भोर : पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरी भागामध्ये कालपासून तीन धारदार हत्याराने वार केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता भोरमध्ये देखील अशी घटना समोर आली आहे. भोरच्या यात्रेमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर वार करण्यात आलेला आहे.
भोर शहरातील सम्राट चौक भागात जुन्या वादातून उत्रौली (ता.भोर ) येथील तरुणावर एकाने कोयत्याने वार केल्याची घटना रविवार (दि.१७) रोजी रात्री ७:३० च्या सुमारास घडली. वार केलेल्या तरुणावर भा.दं.वि.कलम ३०७ प्रमाणे भोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केशव धर्मेंद्र शिंदे (रा. उत्रौली ता. भोर) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून रोहित जाधव (रा.भोलावडे ता. भोर) यांच्यासह इतर दोन जणांवर भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
याबाबत भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (दि.१७) शहरातील रामनवमी उत्सवानिमित्त भरवण्यात आलेला कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी केशव शिंदे आपल्या दोन मित्रांसह आला होता. रात्री ७:३० च्या सुमारास सम्राट चौक परिसरात केशव शिंदेच्या डोक्यात रोहीत जाधव याने कोयत्याने दोन ते तीन वार केल्याचे समजते.जखमीला उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्श नाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण पुढील तपास करीत आहेत.






