सर्व्हिसिंग सेंटरमधील ३५ ते ४० इलेक्ट्रीक दुचाकी जळून खाक झाल्या (फोटो - सोशल मीडिया)
PCMC Fire News: पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरामध्ये आगीची घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सर्व्हिसिंग सेंटरमधील ३५ ते ४० इलेक्ट्रीक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३ च्या सुमारास वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. बजाज कंपनीच्या इथर इलेक्ट्रिक दुचाकीच्या सर्व्हिसिंग सेंटरमधील दुचाकींना आग लागल्याने ३५ ते ४० दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. पत्र्याच्या शेडमध्ये हे सर्व्हिसिंग सेंटर सुरू होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऐन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी वाकड पोलीस दाखल झाले आहेत. रात्री उशिरा अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. ही घटना बॅटरीचा स्फोट झाल्याने घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पुण्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर आगीच्या घटना घडल्या आहेत. काल दुपारपासून आज पहाटे पर्यंत (दि 20 ते दि 21 ऑक्टोबर) अवघ्या दोन दिवसांत तब्बल एकुण २५ आगीच्या घटना घडल्या आहेत, यामध्ये लागलेल्या 3 आगी फटाक्यामुळे आणि इतर 22 आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र अग्निशमन दलाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अग्निशम दलाच्या अधिकाऱ्यांकडून आवाहन
सुरक्षित आणि आनंदी दिवाळीसाठी पुणे अग्निशमन दलाचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने यंदा विशेष “फटाके सुरक्षा जनजागृती मोहीम सुरु केली आहे. मुख्य अग्रिशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शना खाली ही मोहीम राबवली जात असून नागरिकांमध्ये सुरक्षितते बाबत जागरूकता निर्माण करणे आणि आग अपघातांना आळा घालणे हे उद्दिष्ट आहे. शहरातील सर्व २३ अग्निशमन केंद्रांना उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले असून नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. फटाक्यांच्या स्टॉल परिसरात अग्निशमन वाहने गस्त घालत आहेत व मेगा फोनद्वारे जन जागृती संदेश दिले जात आहेत.
याबाबत मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की, “आमचा उद्देश दिवाळीचा आनंद टिकवून सुरक्षितता अबाधित ठेवण्याचा आहे. निष्काळजीपणा टाळला तर प्रत्येक घरात प्रकाश आणि आनंद राहील. आम्ही ही दिवाळी सुरक्षित दिवाळी’ म्हणून साजरी व्हावी, अशी अपेक्षा ठेवतो.” असे अग्निशमन अधिकारी म्हणाले आहेत.