संग्रहित फोटो
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शनिवार व रविवार या दोन दिवसात तब्बल २१ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. या उच्छादाने त्रासलेल्या ग्रामस्थांनी अखेर या कुत्र्याला मारल्याचे निष्पन्न झाले असून, २१ पैकी १२ जणांनी श्वानदंश प्रतिबंधक लस घेतल्याची माहिती सरपंच रमेश गडदे यांनी दिली.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शनिवार व रविवार या दोन दिवसात महाबळेश्वरनगर, इको ग्राम सोसायटी व तळेगाव रोड परिसरात दोन पिसाळलेली कुत्रे फिरत असून, ती नागरीकांवर हल्ला करीत असल्याची बाब निष्पन्न झाली. सुरवातीला ही केवळ चर्चा होती मात्र आज रविवारी सकाळी सुमारे २१ जणांना सदर पिसाळलेले कुत्रे चावल्याचे आज निष्पन्न झाले. यातील १२ जनांनी शिक्रापूर ग्रामिण रुग्णालयात उपचार घेतल्याची माहितीही शिक्रापूर ग्रामपंचायतीकडे उपलब्ध झाली असून, सदर कुत्र्याच्या शोधार्थ सकाळपासूनच पेट पोर्स संस्थेचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत कर्मचारी संपूर्ण गावात फिरत होते. मात्र इकोग्राम सोसायटी परिसरातील काही नागरीकांनी यातील एक पिसाळलेले कुत्रे मारल्याचे निष्पन्न झाले आहे.
दूसरे पिसाळलेले कुत्रे आहे की नाही याबाबत अद्यापही संभ्रम असून, त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान गावात अॅंटीरॅबीज लसीकरण यापूर्वी मोठ्या प्रमाणात केले असून, तरीही अशी कुत्री सापडणे आमच्यासाठी आव्हान असून ग्रामस्थांनी संशयास्पद वावरणाऱ्या कुत्र्यांची माहिती तातडीने ग्रामपंचायतीला कळविण्याचे आवाहन सरपंच रमेश गडदे यांनी केले. शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे आज सकाळपासून श्वान दंश झालेले अनेक रुग्ण आल्यानंतर त्यांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कदम यांनी दिली.
हे सुद्धा वाचा : हाँकाँगमधून कागद मागवून बनावट नोटाची छपाई; कोल्हापुरातील दोघांना अटक
पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ६६ जणांचा घेतला चावा
गेल्या काही महिन्याखाली आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत भागीरथी नाल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने दोन दिवसांत तब्बल ६६ नागरिकांना चावा घेतला आहे. आळंदीतील भागीरथी नाल्यावरून ये-जा करीत असताना रविवारी (१५ डिसेंबर) २० जणांना, सोमवारी ( १६ डिसेंबर ) दुपारी दोन पर्यंत ४४ जणांना तर दुपारी दोन नंतर आणखी दोन जणांना कुत्र्याने चावा घेतला. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पिंपरी – चिंचवड महापालिका पशु वैद्यकीय विभागाच्या लोखंडी पिंजऱ्यात कुत्र्यास जेरबंद करून पुढील उपचारास सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, घडलेल्या घटनेमुळे आळंदीतील नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे.