
Maharashtra Breaking News Today 12. 09.2026
Sonam Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण!
उपोषणाला बसलेले प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणात उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून केली जात होती. उपोषणादरम्यान बिघडलेल्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने जंतर-मंतरवरून हलवून रुग्णालयात दाखल केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.
24 Jul 2026 06:10 PM (IST)
मुंबई: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील ६१ हजार ९०० पात्र शेतकऱ्यांना ५२३ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, २४ जुलै रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दोन लाखापर्यत थकीत कर्ज असलेली पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
24 Jul 2026 06:07 PM (IST)
भारत आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील ४,०९६ किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. भारताने आपल्या हद्दीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध शोधमोहीम तीव्र केल्यानंतर ढाका (बांगलादेश सरकार) आणि भारतीय सीमा सुरक्षा बल (BSF) यांच्यात थेट वाद पेटला आहे. पूर्व सीमेवरील चुआडांगा आणि कुश्तिया जिल्ह्यांच्या हद्दीत भारतीय सीमा सुरक्षा दलाने बेकायदेशीर स्थलांतरितांना बांगलादेशी हद्दीत ढकलण्याचा (Push-in) प्रयत्न केल्याचा आरोप बॉर्डर गार्ड बांगलादेशने (BGB) केला आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंचे जवान सीमेवर अलर्ट मोडवर आले असून तणाव कमालीचा वाढला आहे.
24 Jul 2026 05:53 PM (IST)
विकेंडला मित्र-परिवारासोबत पार्टी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शनिवार, २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील दारूची दुकाने, बार, पब आणि वाईन शॉप्स दिवसभर बंद राहणार आहेत. आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक सणांपैकी एक मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. राज्यभरातील मंदिरांमध्ये विशेष पूजा, अभिषेक, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
24 Jul 2026 05:45 PM (IST)
अपोलो हॉस्पिटल्सच्या सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विदिता पोवळे यांच्या मते, अनेकजण घशात खवखव, आवाज बसणे किंवा तोंडात लहानशी जखम होणे यांसारख्या समस्यांकडे साधा सर्दी-खोकला किंवा हंगामी संसर्ग समजून दुर्लक्ष करतात. मात्र, ही लक्षणे सतत कायम राहिल्यास ती डोके आणि मानेच्या कर्करोगाची (Head & Neck Cancer) सुरुवातीची चिन्हेही असू शकतात. भारतात डोके आणि मानेचा कर्करोग हा सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे आणि वेळेवर निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते.
24 Jul 2026 05:30 PM (IST)
Cricketers On CJP Protest: सध्या देशाची राजधानी दिल्ली येथे सीजेपी जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणात हे आंदोलन सुरू आहे. सीजेपी आणि विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. यात आता क्रिकेटपटूंनी देखील आपल्या पोस्ट शेयर केल्या आहेत. खेळाडूंनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पहायला मिळत आहे.
24 Jul 2026 05:10 PM (IST)
कर्जत: गेली तीन दिवस नेरळ गाव आणि परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे.नेरळ मध्ये पाण्यापासून अनेक समस्यांना येथील रहिवाशी यांना सामोरे जावे लागत असून नेरळ मधील वीज ग्राहकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे नेरळ येथे पोहचले.नेरळ येथे आमदार महेंद्र थोरवे यांनी नेरळ मधून वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नेरळ मधून निघून जाऊ नये अशा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
24 Jul 2026 05:00 PM (IST)
तुर्कस्तानच्या (Turkey) राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या एका अजब आणि विचित्र निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तुर्कस्तानच्या ईशान्येकडील अर्दाहान (Ardahan) प्रांताचे गव्हर्नर मेहमेट फातिह चिचेक्ली (Mehmet Fatih Çiçekli) यांना सायकल चालवताना घट्ट क्रीडा पोषाख (Cycling Tights/Shorts) घातल्याच्या वादावरून त्यांच्या पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी स्वाक्षरी केलेल्या एका आदेशाद्वारे (Presidential Decree) ही कारवाई करण्यात आली. जरी सरकारने अधिकृतपणे या हकालपट्टीमागील नेमके कारण स्पष्ट केले नसले, तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सायकलिंग पोषाखावरून राजकीय वर्तुळात रंगलेल्या वादंगामुळेच ही कारवाई झाल्याचे तुर्की माध्यमांनी स्पष्ट केले आहे.
