळे पृथ्वीपलीकडे एलियन्स किंवा इतर जीवसृष्टी असण्याच्या दाव्याला आतापर्यंतचा सर्वात मोठा वैज्ञानिक आधार मिळाला आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 03:25 PM (IST)
Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने भारतात एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात Motorola Edge 70 Max या नावाने लाँच केला आहे. कंपनीने त्यांच्या Edge 70 लाइनअपचे पाचवे मॉडेल म्हणून हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हे डिव्हाईस भारतात Pantone-क्यूरेटेड तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 03:20 PM (IST)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १९ ते २५ जुलै २०२६ च्या कालावधीत युरोप देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या मोल्डोव्हा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाला भेट देणार आहे. मोल्डोव्हाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्या निमंत्रमावरुन हा दौरा होत आहे. भारतीय राष्ट्रपतींची मोल्डोव्हाला ही पहिली भेट ठरेल. जाणून घ्या काय आहे दौऱ्याचा उद्देश?
17 Jul 2026 03:15 PM (IST)
पावसाला सुरुवात झाल्याने संभाजीनगर जिल्ह्यातील टैंकर बंद करण्यात आले होते. मात्र मोजकेच दिवस बरसल्यानंतर पावसाने ओढ दिली. आज जुलै महिना सुरु होऊनही पावसाचा पत्ता नसल्याने संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यात पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. परिणामी विभागातील एकूण १८२ गावे आणि ११७ वाड्या अद्याप तहानलेल्याच आहेत. वाचा सविस्तर
17 Jul 2026 03:10 PM (IST)
Ladki Bahin Yojana News Marathi : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यभरात लाभार्थ्यांच्या पात्रतेची छाननी सुरू असून, विविध जिल्ह्यांमधून अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 5 लाख महिलांना मोठा धक्का बसला आहे. शासनाने निश्चित केलेल्या पात्रता निकषांनुसार तपासणी केल्यानंतर या महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना मिळणारा दरमहा 1,500 रुपयांचा आर्थिक हप्ता आता कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 03:05 PM (IST)
राज्याच्या राजकारणात आता मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात होणाऱ्या नव्या बदलांच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरणात घडामोडीना वेग आला आहे. अश्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चाना उधाण आले आहे. आधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची घटना ताजी असतानाच आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे समजत आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 02:59 PM (IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तूर्तास रद्द झाला आहे. अकरा वाजता एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदन इथल्या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. काल एकनाथ शिंदे यांची जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या भेटीनंतर आज एकनाथ शिंद नंदनवन या ठिकाणी महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
17 Jul 2026 02:50 PM (IST)
मुंबई गोवा महामार्गावरील सर्विस रोडला मोठे भगदाड पडले आहे. महामार्गावर कासार्डे येथील सर्विस रोडला हे भगदाड पडले आहे. चार ते पाच फुटाचं हे भगदाड असून त्याला बुजवण्याऐवजी प्रशासनाने बाजूला माती भरलेल्या पिशव्या लावण्याचा अजब कारभार केलाय. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र महामार्ग प्रशासनाने केलेल्या अजब उपाय योजनेमुळे अपघात होऊन वाहन किंवा वाहनचालक यांना दुखापत होण्याची शक्यता आहे.
17 Jul 2026 02:39 PM (IST)
अकोला शहरात देहव्यापाराविरोधात सिव्हिल लाईन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित अड्डयावर छापा टाकत देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत देहव्यापार चालवत असल्याचा आरोप असलेल्या एका महिलेसह ग्राहक म्हणून आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पीडित तरुणीची सुटका करून तिला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी चौघांविरोधात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटचे आणखी काही धागेदोरे आहेत का, तसेच संबंधित महिलेकडून अन्य ठिकाणीही अशाच प्रकारचा व्यवसाय चालवला जात होता का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
17 Jul 2026 02:31 PM (IST)
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात तेलंगणा राज्य परिवहन प्रवासी बसवर अचानक एक मोठे झाड कोसळले. झाडाच्या मोठ्या फांद्यांनी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची समोरची काच फोडली. सुदैवाने चालक मल्लेश यादवने वेळीच ब्रेक लावल्यामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. अपघातानंतर चंद्रपूर-तेलंगणा महामार्ग दीर्घकाळ बंद होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जेसीबी, क्रेन आणि कटरच्या मदतीने भलेमोठे झाड युद्धपातळीवर तोडण्याचे काम सुरू करण्यात आले.
17 Jul 2026 02:22 PM (IST)
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे आंदोलनाला राजकीय रंग चढण्याची चर्चा सुरू झाली आहे.
17 Jul 2026 02:11 PM (IST)
सुनील तटकरे यांनी पार्थ पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ शकतात, असं वक्तव्य केलं आहे. या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चाना उधाण आलं आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, ते संसदेतील खासदार आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांना भेटू शकतात. त्यामध्ये वावगं वाटण्याचं कारण नाही. ते प्रशासकीय कामासोबत संघटनेच्या कामाची चर्चा करत असले तरी वेगळं वाटण्याचं कारण नाही, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले.
