सौजन्य - नवराष्ट्र टीम
तासगाव/मिलिंद पोळ : तासगाव शहर सोमवारी सकाळी अक्षरशः ठप्प झाले. माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी झालेल्या चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारोंच्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर, बैलगाड्या, शेळ्या-मेंढ्या आणि पाळीव जनावरांसह सहभागी झाल्याने बसस्थानक चौकासह सर्व रस्ते ठप्प झाले होते. शहराच्या बाहेरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी झालेलं हे आंदोलन तासगावासह सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलं आहे.
या आंदोलनावेळी संजय पाटील म्हणाले, “निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरणांमुळे शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ लागत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढायचे असेल तर सरकारने तातडीने कर्जमाफी करावी.” “शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून, त्यांच्या पुढे राहून लढा देण्याची भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मी ढळू देणार नाही.” असं यावेळी पाटील म्हणाले.
या वेळी प्रभाकर पाटील म्हणाले, “शेती परवडत नाही, पण पर्याय नाही. आता चार-पाच एकर जमिनीच्या शेतकऱ्याच्या मुलाला लग्नातही अडचण येते, कारण सगळ्यांना शेतीची अवस्था माहीत आहे.”
राज्यातील शेतकरी संकटात
गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. एकीकडे कोरोना महामारीचा तडाखा, तर दुसरीकडे अतिवृष्टी, महापूर आणि अस्थिर हवामानामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, अनेकांचे पिके अक्षरशः वाहून गेली आहेत. गेल्या वर्षभरातही सततच्या पावसामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला आहे. परिणामी, आता त्यांना कर्जमाफीची तीव्र अपेक्षा आहे. कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक कणा पुन्हा उभा राहणे अशक्य आहे. सततच्या नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि घटणारे बाजारभाव या तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे गरजेचे असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.