पुणे : शहरातील विविध भागातून कारचे सायलेन्सर चोरणार्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनीट पाचने पर्दाफाश केला असून, ६ जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा तीन लाखांचे सायलेन्सर जप्त केले आहेत. टोळी सायलेन्सरमधील प्लॅटिनम धातु मिश्रीत माती काढुन ती दिल्ली व इतर राज्यात विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरिफ सलीम शेख (वय १९ रा. हडपसर), हुसेन बढेसाहब शेख (वय २३), साहील वसीम शेख (वय १९ रा. वैदवाडी, हडपसर), सहजाद अक्रम खान (वय १९ रा. वैदवाडी, हडपसर), रहिम खलील शेख (वय २४ रा. रामटेकडी), सोहेल सलीम खान (वय २३ महंमदवाडी रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शहरात कारच्या सायलन्सर चोरी होण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. चोरटे केवळ सायलेन्सर चोरत असल्याने नागरिक देखील हैराण होते. तत्पुर्वी लोणी काळभोर पोलिसांनी एक टोळी पकडली होती. पण, तरीही या घटना घडत असल्याचे समोर आले होते. दरम्यान, युनिट पाचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान, त्यांना म्हाडा बिल्डींग परिसरात सायलेन्सर चोरणारे उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने या टोळीला पकडले. त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू केल्यानंतर त्यांनी शहरातील हडपसर, शेवाळवाडी, फुरसुंगी, देवाची ऊरुळी, मुंढवा, मांजरी भागातील वाहनांचे सायलेन्सर चोरी केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून ३ लाख २० हजार रुपयांचे १६ सायलेन्सर जप्त केले.
प्लॅटिनम धातू काढून विक्री…
प्लॅटिनम धातू हा ठरावीकच कारच्या सायलन्सरमध्ये मिळतो. प्रदूषण टाळण्यासाठी या धातूचा वापर सायलेन्सरमध्ये केला जातो. त्याची बाजारात मोठी किंमत आहे. अशीच वाहने चोरट्यांकडून हेरली जातात. त्यातही काही कारला हे डबल सायलेन्सर असल्याने त्या कारवर चोरट्यांचा डोळा असतो. त्यामधून मोठ्या प्रमाणात हा धातू मिळतो. त्याची विक्री बहुतांशवेळा दिल्लीत केली जाते. या टोळ्या महाराष्ट्रात सर्किय आहेत. येथून चोरलेला धातू त्या ठिकाणी एकत्रित पाठविला जातो. यापुर्वी देखील अशी टोळी पकडली होती. त्यांच्याकडून मोठी माहिती समोर आली होती. पण, दिल्लीत असणाऱ्या त्या म्होरक्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.