सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुण्याचा मानाचा पहिला आणि शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती मंडळ यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांसाठी एक आगळीवेगळी आणि आध्यात्मिक अनुभव देणारी संकल्पना घेऊन येत आहे. रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिराची भव्य प्रतिकृती यंदा कसबा गणपतीच्या मंडपात उभारली जाणार आहे. त्यामुळे पुण्यातच ग्रामदैवत व अष्टविनायकाचे दर्शन एकाच ठिकाणी घडणार असून, लाखो गणेशभक्तांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून आम्ही अष्टविनायक मंदिरांच्या प्रतिकृती साकारतो आहोत. यंदा पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिराची प्रतिकृती साकारून भक्तांना पालीला प्रत्यक्ष न जाता येथेच त्याचा अनुभव घेता यावा, हा आमचा हेतू आहे. त्यामुळे भक्तांची आध्यात्मिक यात्रा समृद्ध होईल.
पाली येथील श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायकातील एकमेव गणेश मंदिर आहे, ज्याचे नाव भक्ताच्या नावावरून ठेवले गेले आहे. मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकला, सूर्योदयावेळी मूर्तीवर पडणारे सूर्यकिरण आणि परिसरातील ऐतिहासिकता याचे दर्शन यंदा पुण्यातच घडणार आहे. या विशेष मंडपाची प्राणप्रतिष्ठा गुजरातचे स्वामी सवितानंद यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही शेटे यांनी दिली.
मंडपाच्या बांधकामासाठी विशेष कुशल कारागिरांची नियुक्ती करण्यात आली असून, गिरीश कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. पाली मंदिरातील प्रत्येक बारकावे, दगडी नक्षीकाम, मुख्य गाभाऱ्याची रचना, तसेच सूर्योदयावेळी मूर्तीवर पडणाऱ्या किरणांचा देखावा इथेही प्रत्यक्षात उभा केला जाणार आहे. कसबा गणपती पुण्यातील गणेशोत्सवात मानाचा पहिला म्हणून विसर्जन मिरवणुकीचे नेतृत्व करतो. त्यामुळे दरवर्षी येथे हजारो भाविकांची गर्दी असते. यंदाच्या या भव्य व वैभवशाली संकल्पनेमुळे पुण्यातील गणेशोत्सवाला एक नवे रुप येईल.
कसबा गणपती हा पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती मानला जातो. पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपती ओळखला जातो. कसबा गणपती हे पुण्याचे प्रमुख देवता (ग्रामदेवता) आहे. कसबा गणपती हा पुणे, महाराष्ट्रातील पहिला मानाचा गणपती, किंवा सर्वात आदरणीय गणपती मानला जातो. या मूर्तीची स्थापना 1893 मध्ये झाली आणि ती पुण्यातील कसबा पेठ परिसरात आहे, जो शहराचा एक प्राचीन भाग आहे. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी असतो