सौजन्य : सोशल मीडिया
नाशिक : विंचूर येथून जवळच असलेल्या भरवस फाटा येथे वैष्णवी किरण वावधाने (वय 21) या विवाहितेने आत्महत्या (Married Woman Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी दिल्याने लासलगाव पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
वैष्णवी हिच्यावर रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, वैष्णवी हिचे किरण प्रभाकर वावधाने यांच्याशी 8 मे 2020 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिने सुरळीत गेले. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून व वैष्णवी हिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. गरोदरपणात गोठ्यात काम करण्यास लावणे, लग्नात भांडे दिले नाही, कधी स्वयंपाक करता येत नाही, अशा कारणांवरून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.
याबाबत तिने वडिलांनादेखील सांगितले होते. परंतु, अपत्य प्राप्तीनंतर सर्व सुरळीत होईल, अशी समजूत तिचे आई-वडील काढत होते. मात्र, अपत्य प्राप्तीनंतर देखील त्रास कमी झाला नाही. वैष्णवी ही सहा महिने माहेरी होती. त्यानंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने वैष्णवीला सासरी पाठवले. त्यानंतर ते वेगळे राहू लागले. मात्र, शेती एकत्र असल्याने वाद होत होते. या वादातून पुन्हा वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ होऊ लागला. या त्रासाला कंटाळून माधव गणपत मानकर यांच्या विहिरीत उडी मारून तिने आत्महत्या केली, अशी तक्रार वैष्णवीचे वडील भारत रामनाथ बोचरे (रा. देवगाव) यांनी दिली.
पतीसह इतरांवर गुन्हा दाखल
दरम्यान, विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर, पती किरण प्रभाकर वावधाने, सासरा प्रभाकर गणपत वावधाने, सासू जनाबाई प्रभाकर वावधाने, दिर सुनील प्रभाकर वावधाने, जाऊ प्रतीक्षा सुनील वावधाने यांच्याविरुद्ध लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.