24 Jul 2026 04:58 PM (IST)
NEET पेपरफुटीच्या आणि परीक्षेतील पारदर्शकता मुद्द्यावरून राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरु आहे. तसेच, दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नावाने केलेले एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, कोहलीने ( Virat Kohli) विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला असून निष्पक्ष परीक्षा पद्धती आणि पारदर्शकतेची मागणी केली आहे. परंतु, खरंच विराट कोहलीने या आंदोलनावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे का, जाणून घेऊयात.
24 Jul 2026 04:44 PM (IST)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसद परिसरातील एका पत्रकार परिषदेत एका पीडित तरुणाला प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. राहुल गांधी यांनी दावा केला की, जंतरमंतर येथे तिरंगा हातात घेऊन शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या या विद्यार्थ्यावर ‘पॅलेट गन’चा वापर करण्यात आला, ज्यामुळे त्याची एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गेली. आंदोलकांवर पेलेट गनचा वापर केल्याचा इन्कार करणाऱ्या सरकारच्या दाव्यांना फेटाळून लावताना राहुल गांधी म्हणाले की, यूपी पोलीस भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो तरुणांवर लाठीचार्ज आणि पेलेट गनचा वापर करण्यात आला होता.
24 Jul 2026 04:30 PM (IST)
दिल्लीत नीट (NEET) परीक्षा गोंधळाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या भीषण लाठीमारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अत्यंत आक्रमक झाले आहेत. “शाळेत विद्यार्थ्यांना मारण्यास शिक्षकांना बंदी आहे, मग आंदोलक विद्यार्थ्यांना अमानुषपणे तुडवण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला?” असा रोखठोक प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी आदेश देणाऱ्या व्यवस्थेवर आणि पोलिसांच्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच या गंभीर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) भूमिकेवरही त्यांनी आश्चर्य व्यक्त करत नापसंती दर्शवली आहे.
24 Jul 2026 04:20 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर शहरातील हजारो ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या उत्तम उपहार गृहामध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) धाडीत समोर आले. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या निर्मितीत वारंवार वापरलेले तेल आणि डालडा, झुरळांचा वावर, अस्वच्छता, कृत्रिम रंगाचा बेजबाबदार वापर आणि इतर गंभीर त्रुटी आढळल्याने प्रशासनाने आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करत व्यवसाय बंद केला. शहरातील नावाजलेल्या उपहारगृहावरील या कारवाईने खाद्यसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
24 Jul 2026 04:10 PM (IST)
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतल्यानंतर उपोषण संपवले आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) नेतृत्वाखालील सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वांगचुक २८ जूनपासून उपोषणावर होते. त्यांनी सांगितले की, २६ दिवसांनंतर त्यांनी आपले उपोषण संपवले आहे.
दरम्यान, कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके म्हणाले, “सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. मात्र जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पक्षाचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील.”
24 Jul 2026 03:58 PM (IST)
कल्याणच्या आडवली परिसरात अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई याची प्रेयसीसमोर निर्घृण हत्या करणाऱ्या 6 आरोपींना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. जुन्या वैमनस्यातून झालेल्या या हत्येनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींची दहशत कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मानपाडा पोलिसांनी आरोपींची आडवली परिसरात धिंड काढत पोलिसी खाक्या दाखवला आहे.
24 Jul 2026 03:47 PM (IST)
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम असून येथील पणदूर येथे ठेकेदार कंपनीकडून खड्डे सिमेंट-काँक्रिट ग्रिटने भरले जात आहेत. मुख्य म्हणजे हे खड्डे कोल्ड डांबर वापरून हे खड्डे भरणे आवश्यक आहेत. मात्र, तसे न करता ग्रिटचा वापर होत आहे. जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू असल्याने हे ग्रिट वाहून जात आहे. त्यामुळे हे खड्डे पुन्हा जैसे थे होत आहेत.
