सातारा : जावली तालुक्यामध्ये ऑगस्ट व चालू सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सुमारे ३०.१० हेक्टर शेती व शेती पिकाचे नुकसान झाले असून, कृषी व महसुल विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचे सुरू असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली.
दरम्यान अतीवृष्टीने झालेल्या नुकसानी पाहाणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे यांनी पाहाणी करून सदर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरीत आर्थीक मदत मिळवून दयावी, अशा सूचना संबधीत अधिकाऱ्यांना आ. भोसले, आ. शिंदे यांनी दिल्या आहेत.
बुधवारी सायकांळी मेढा, केळघर, कुडाळ, करहर परिसरात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रोडवेजच्या चुकीच्या कामकाजामुळे मेढा बाजारचौक, वेण्णा चौक व रिटकवली येथे मोऱ्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याला नदयांचे स्वरूप आले होते. मेढा येथे रस्त्याचे पाणी दुकान गाळ्यामध्ये शिरले होते तर काही काळ मेढा सातारा महाबळेश्वर मार्गावरची वाहातुक ठप्प झाली होती. याला या ठेकेदार जबाबदार आहे. रिटकवली येथे नाला व मोरीचे पाणी रस्त्यावर येवून काही घरामध्ये घुसले तर शेतामध्ये घुसल्याने ५.५० हेक्टर क्षेत्रामधील सोयाबीन व भातशेतीचे सुमारे १०५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या ठिकाणी आ. शशिकांत शिंदे यांनी तातडीने भेट देवून पाहाणी केली व संबधीत अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सुचना केल्या.
२७ ऑगस्ट रोजी झालेल्या अती वृष्टीमध्ये करंदोशी, बेलावडे, सांगवी, सोनगांव या चार गांवातील १४२ शेतकऱ्यांच्या २० .७७ हेक्टर शेत पिकांचे तर ३.८ हेक्टर क्षेत्रामध्ये शेतजमीनीचे नुकसान झाले. यामध्ये दरड कोसळणे, जमीन खरडून जाणे, जमीन वाहून जाणे असे नुकसान झाले. या गावांनाही दोन्ही आमदारांनी भेटी देवून नुकसानीचे पाहाणी केली. अशा प्रकार मेढा व आनेवाडी सर्कलमध्ये सुमारे ३०.१० हेक्टर क्षेत्राचे नुकासान झाले आहे. तालुक्यात आज अखेर १४५८.८ मि.मी. पाऊस झाला असून बुधवार ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी एकटया मेढा सर्कलमध्ये ८७ मि. मी. पाऊस झाला आहे.
[read_also content=”दिव्यांग तरुणाचा लातूर-मुंबई सायकल प्रवास; मुख्यमंत्र्यांना भेटून मांडणार दिव्यांगांच्या समस्या https://www.navarashtra.com/maharashtra/latur-mumbai-cycle-journey-of-a-disabled-youth-will-meet-the-chief-minister-and-raise-the-problems-of-the-disabled-nrdm-323416.html”]
दरम्यान तहसिलदार राजेंद्र पोळ, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी ही नुकसानीची पाहाणी करून सर्कल, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना पंचनाम्याच्या सुचना केला असून प्राथमिक अहवाला नुसार करंदोशी, सांगवी, सोनगांव, बेलावडे या ठिकाणचे ४ लाख २१ हजार ८४५ रु. नुकसान झाले आहे. तर रिटकवली येथील नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत.






