उद्योगांवर कारवाईची टांगती तलवार (फोटो- istockphoto)
रासायनिक सांडपाण्याने सोनपात्रा नदी लालेलाल
 ग्रामस्थांसह मच्छीमार झाले संतप्त
प्रदूषण मंडळाकडून नोटीस, कारवाई नाही
खेड: खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक उद्योग पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. बुधवारी रात्री कोसळलेल्या पावसाचा गैरफायदा घेत काही उद्योगांनी आपले विषारी रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याने सोनपात्रा नदी लालेलाल पाण्याने वाहू लागली! या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातील नागरिक, मच्छीमार आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने तब्बल आठ उद्योगांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे पाठवला असून, या प्रकरणी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
नदी विषारी करणाऱ्यांना सोडणार नाही…
गुरुवारी सकाळी नदीच्या किनाऱ्यावर लालसर पाणी वाहताना दिसताच ग्रामस्थांनी धाव घेतली. ‘ही नदी आमचे जीवन आहे, ती विषारी करणाऱ्यांना सोडणार नाही!” अशा घोषणा देत ग्रामस्थ आणि दाभोळखाडी परिसर संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली. समितीने या संदर्भात थेट कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली.
खेडचे राजकारण डळमळले! मनसेमधून भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकरांना मोठा धक्का, नेमके काय घडले?
प्रशासनाची निष्क्रियता असल्याची चर्चा सुरू
उपप्रादेशिक कार्यालयाने आता ८ उद्योगांविरुद्धचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी निखिल घरत यांच्याकडे पाठवला आहे. घरत यांच्या निर्णयाकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. ‘जर दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू, नदी आमची आहे, ती विषारी करणाऱ्यांना सोडणार नाही!’ असा स्पष्ट इशारा मच्छीमारांनी दिला आहे. तर याबाबाबत, लोटे औद्योगिक वसाहतीतील हा प्रकार केवळ पर्यावरणाचा नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रयतेचाही थेट पुरावा असल्याची चर्चा आता जनतेत सुरू आहे.
प्रदूषण मंडळाकडून नोटीस, कारवाई नाही
दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नदी, नाला आणि संशयित उद्योग परिसरातील पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवले. प्राथमिक तपासात काही उद्योगांकडून थेट सांडपाणी नाल्यात सोडल्याचे पुरावे मिळाल्याचे समजते.
यापूर्वी फक्त पंधरा दिवसांपूर्वी अशाच प्रकारात एका नामांकित उद्योगाविरुद्ध प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र त्यावर ठोस कारवाई न झाल्याने उद्योगांची ‘चिटाई’ वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ‘प्रदूषण मंडळ फक्त नोटिसा देते, पण कारवाई करत नाही. त्यामुळेच है उद्योग उन्मत झाले आहेत’, असा रोष ग्रामस्थांनी व्यक्त केला.






