पारशिवनी : एका विवाहित महिलेने राहत्या घरात विष प्राशन (Married Woman Suicide) केले. महिलेला रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी हद्दीतील खंडाळा येथे घडली. अर्चना हर्षवर्धन पाटील (वय 23 रा. खंडाळा (मरियंब) असे मृत महिलेचे नाव आहे.
अर्चना पाटील या महिलेचे लग्न मे 2022 मध्ये खंडाळा येथील हर्षवर्धन कमलकिशोर पाटील (वय 35) यांच्याशी झाले होते. पाटील दाम्पत्य हे कुटुंबीयासह राहत होते. अर्चनाचे वडील रामकिशोर चुनकाऊन कुरील हे पारडी गावात मिस्ती कामाला असता त्यांना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जावई हर्षवर्धन यांचा फोन आला. यावेळी त्यांना तात्काळ खंडाळा येथील घरी येण्यास सांगितले. त्यानंतर रामकिशोर यांनी मुलीचे घर गाठले असता अर्चनाची प्रकृती खालावलेली व ती तोंडातून फेस गाळत असल्याचे त्यांना आढळून आली.
वडील रामकिशोर यांनी अर्चनाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तिच्यावर प्राथमिक उपचार देत रुग्णवाहिकेद्वारे मेयो रुग्णालयाकडे रेफर केले. येथे मंगळवारी पहाटे 2.55 वाजता अर्चनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सीएमओ डॉ. सिम्मी यांनी घोषित केले. अर्चनाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप कळू शकले नाही.
याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिलीप टेकाम करत आहे.