24 Jul 2026 03:39 PM (IST)
कल्याण पश्चिमेत छत्रपती शिवाजी महाराज परिसरात कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष नवीन सिंह यांच्या नेतृत्वात कॉग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर बसले रास्ता रोको च्या प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बरखास्त करा अशी मागणी करीत सरकार विरोधी घोषणा करण्यात आली.काँग्रेसचा आंदोलनानंतर भाजप शहर अध्यक्ष वरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं राहुल गांधी विरोधात घोषणा दिल्या
24 Jul 2026 03:26 PM (IST)
कल्याण शहरातील सिंडिकेट परिसरातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला मध्यरात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले असून,कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रेही आगीत नष्ट झाली आहेत.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज महात्मा फुले पोलीसांनी व्यक्त केला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.या घटनेमुळे शासकीय कार्यालयांतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
24 Jul 2026 02:55 PM (IST)
सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं. त्यांनी उपोषण सोडल्यानंतरही अभिजीत दीपके धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यातच आता थोड्यावेळातच केंद्र सरकार व सीजेपीच्या प्रतिनिधींची थोड्याच वेळात चर्चा, होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी आशुतोष रांका व सौरभ दास चर्चा करणार आहेत.
24 Jul 2026 02:46 PM (IST)
मिरज पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पद एवढी रद्द ठरवल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्पुरता महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या स्नेहल मोरे यांच्याकडे कारभार दिला आहे.
24 Jul 2026 02:36 PM (IST)
CJP चं आज देशव्यापी आंदोलन असून, जालन्यात तरुणांनी भव्य मोर्चा काढलाय. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी जालन्यातील तरुणाई रस्त्यावर उतरलीये. शहरातील मस्तगड भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झालेय.
24 Jul 2026 02:25 PM (IST)
अभिजीत दिपके यांनी CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "मला अटक केल्यास आंदोलन देशभर पेटणार," असा इशारा देत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
24 Jul 2026 02:15 PM (IST)
सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाद्वारे देशातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केलं आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला असून, गेल्या काही वर्षात शिक्षणाचं बजेट घटल्याचा दावाही सोनिया गांधींनी केला आहे.
24 Jul 2026 02:00 PM (IST)
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची रजा रद्द केली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत रजा स्थगित राहणार आहे. हा आदेश सर्व पदांच्या अधिकाऱ्यांसाठी जारी करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता, पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने आणि पुढील सूचना मिळेपर्यंत नैमित्तिक रजा, अर्जित रजा इत्यादी कोणतीही सर्वसाधारण रजा मंजूर केली जाणार नाही.
24 Jul 2026 01:50 PM (IST)
Aga Aai Aaho Aai Review: सासू-सुनेचं नातं म्हणजे वाद, टोमणे आणि कटकारस्थान अशी प्रतिमा आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत पाहायला मिळाली. मात्र झी ५ मराठीवरील ‘अगं आई अहो आई’ ही वेब सिरीज या चौकटीला छेद देत सासू, आई आणि मुलगी यांच्यातील प्रेम, समजूतदारपणा आणि जिव्हाळ्याच्या नात्याची सुंदर कहाणी सांगते.
24 Jul 2026 01:40 PM (IST)
NEET पेपरफुटी प्रकरणावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी प्रतिक्रीया दिली आहे. “गेल्या दोन दिवसांपासून सरकारसोबत सातत्याने चर्चा सुरू होती आणि केवळ तोंडी आश्वासनावर उपोषण सोडण्यास आपण तयार नव्हतो. सरकारने प्रमुख मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतरच उपोषण मागे घेतले. आम्हाला ठोस आणि लेखी हमी हवी होती. त्यामुळे चर्चेला दोन दिवस अधिक लागले आणि मला दोन दिवस अतिरिक्त उपोषण करावे लागले. सरकारने आमच्या प्रमुख मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिले आहे.”
24 Jul 2026 01:30 PM (IST)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गुरुवारी धुळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि कराचीवाला खुंटा तसेच चाळीसगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा हातात घेऊन विद्याथ्यावरील लाठीमाराचा निषेध नोंदविला आहे.