17 Jul 2026 02:00 PM (IST)
संभाजीनगरात धावत्या बसला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. बसला आग लागताच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
17 Jul 2026 01:45 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी व्हाईट हाऊसमधून थेट प्रक्षेपित केलेल्या एका महत्त्वपूर्ण भाषणात जागतिक राजकारणाला हादरवून सोडणारा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या मते, २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान चीनने अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा डेटा फेरफार (Data Compromise) घडवून आणला होता. चीनने बेकायदेशीरपणे तब्बल २२ कोटी अमेरिकन मतदारांच्या फाईल्स मिळवल्या होत्या आणि या माहितीचा वापर अमेरिकन निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी करण्यात आला होता, असा थेट आरोप त्यांनी चीनवर केला आहे.
17 Jul 2026 01:35 PM (IST)
बारावी किंवा पदवी पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे एकच स्वप्न असते. परदेशात जाऊन दर्जेदार शिक्षण घेणे. मात्र, अमेरिका, ब्रिटन किंवा ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमधील महागडे शिक्षण आणि राहणीमान पाहून अनेक जण मागे हटतात. अशा विद्यार्थ्यांसाठी जर्मनी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. येथे जागतिक दर्जाचे शिक्षण तुलनेने कमी खर्चात मिळते. विशेष म्हणजे अनेक सरकारी विद्यापीठांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क घेतले जात नाही किंवा अत्यंत कमी शुल्क आकारले जाते.
17 Jul 2026 01:20 PM (IST)
देशभरात E20 इंधनासंदर्भात बरीच वादावादी सुरु आहे. सध्या वाढत चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. या विषयाला आव्हान देणारी एक आणखी नवीन बातमी समोर आली आहे. तीन पेट्रोल पंप मालकांनी E20 इंधनासंदर्भात एक नवीन आव्हान दिलं आहे. नेमका काय आहे प्रकार समजून घेऊयात.
17 Jul 2026 01:15 PM (IST)
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नुकतीच आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीनंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. ही केवळ औपचारिक सदिच्छा भेट होती की आगामी काळातील नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क रंगू लागले आहेत.
17 Jul 2026 01:10 PM (IST)
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर मोठ्या आशेने पेरणी केलेल्या शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता थेट दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने कपाशीची पिके शेतातच सुकू लागली आहेत. हजारो रुपये खर्च करून कपाशीची लागवड केलेला शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसला असून, संपूर्ण तालुक्यात चिंतेचे सावट पसरले आहे.
17 Jul 2026 01:05 PM (IST)
सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता कलाकार मंडळींकडून पाठिंबा मिळत आहे.सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या विविध मागण्यांवर सरकारने चर्चा करावी, अशी त्यांची भूमिका आहे. या आंदोलनाला अनेक क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून काही कलाकारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली आहे. 3 Idiots या चित्रपटात आमिर खानने सोनम वांगचुक यांचे पात्र साकारले होते. पण आज अनेक कलाकार त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत उपोषण सोडण्याची मागणी करत आहेत. मात्र आमिर खाननं आणि सिनेमातील इतर कलाकरांनी अजून भाष्य केलं नाही. असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर आमिर खानने यावर मौन सोडले आहे.
17 Jul 2026 01:00 PM (IST)
पोपट पिटेकर, शेवगाव : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर मोठ्या आशेने पेरणी केलेल्या शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता थेट दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने कपाशीची पिके शेतातच सुकू लागली आहेत. हजारो रुपये खर्च करून कपाशीची लागवड केलेला शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसला असून, संपूर्ण तालुक्यात चिंतेचे सावट पसरले आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 12:55 PM (IST)
अमेरिका आणि इराणमधील सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन आणि पाकिस्तानने पुन्हा दोन्ही देशांना चर्चा सुरु करण्याचे आवाहन केले आहे. चीनने लष्करी कारवाईऐवजी संवादातूनच तोडगा निघू शकतो असे म्हटसे आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१७ जुलै) शांघाय येथे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्यात झालेल्या बैठकीत पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले. यावेळीयावेळी वांग यी यांनी अमेरिका आणि इराणने युद्धविराम कराराचे पालन करण्याचे आणि आपापली आश्वासने पूर्ण करण्याचे आवाहन केले.
17 Jul 2026 12:50 PM (IST)
गुजरात STS ने राज्यातील विविध जिल्ह्यांमधून दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'शी संबंधित आणखी पाच जणांना अटक केली आहे.
17 Jul 2026 12:45 PM (IST)
रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या कारणावरुन भारतावर १००% शुल्क लादण्याची तयारी सुरु आहे. यासाठी अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर करण्यात आले आहे. या विधेयकाला डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाकडून पाठिंबा मिळाला आहे. यामध्ये चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि अझरबैजान या देशांचाही समावेश आहे.
