संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवड्यातील बाॅम्बे इंजिनिअर्स ग्रुप (बीईजी) मैदानावर आयोजित केलेल्या सेना दिन संचलन कार्यक्रमास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बुधवारी (१५ जानेवारी) उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या संचालन दिनानिमित्त येरवडा भागातील चंद्रमा चौक, होळकर पूल दरम्यान सकाळी सात ते अकरा दरम्यान वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे.
आळंदी रस्ता चौक ते चंद्रमा चौक, चंद्रमा चौक ते होळकर पूल दरम्यान दुतर्फा सर्व प्रकारची वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. खडकीतील हॅरिस पूल, नगर रस्त्यावरील खराडी बाह्यळण मार्ग, शास्त्रीनगर चौक, शादलबाबा चौक, विश्रांतवाडी चौकातून येरवड्याकडे जाणाऱ्या जड वाहनांना सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
येरवड्यातील शादलबाबा चौक ते चंद्रमा चौकमार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी शादलबाबा चौक, डाॅ. आंबेडकर चौक, आळंदी चौक, विश्रांतवाडीतील साप्रस पोलीस चौकी, जुना होळकर पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. विश्रांतवाडीकडून होळकर पूलमार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, साप्रस पोलीस चौकीमार्गे, जुना होळकर पूलमार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.
हे सुद्धा वाचा : मराठी येत नसल्याचा फायदा घेऊन महिलेची फसवणूक, काय आहे प्रकरण?
बोपोडी चैाक, खडकी बाजार, चर्च चौक दरम्यान होळकर पूल, येरवड्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पाटील इस्टेट, वाकडेवाडीमार्गे इच्छितस्थळी जावे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरुन अंडी उबवणी केंद्र (पोल्ट्री चौक) परिसरातील भुयारी मार्गातून मुळा रस्तामार्गे खडकी बाजारकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
पुण्याला मोठा मान
भारतीय लष्कराच्या स्थापना दिवसानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्य२ ‘आर्मी डे परेड’चा मान पुण्याला मिळाला आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे येत्या १५ जानेवारीला पुण्यात हा कार्यक्रम आयोजित केला असून, कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय लष्कराची स्थापना झाली होती. या दिवशी फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून १५ जानेवारीला आर्मी डे साजरा करण्यात येतो.