24 Jul 2026 01:23 PM (IST)
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशितोष रांका हे जंतर-मंतरवरून केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत. पण बैठकीच्या ऐन अर्धा तास आधी बैठकीची जागा बदलल्याची माहिती समोर आली आहे. आधी ही बैठक कॉन्स्टिट्युशन हाऊसमध्ये होणार होती. पण आता ही बैठक विठ्ठल हाऊसमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
24 Jul 2026 01:20 PM (IST)
बांधकाम व्यावसायिक खलील शेख (वय ६५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी शेख यांनी व्हिडिओ तयार करून आर्थिक व्यवहार, थकित रक्कम व कथित मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते. याबाबत त्यांच्या पत्नी सुलताना शेख यांनी स्वारगेट पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी, राजकीय पदाधिकारी बाळासाहेब शेडगे, रघुनाथ गौडा अशा १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीला अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर गुरुवारी अटी शर्तीवर अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
24 Jul 2026 01:02 PM (IST)
देवळा तालुक्यातील वाखारी येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी एका तरुण विवाहित महिलेने दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत विवाहितेच्या पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
24 Jul 2026 01:00 PM (IST)
खरं तर, बिटचॅट हे एक असं मेसेजिंग ॲप आहे, जे इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कवर अवलंबून नसते. हे ब्लूटूथ लो एनर्जी म्हणजेच BLE च्या मदतीने आजूबाजूला उपलब्ध असलेल्या दुसऱ्या फोनसोबत कनेक्ट होते. अशावेळी जेव्हा अनेक फोन एकमेकांसोबत जोडले जातात, त्यावेळी एक मेश नेटवर्क तयार केले जाते.
अशा परिस्थितीत एखादा यूजर कोणत्याही दुसऱ्या यूजरला कोणता मेसेज पाठवतो, तेव्हा तो मेसेज उपलब्ध असलेल्या दुसऱ्या डिव्हाईसद्वारे पुढे पाठवला जातो आणि अखेर तो त्याच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचतो. याचा अर्थ असा आहे की, प्रत्येक फोन एका लहान रिले पॉइंट्सप्रमाणे काम करतो. या मेश नेटवर्कचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, जितके जास्त लोक जोडले जातात, तितका जास्त अंतरापर्यंत मेसेज पोहोचवला जाऊ शकतो. यामुळेच इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क बंद असतानाही हे ॲप मर्यादित अंतरापर्यंत संदेश पाठवण्याची सुविधा देते.
24 Jul 2026 12:59 PM (IST)
Jantar Mantar Violence: दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हेगारी कारवाई (Criminal Action) करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात दुपारी २:३० वाजता सुनावणी होणार आहे.
हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतीक जालान यांच्या न्यायपीठासमोर सुनावणीसाठी आले होते. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जालान यांनी स्पष्ट केले की, या याचिकेचे स्वरूप हे जनहित याचिकेसारखे (PIL) आहे. त्यामुळे आजच याच विषयाशी संबंधित असलेल्या दुसऱ्या याचिकेसोबत सरन्यायाधीशांच्या (Chief Justice) खंडपीठासमोर यावर सुनावणी घेतली जावी.
24 Jul 2026 12:54 PM (IST)
CJP Meeting: दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर येत आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशितोष रांका हे जंतर-मंतरवरून केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत.
काहीच वेळात CJP नेत्यांची आणि केंद्रीय मंत्र्यांची ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता असून, सरकार आणि पक्षश्रेष्ठींमध्ये नेमका काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
24 Jul 2026 12:48 PM (IST)
पीएमआरडीएची विकास परवानगी, प्रारंभ प्रमाणपत्र (सीसी) व पुणे महापालिकेचे भोगवटापत्र (ओसी) बनावट तयार करून त्याच्या आधारे तब्बल २२ खरेदीखतांची नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विविध नामांकित डेव्हलपर्सचे भागीदार, बांधकाम व्यावसायिक आणि जमीनमालक अशा १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घोटाळ्यामुळे शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात संबंधित बिल्डर तसेच इतरांवर गुन्हा नोंद केला आहे. दत्तनगर, आंबेगाव येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय (हवेली क्र. २०) येथे हा प्रकार घडला.