17 Jul 2026 12:40 PM (IST)
देशाचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या अनिश्चितकालीन उपोषणाचा आज विसावा दिवस आहे. तर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज 27 वा दिवस आहे. सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांनी या आंदोलनाच्या माध्यतून देशातील शिक्षण सुधारणेसाठी आणि पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. पण मुद्दयावरुन आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. तसेच ज्यांना हे आंदोलन गंभीर नाही असे वाटत आहे त्यांनी भर उन्हात ४५ डिग्रीमध्ये इथे बसून दाखवावं असे चॅलेंजही दिले आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 12:35 PM (IST)
Paresh Rawal On Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेते परेश रावल सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. त्यांनी नुकतेच काही खुलासे केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी अक्षय कुमारवरही निशाणा साधला आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या.
17 Jul 2026 12:30 PM (IST)
NEET UG 2026 Result Out : वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) NEET UG 2026 परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केली असून निकालही जाहीर करण्यात आला आहे. आता मात्र विद्यार्थ्यांना गुणांची खात्री करण्यासाठी किंवा पुढील प्रवेश प्रक्रियेला वेग येईल. निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ दूर झाला. यंदाच्या परीक्षेत जवळपास २० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ११.२१ लाखांहून अधिक विद्यार्थी वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुष आणि इतर आरोग्यविषयक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५८ टक्के विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे यंदाही मुलींनी उत्कृष्ट कामगिरीची छाप सोडली आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 12:25 PM (IST)
ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Ajio बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे का? सध्या याबाबत सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. कंपनीने स्वत: त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत अकाऊंटवरील असामान्य हालचालींबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता कंपनीचं इंस्टाग्राम अकाऊंट खरंच हॅक झालं आहे का की, ही कोणती मार्केटिंग ट्रिक आहे अशी चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 12:20 PM (IST)
Narendra Modi On Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद आणि सोनीपत दरम्यान धावण्यासाठी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१७ जुलै 2026) या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला असून लवकरच प्रवाशांसाठी सज्ज राहणार आहे. ट्रेनचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून, या ट्रेनचा प्रवास अगदी स्वस्तात मस्त आहे. ही ट्रेन जिंद आणि सोनीपत रेल्वे स्थानकांदरम्यान धावेल. हायड्रोजन गळती, उष्णता, आग आणि धूर ओळखण्यासाठी ही ट्रेन अनेक सुरक्षा प्रणालींनी सुसज्ज आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 12:15 PM (IST)
कॅनडा सध्या एका अत्यंत विनाशकारी आणि अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे. देशातील विविध प्रांतांमधील जंगलांना लागलेले वणवे आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेले आहेत. या भीषण आगींमुळे केवळ हिरवीगार जंगलेच जळून खाक होत नसून, मानवी वस्त्याही राखेच्या ढिगाऱ्यात बदलत आहेत. या आपत्तीमुळे निर्माण झालेला विषारी धूर आता केवळ कॅनडापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो शेजारील देश अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील लाखो नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून पर्यावरणाची कधीही भरून न निघणारी हानी होत आहे. वाचा सविस्तर
17 Jul 2026 12:10 PM (IST)
देशभरात संतापाची लाट उसळवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या बहुचर्चित प्रकरणात न्याय मिळण्याची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याच्यावर श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असली तरी ती अत्यंत संथ गतीने होत असल्याने श्रद्धाच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
17 Jul 2026 12:05 PM (IST)
Jio Satellite Internet: भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आता टेलिकॉम बिजनेस जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांच्याशी थेट स्पर्धा करण्यास सज्ज झाले आहेत. ज्यामुळे आता भारतात सॅटेलाइट इंटरनेट क्रांतीची सुरुवात होणार आहे. भारताची स्पेस रेगुलेटर IN-SPACeने, रिलायन्स जिओच्या सुमारे १,६०० लो अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रह तैनात करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर सरकारी अधिकाऱ्याने ही बातमी दिली आहे.
17 Jul 2026 12:00 PM (IST)
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने नागरिकांना हादरवून सोडले आहे. सुरुवातीला पोलिसांनाही या प्रकरणाचा उलगडा करणे जास्त कठीण झाले होते. कारण हा मृत्यदेह एका सुनसान ठिकाणी सापडलेला होता. मृतदहेहाची अवस्था इतकी भीषण होती की, मृत व्यक्तीची ओळख पटवणे हेच सर्वात मोठे आव्हान बनले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या सातत्यारपूर्ण तपासामुळे या गूढ प्रकरणामागचे सत्य अखेर समोर आले.
17 Jul 2026 11:55 AM (IST)
तुम्ही देखील गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत आहात का? तर येणाऱ्या काळात तुम्हाला एक चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने नवीन मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम म्हणजेच MPMS ला मंजूरी दिली आहे. ही स्कीम पुढील 5 वर्षांपर्यंत लागू राहणार आहे. या स्कीमचा उद्देश भारतात मोबाईल फोनचे प्रोडक्शन वाढवणं आणि यासोबतच स्थानिक कंपन्यांना अधिक मजबूत करणं, असा आहे. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. पण सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे स्मार्टफोन स्वस्त होणार का?