24 Jul 2026 12:36 PM (IST)
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटर्मिन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन जणांना वाघोली पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून टर्मिन इंजेक्शनच्या १०० बाटल्या, दुचाकीसह सुमारे २ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सूरज पद्माकर भुत्ते (वय १९) व आकाश गणेश धनवटे (वय १९, दोघे रा. लोणीकंद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शहर पोलिस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली व परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
24 Jul 2026 12:24 PM (IST)
24 Jul 2026 12:12 PM (IST)
बांधकाम व्यावसायिक खलील शेख (वय ६५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी शेख यांनी व्हिडिओ तयार करून आर्थिक व्यवहार, थकित रक्कम व कथित मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते. याबाबत त्यांच्या पत्नी सुलताना शेख यांनी स्वारगेट पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी, राजकीय पदाधिकारी बाळासाहेब शेडगे, रघुनाथ गौडा अशा १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीला अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर गुरुवारी अटी शर्तीवर अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
24 Jul 2026 11:56 AM (IST)
मेदांता रुग्णालयात दाखल असलेल्या सोनम वांगचुक यांनी 23 जुलैच्या मध्यरात्री उपोषण मागे घेतले. केंद्र सरकारचे दोन मंत्री, जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या मोठ्या मनधरणीनंतर त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. NEET पेपर लीक प्रकरण आणि देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असतानाच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर सलग 26 दिवसांचे उपोषण मागे घेतले. मात्र या निर्णयानंतरही आंदोलन संपलेले नसल्याचे स्पष्ट करत कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
24 Jul 2026 11:55 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचं शस्त्र वापरलं आहे. त्यामुळे भारतासह इतर देशांना चांगलाच दणका बसणार आहे. नुकतीच त्यांनी आयात शुल्काबाबत मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेने गुरुवारी Forced labor बद्दलच्या चिंतेमुळे 60 व्यापारी भागीदारांवर नवीन शुल्क जाहीर केले आहे. हे नवीन शुल्क, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षाच्या सुरुवातीला लादलेल्या आणि आता मुदत संपत असलेल्या जागतिक शुल्कांची जागा घेतील. याचा भारतीय उद्योगांवर काय परिणाम होणार?
24 Jul 2026 11:54 AM (IST)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोसायटीच्या प्रतिनिधीची निवड करण्याच्या ठरावावरून मालखेड (ता. कराड) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून चेअरमनला मारहाण केल्यानंतर भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या सदस्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.24) सकाळी घडली. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 Jul 2026 11:10 AM (IST)
आकांक्षा म्हणाली की, तिचे कुटुंबीय भेटायला आले नाहीत आणि तिला अशा कठीण काळात आई-वडिलांच्या आधाराची गरज होती. पुढे ती म्हणाली, “माझ्या घरातलं कोणीतरी आलं असतं तर बरं झालं असतं. ही भेट माझ्यापेक्षा गौरवसाठी जास्त होती. माझे आई-वडील आले असते तर मला जास्त आनंद झाला असता… किंवा माझ्याऐवजी माझा कुत्रा जरी आला असता तरी.”
24 Jul 2026 10:50 AM (IST)
रणबीर कपुरच्या ‘रामायण’ चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पॅनेल सुरू होण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी ‘रामायण’चा ट्रेलर २४ जुलै रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित केला जाणार नसल्याची घोषणा केली. कॉमिक-कॉनमध्ये ट्रेलरची पहिली झलक पाहिल्यानंतर तो ऑनलाइन रिलीज होण्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे.
24 Jul 2026 10:41 AM (IST)
नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि युवकांच्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची घोषणा केल्यानंतर गुरुवारी उशिरा शिक्षण मंत्रालयात दोन नव्या सचिवांची नियुक्ती करण्यात आली. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची बदली करून त्यांची पंचायतराज मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
24 Jul 2026 10:20 AM (IST)
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या वाढत्या क्षमतेच्या दरम्यान, सायबर सुरक्षेसंदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरक्षा चाचणी दरम्यान, ओपनएआयचे प्रगत एआय एजंटने कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय अब्ज डॉलरच्या एआय कंपनी हगिंग फेसच्या सिस्टीममधील सुरक्षिततेवर सायबर हल्ला केल्याचे सांगितलं जात आहे. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात मोठ्या बदलाचे हे संकेत असल्याचे तज्ज्ञ मानत आहेत. ही घटना उघडकीस आली जेव्हा ओपनएआय त्यांच्या एआय प्रणालींच्या सुरक्षिततेची चाचणी घेण्यासाठी रेड टीमिंग चाचणी करत होते. अशा चाचण्या एआय मॉडेल्सची क्षमता आणि संभाव्य धोके तपासतात, जेणेकरून सार्वजनिक वापरापूर्वी ते सुरक्षित केले जाऊ शकतात.
24 Jul 2026 10:10 AM (IST)
लडाखचे प्रसिद्ध समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषण व आंदोलनाची दखल अखेर केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जे. पी. नड्डा यांनी केंद्र सरकारचे अधिकृत आश्वासन पत्र वाचून दाखवले आणि सरकारने स्वीकारलेल्या अटींची माहिती दिली.
24 Jul 2026 10:04 AM (IST)
दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) सुरक्षेच्या कारणास्तव एक मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी, दिल्लीतील १७ प्रमुख मेट्रो स्थानके प्रवाशांसाठी बंद करण्यात आली आहेत. हा आदेश सकाळी ७:३० वाजता लागू झाला असून पुढील सूचना मिळेपर्यंत तो अंमलात राहील.
बंद स्थानकांची संपूर्ण यादी
जर तुम्ही आज मेट्रोने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी या स्थानकांची नावे काळजीपूर्वक वाचा. बंद असलेल्या १७ स्थानकांमध्ये खालील स्थानकांचा समावेश आहे:
यलो लाईन: लोक कल्याण मार्ग, पटेल चौक.
ब्लू लाईन: राजीव चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सुप्रीम कोर्ट, इंद्रप्रस्थ, झंडेवालन.
व्हॅलेट लाईन: जनपथ, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेटरीएट, आयटीओ, दिल्ली गेट, खान मार्केट.
इतर: सेवातीर्थ, जोरबाग आणि शिवाजी स्टेडियम.
24 Jul 2026 09:59 AM (IST)
लोकप्रिय बॅटल रॉयल गेम फ्री फायर मॅक्समध्ये समर रिंग ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना पेप्पी समर बंडलसारखे इतर रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे, ज्यामध्ये रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना त्यांच्या नशिबावर अवलंबून राहावे लागणार आहे. या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी इन-गेम करंसी डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. गेमधील हा ईव्हेंट पुढील काही आठवड्यांसाठी लाईव्ह असणार आहे.
24 Jul 2026 09:50 AM (IST)
देहरादून : दिल्लीतील जंतर मंतरवर पेपरफुटीविरोधात सध्या आंदोलन सुरु आहे. या पेपरफुटीच्या निषेधार्थ असंख्य तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. दिल्लीत आंदोलन सुरु असतानाच उत्तराखंडमध्ये आणखी एका पेपरफुटीची बातमी समोर आली आहे. उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये अभियांत्रिकीचे दोन पेपर फुटल्याचा आरोप आहे. यानंतर, विद्यापीठाने दोन्ही विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
24 Jul 2026 09:40 AM (IST)
India Share Market Update: जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाईच्या भीतीचा आज भारतीय शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज शुक्रवारी, २४ जुलै रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास १९२ पॉइंट्सच्या डिस्काउंटवर, सुमारे २३,६८१ च्या पातळीवर ट्रेड करत होता.
24 Jul 2026 09:30 AM (IST)
भारतात 24 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,617 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,399 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,963 रुपये आहे. भारतात 24 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,46,170 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,630 रुपये आहे. भारतात 24 जुलै रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 239.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,39,900 रुपये आहे.
24 Jul 2026 09:20 AM (IST)
उपोषणाला बसलेले प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणात उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून केली जात होती. उपोषणादरम्यान बिघडलेल्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने जंतर-मंतरवरून हलवून रुग्णालयात दाखल केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.
24 Jul 2026 09:10 AM (IST)
देशामध्ये मागच्या काही महिन्यांपासून NEET पेपरफुटीच्या विषयावरून गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातून तरुण रस्त्यांवर उतरून आंदोलने करत आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर वर मागच्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोडी यांचे नीट पेपरफुटीच्या विषयावर जाहिर व्हिडीओ वक्तव्य आले आहे. आपल्या इन्स्टाग्राम हँडल वरती व्हिडीओ अपलोड करत त्यांनी ही माहिती शेअर केली आहे.